Monday, November 27, 2006

पर्याय आणि निवडस्वातंत्र्य

ऑफिसच्या कॅंटीनच्या मेनूसमोर उभं राहून माझी एक सहकारी तक्रारीच्या सुरात म्हणाली, "हे काय, काही सुद्धा खावंसं वाटत नाही, याला हे लोक भरगच्च मेनू म्हणतात? काही choiceच नाही!" मेनूवर साताठ वेगवेगळे "पर्याय" असूनसुद्धा.

पर्याय ही मोठी मजेशीर गोष्ट आहे. भरगच्च पर्याय हे पुरेशा निवडस्वातंत्र्याचं निदर्शक आहे का? आपल्याला हवा असलेला नेमका पर्याय त्यात नसेल तर? जेव्हा आपण "सगळ्या पर्यायांचा नीट विचार करून मोकळ्या मनानी निवड करता आली पाहिजे" असं म्हणतो तेव्हा कुठेतरी आपल्याला मनापासून हवा असलेला पर्याय उपलब्ध आहे असं आपण गृहित धरलेलं असतं का? तसं नसेल तर मग कसा घेणार मोकळ्या मनानी निर्णय? कारण दिलेल्या पर्यायांची मर्यादा त्यावर आधीच पडलेली असते.

खर्‍या मोकळ्या मनानी तुम्ही निर्णय घेणार असाल तर तुम्हाला स्वत: पर्याय निर्माण करायचं, कमीत कमी धुंडाळायचं स्वातंत्र्य आणि सामर्थ्य हवं. निवडीचं स्वातंत्र्य हे उपलब्ध पर्यायांच्या पलिकडे जायला हवं. किंवा काही बहुपर्यायी प्रश्नांना कसा पाचवा पर्याय असतो न, "वरीलपैकी काहीही नाही", तसा कायम एक पाचवा पर्याय असावा! पण मग "वरीलपैकी काहीही नाही" हा पर्याय बाकीच्या सगळ्या पर्यायांना निरर्थक करतो. शिवाय "वरीलपैकी काहीही" नसलेलं म्हणजे काय हे नक्की माहीत असेल तर तो पाचवा पर्याय निवडण्यात अर्थ आहे न?

"हो ना, काही choiceच नाही" असं म्हणत आमचा घोळका ऑफिससमोरच्या रेस्टॉरंट कडे वळला, हे सांगणे नलगे! संध्याकाळी घरी आले आणि मेघना पेठेंचं "आंधळ्याच्या गायी" समोर दिसलं!

"
घटना घडतात.
पुरातल्या ओंडक्यासारखी माणसं त्यात वाहून जातात.
घडायचं ते घडून जातं...
पण तरीही पर्याय असतातच ठाकलेले..
तडफडण्याचे... हसण्याचे... रडण्याचे... हरण्याचे... जिंकण्याचे...
क्षमेचे... सूडाचे... स्वीकृतीचे... तुकण्याचे... साक्षित्त्वाचे...
त्यातला एकच निवडता येणार असतो,
आणि निवडावा तर लागणारच असतो!
पर्यवसान ठाऊक नसताना अंधारात घ्यावी लागणारी उडी...
माणसाच्या आयुष्यात नियत आहे ते हे.
यालाच आपण स्वातंत्र्य म्हणतो!
जाणिवेचा लख्ख उजेड नाही, आणि नेणिवेचा गच्च अंधार नाही,
अशा तिन्हीसांजेला, अंधुक प्रकाशातल्या जुलमी रानात
सोडाव्या लागणार्‍या या आंधळ्याच्या गायी...
त्यांना म्हणे देव राखतो...!
आणि आंधळा?
तो तर फक्‍त या भोळ्या विश्वासाची बासरी वाजवत राहतो.
"

Sunday, November 05, 2006

चार होत्या पक्षिणी त्या

तुम्हाला असं कधी तरी होतं का? होतच असणार. कुठल्या तरी बेसावध क्षणी कुठल्या तरी निमित्तानं कुठलीतरी जुनी गोष्ट आठवते. कुठलातरी जुना प्रसंग आठवतो. कुठलंतरी जुनं गाणं आठवतं. पण माझ्यासारखी "विस्मरणशक्‍ती" अफाट असेल तर धड पूर्ण आठवत नाही, बारकावे आठवत नाहीत... आणि मग अशी चुटपुट लागून राहते.

आता कालचीच गोष्ट बघा न....

निमित्त काय झालं ते पुन्हा कधीतरी. पण मला सारखी आठवत राहिली "वीज म्हणाली धरतीला" मधली जुलेखा, "चार होत्या पक्षिणी त्या". आणि हे गाणं पूर्ण काही आठवेना. तेव्हापासून जी काही अस्वस्थ झालीये!

तेव्हा या ब्लॉगच्या वाचकांनो (वाचतंय् का हो कोणी?), कोणाकडे असेल हे गाणं पूर्ण, कृपया नोंदा न!

Sunday, October 29, 2006

Sound of Music


My Day in the hills has come to an end, I know
A Star has come out, to tell me it's time to go
But deep in the dark green shadows
Are voices that urge me to stay
So I stop and I wait and I listen
For one more sound, for one more lovely thing
that the hills might say

The hills are alive with the sound of music
With songs they have sung for a thousand years.
The hills fill my heart with the sound of music
My heart wants to sing every song it hears....

Sound of Music. Magic of Music. ही संगीताची जादू जिवंत अनुभवायची संधी नुकतीच मिळाली. हेवर्डच्या डग्लस मॉरिसन थिएटरच्या कृपेने! मारियाची कथा प्रेमकथा आहे, पण सर्वसामान्य प्रेमकथा नाही. संगीताचं प्रेम, निसर्गाचं प्रेम, लहान मुलांचं प्रेम, देशावरचं प्रेम आणि प्रेमावरचं प्रेमसुद्धा! निखळ आणि निरागस, मोकळं आणि बेबंद, अल्लड आणि प्रगल्भ!

हा चित्रपट कैक वेळा बघूनही त्या संगीताची जादू इतकी अवीट आहे! सगळीच गाणी लहानपणापासून चढलेली! कोण्या मैत्रिणीनं लावून दिलेलं हे वेड कधी उतरलंच नाही. ती अद्भुत कथा, ते हृदयस्पर्शी आणि अर्थपूर्ण शब्द, ते जादुई संगीत याबद्दल मी नव्याने काय लिहीणार? जिथून या सगळ्या जादूला सुरुवात झाली तो मूळचा Broadway Show कसा असेल हे कुतूहल घेऊन बघायला गेले. आणि चलतचित्राच्या युगात इतकी प्रगती होऊनसुद्धा नाट्यकला का टिकून आहे याची पुन:प्रचिती आली.

अगदी छोट्याशा रंगमंदिरात सजलेला संगीताचा सोहळा मंत्रमुग्ध करून गेला. "live music" ची जादूच वेगळी! स्टेजवर आपल्या अगदी समोर पंधरा-वीस नन्स् हातात मेणबत्त्या घेऊन समरसून सुरेल प्रार्थना म्हणतात, त्यानी जी वातावरण निर्मिती झाली, ती कितीही आधुनिक ध्वनी सोयीनी युक्‍त असलेलं चित्रपटगृह, surround sound, dolby इ. इ. असलं तरी सुद्धा कदापि होणे नाही. अडिच-तीन तासाच्या त्या नाट्यानुभवात भुमिकेशी समरसून जाणार्‍या कलाकाराची एक-दोन वेळाच जरी नजरभेट झाली तरी तो सगळा अनुभव असा जिवंत होतो की वाटतं, "क्षण एक पुरे नाट्याचा, वर्षाव पडो चित्रांचा" ;-)

सुखदु:खाच्या प्रसंगी Sound of Music ची गाणी नेहेमीच साथ देत आली आहेत, देत राहतील. "She climbs a tree" मधला मिश्किल खिलाडूपणा, "High on the hills" मधली पोरकट गंमत, "Climb every mountain" मधलं धीरगंभीर मार्गदर्शन, "These are a few of my favourite things" मधला आनंदी खुशालचेंडूपणा, "I have confidence in confidence alone" मधला आशावाद, "Nothing comes from nothing" मधलं निखळ प्रेम... हे सगळं या नाटकानी परत जिवंत करून दिलं. आणि डोळे मिटून कधीही त्या वातावरणात शिरता येईल असा अनुभवही!

Monday, October 23, 2006

खरेच का हे!

परवा एका मैत्रिणीशी गप्पा मारताना अनिलांच्या या कवितेची आठवण निघाली. तिला नक्की शब्द आठवत नव्हते, आणि मला कुठेतरी लिहून ठेवलेली आठवत होती. म्हणून ही नोंद! त्या निमित्तानं, ही कविता प्रेमकविता आहे की भक्‍तिकविता किंवा विराणी असावी, अशी चर्चा झालेली आठवली...

तुझ्या पथावर तुझ्या पदांच्या
पायखुणांच्या शेजारी मम
पायखुणा या उमटत जाती
खरेच का हे?

मातीमधल्या मुशाफिरीतून
हात तुझा तो ईश्वरतेचा
चुरतो माझ्या मलीन हाती
खरेच का हे?

खरेच का हे बरेही का हे
दोन जगांचे तोडून कुंपण
गंधक तेज़ाबासम आपण
जळू पहावे?

आणि भयानक दहन टाळण्या
जवळपणातही दूर राहुनी
स्फोटाच्या या सरहद्दीवर
सदा रहावे?

-कुसुमाग्रज 

Monday, September 25, 2006

सहानुभूती

जुनी गोष्ट. कत्रिना चक्रीवादळाच्या वेळी आम्ही काही सहयोगी चर्चा करत होतो, पीडितांच्या दुर्दशेबद्दल सहानुभूती व्यक्‍त करत होतो. आमच्यातील एक, फ्लोरिडा चा रहिवासी, बराच वेळ आमची चर्चा ऐकून घेत होता. आणि मग थोड्या वेळाने कत्रिना मुळे ताज्या झालेल्या त्याच्या लहानपणीच्या चक्रीवादळ एंड्र्यूच्या आठवणींबद्दल सांगायला लागला. त्या वेळी झालेले त्याचे हाल त्याला आठवले. सगळं घर उद्ध्वस्त झालेलं जणू काही त्याच्या डोळ्यांसमोर त्याला दिसत होतं. कत्रिना मधे वाताहत झालेल्या शेकडो कुटुंबांचं दु:ख त्याच्या आठवणीत उमटलेलं दिसत होतं. तेव्हा मला जाणवलं की कत्रिना पीडितांबद्दल खरी सहानुभूती फक्‍त बहुतेक त्यालाच वाटत होती, बाकीचे आम्ही व्यक्‍त करत होतो निव्वळ हळहळ.

सहनुभूती म्हणजे सह-अनुभूती. एकत्र घेतलेला अनुभव, किंवा एकसमान अनुभवातून निर्माण झालेली जवळीकीची भावना. दुसर्‍याचे दु:ख (बहुधा दु:खच, कारण सहानुभूती या शब्दात दु:ख अध्याहृत नसलं, तरी त्याच्या वापरात असतं) बघून आपल्याला आलेल्या तशाच अनुभवाची आठवण होऊन जागी झालेली वेदना. पण पुष्कळ वेळेला दुसर्‍याच्या दु:खाबद्दल व्यक्‍त केलेली हळहळ सहानुभूती म्हणुन गैरसमजली जाते. अर्थात याचा अर्थ असा नाही की मनापासून हळहळ व्यक्‍त करणार्‍याच्या भावना कमी महत्त्वाच्या असतात. पण जेव्हा आपण त्या वेदना जगलेल्या असतो, तेव्हाच त्याच्याशी खरी सहानुभूती दाखवू शकतो ना? कितीही मनापासून व्यक्‍त केली गेली तरी हळहळ खूपच परकी वाटायला लागते मग.

मन इतकं तरल होऊ शकतं का की स्वानुभवाशिवाय सहानुभूती जाणवावी? हळहळ आणि सहनुभूती यातील सीमारेषा नाहीशी व्हावी? फक्‍त दु:ख, वेदना यातून गेल्यावरच आपल्याकडे दुसर्‍याचं दु:ख समजण्याइतकी क्षमता येते? इंग्रजी मधे "relate" हा अगदी चपखल शब्द आहे या भावनेसाठी. त्याला मराठीत "सहकंप" म्हणता येईल का? असा सहकंप फक्‍त कटु अनुभवातूनच जन्म घेतो का? आनंद चार चौघांबरोबर वाटून घेतला की दुणावतो हे जरी खरं असलं, तरी एकत्र अनुभवलेली दु:खं आपल्याला एकमेकांच्या अधिक जवळ आणतात, घट्ट बंध निर्माण करतात. म्हणूनच "सहानुभूती" यात शब्दश: अध्याहृत नसलेलं दु:ख त्या भावनेत मात्र अंगभूत होऊन जात असेल का?

Tuesday, August 22, 2006

दाटून आलेल्या संध्याकाळी

अश्विनीच्या नोंदीने सुधीर मोघेंच्या या कवितेची आठवण करून दिली. माझ्या हॉस्टेल वरच्या एका मैत्रिणीने फार कौतुकानी ही कविता माझ्या लाडक्या कवितांच्या वहीत लिहून दिली होती. ती माझ्या छोट्या का होईना, पण गुंतवून ठेवणार्‍या त्या ठेव्यावर फारच खूष झाली होती. आणि मीही मिळतील ते थेंब गोळा करणारी, मग तिचाही ठेवा पालथा घातला! हॉस्टेल सोडल्यापासून दुर्दैवानं तिच्याशी संपर्क तुटला ("यथा काष्ठं च काष्ठं च" अन् दुसरं काय?), पण आज या कवितेच्या निमित्ताने तिची आठवण ताजी झाली. त्याबद्दल अश्विनीला धन्यवाद!

दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित सोनेरी उन पडतं
तसंच काहीसं पाउल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येतं!

शोधून कधी सापडत नाही
मागून कधी मिळत नाही
वादळ वेडं घुसतं तेव्हा
टाळू म्हणुन टळत नाही!

आकाश, पाणी, तारे, वारे
सारे सारे ताजे होतात
वर्षांच्या विटलेल्या बधिर मनाला
आवेशांचे तुरे फुटतात!

संभ्रम, स्वप्न, तळमळ, सांत्वन
किती किती तर्‍हा असतात
सार्‍या सार्‍या सारख्याच जीवघेण्या
आणि खोल जिव्हारी ठसतात!

प्रेमाच्या सफल विफलतेला
खरं तर काहीच महत्त्व नसतं
इथल्या जय पराजयात
एकच गहिरं सार्थक असतं!

मात्र ते भोगण्यासाठी
एक उसळणारं मन लागतं
खुळ्या सोनेरी उन्हासारखं
आपल्या आयुष्यात प्रेम यावं लागतं!

-सुधीर मोघे

पाऊस कधीचा पडतो...

पावसाच्या दिवसांत आपल्या सर्वांच्याच मनात पावसाळी आठवणींचा पाऊस पडतो. आणि त्याचे प्रतिबिंब मराठी ब्लॉगविश्वात सुद्धा पावसाबद्दलच्या आठवणी, कविता, गझला यांच्या वर्षावाने उमटले. निसर्गाच्या अगदी "नेमेचि येणार्‍या" या साहजिक घटनेशी इतका हळवेपणा का बरं निगडित असावा?

अगदी लहानपणापासून मनावर उमटलेले शाळेचे नवीन वर्ष आणि त्यासोबत येणारे बरेच सारे नवेपण आठवते म्हणून? की पाण्यात खेळायचे बालसुलभ थरार कोणत्याही वयात पुन्हा लहान करून जाते म्हणून? की छत्री-रेनकोट सांभाळत अर्धं भिजून घरी आल्यावर गरम गरम चहा, भजी किंवा भाजलेल्या कणसाची तशी चव दुसर्‍या कुठल्याच दिवसात येत नाही म्हणून? की "रिमझिम पाऊस पडे सारखा" पासून "पाऊस कधीचा पडतो" पर्यंत आणि "ये रे ये रे पावसा" पासून "ती गेली तेव्हा रिमझिम" पर्यंत असंख्य गाणी मनात गर्दी करून नकळत असंख्य रंगांच्या भावनांत भिजवून टाकतात म्हणून?

की दुलई पांघरून खिडकीबाहेर तासंतास नुसता पाऊस बघत बसायची, समोरच्या घराच्या पन्हाळीतून पडणार्‍या धारेच्या नुसत्या आवाजावरून पावसाचा जोर किती आहे त्याचा अंदाज बांधायची, घरासमोर साठणार्‍या तळ्यात पाऊसच रेखत असलेल्या भिंगोर्‍या क्षणोक्षणी नवीन नक्षी करत आहेत असंच वाटून रमून जायची मजा आणखी कशात येऊच शकत नाही म्हणून? की आडोशाला पंखात चोची खुपसून उगीच रिकामटेकडे उद्योग करणार्‍या कबुतरांमधे आणि आपल्यामधे या क्षणी काहीच फरक नाही याची जाणीव फक्‍त तो पाऊसच देऊ शकतो म्हणून?

आणि अगदीच "क्लिशे" म्हणजे पहिल्या पावसानी भिजलेला मातीचा सुगंध वेडावणारा असतो म्हणून? पण खरं सांगते, घरच्यासारखा मातीचा सुगंध कुठेही येत नाही! परदेशात सुद्धा भिजलेल्या मातीचा सुगंध सुखावणारा अनुभव देऊन जातो खरा, पण तो वेडावणारा नसतो. शेवटी, घरची मातीच वेगळी असते हेच खरं, हे देखील सांगणारा तो पाऊसच!

पावसाचे दिवस सुरु झाल्यापासून, पावसावर इतक्या नोंदी वाचून खूप वेळा मोह होऊन सुद्धा मी ही नोंद उतरवायची अळंटळं करत होते. पण आज शेवटी राहवले नाही. आणि मी पण पावसाच्या नुसत्या उल्लेखानी येणार्‍या घरव्याकुळतेला शरण गेले!

हे पर्जन्यराया, तुझा महिमा अगाध आहे!

Saturday, July 01, 2006

एक तरी मैत्रीण हवी

परवा मैत्रीण ही कविता वाचली आणि शांता शेळकेंची याच नावाची कविता आठवली. दोन्ही कवितांचा मुखडा एकच असला तरी रुप किती वेगळं आहे! खूप पूर्वी सकाळच्या (बहुतेक सकाळच, कदाचित लोकसत्ता सुद्धा असेल) बालपुरवणीमधे प्रकाशित झालेली. हमखास सख्ख्या मैत्रिणीची आठवण काढून हुरहूर लावणारी...

एक तरी मैत्रीण हवी
कधीतरी तिच्यासंगे कडकडून भांडायला
मनामधल्या सार्‍या गमती तिच्यासमोर मांडायला!

एक तरी मैत्रीण हवी
शाळेमधे एका डब्यात एकत्र बसून जेवायला
घासामधला अर्धा घास अलगद काढून ठेवायला!

एक तरी मैत्रीण हवी
झाडाखाली गुलगुल गोष्टी किलबिल किलबिल बोलायला
कधी कधी लाडात येऊन गळ्याची शप्पथ घालायला!

-शांता शेळके

Thursday, June 22, 2006

चढलेली गाणी

नवीन गाणी ऐकली की नक्की कधी आणि कशी आवडायला लागतात, हे सांगणं कठीण आहे. शाळा-कॉलेजात असताना सिनेमातली गाणी तर दिवसरात्र रेडिओवर, टी. व्ही. वर, गल्लीत लाउडस्पीकरवर ऐकून ऐकून आवडायला लागलेली खूप आहेत. तेही नेमकी परीक्षेच्या वेळेला. सिनेमातलीच कशाला, मी "माझा कोंबडा कोणी मारियला..." सुद्धा ऐकून ऐकून गुणगुणायला लागले होते, आणि आईची बोलणी पण खाल्ली होती. भारत सोडल्यापासून या आनंदाला मुकली आहे! म्हणजे गाणी टी. व्ही.-रेडिओवर ऐकायला मिळातात, पण "कोंबड्याची" सर नाही ;-)

फार थोडी गाणी अशी असतात की जी एकदाच ऐकून आवडून जातात. मला तर नवीन गाणं तीन-चार वेळा ऐकून, त्याचे शब्द नीट समजल्याशिवायत त्यात अगदी क्वचितच रस निर्माण होतो. नुसतीच धुन आवडली, आणि मग शब्द काहीही असले तरी चालेल असं नाही चालत. पण सगळीच नवीन गाणी खूप वेळा ऐकून आवडतात असंही नाही. त्यामुळे एखादी नवीन CD आणली की ती गाडीमधे बरेच दिवस असंख्य वेळा वाजत राहते. त्यातली काही गाणी आवडतात, काही खूप आवडतात, आणि काही चक्क चढतात! असं चढलेलं गाणं लागोपाठ दहा-बारा वेळा ऐकते मी. अगदी तोंडपाठ झाल्याशिवाय थांबतच नाही. आवडलेली, खूप आवडलेली गाणी सुद्धा पुन्हा पुन्हा ऐकली जातात, पण चढलेल्या गाण्यांची नशा वेगळीच असते न?

हे सगळं सांगायचं कारण म्हणजे अलिकडचं चढलेलं गाणं. सध्या पद्मजा फेणाणी जोगळेकरांची नवीन CD वाजतीये रोज गाडीत. यात इंदिरा संतांच्या चार कविता, शंकर रामाणी यांच्या दोन आणि कुसुमाग्रजांची "पृथ्वीचे प्रेमगीत" अशी गाणी पद्मजांच्या आवाजात आहेत. इंदिरा संतांच्या सोप्या, मोकळ्या, साधेपणातील सौंदर्याची ओळख ओळीओळीतून पटवून देणार्‍या कविता तर मोहक आहेतच. पृथ्वीचे प्रेमगीत बद्दल मी नव्याने काय सांगणार? पण मला शंकर रामाणींच्या कवितांची मात्र ओळख पहिल्यांदाच झाली. आणि त्या दोन्ही कविता चढल्या. त्यातली ही एक कविता.

सांजघडी सातजणी पाणियाला गेल्या
सावल्यात हरवून वाट विसरल्या

वाट विसरल्या आणि विसरल्या घाट
सात जणींच्या सावल्या झाल्या घनदाट

खोल सावळल्या तरी, सावरल्या काय
मनमोराला फुटले इथे तिथे पाय

सांजघडी सातजणी पाणियाला गेल्या
सावळ्यात हरवून वाट विसरल्या

हा सावल्या आणि सावळ्याचा खेळ किती वेधक आहे! आणि त्याच्या जोडीला सुंदर संगीत आणि पद्मजांचा मधुर आवाज, गाणं चढलं नाही तरच नवल!!

Friday, May 05, 2006

पुस्तकनिष्ठांची मांदियाळी

ट्युलिपनं मला या विषयावर लिहायला टॅग केलं तेव्हा खूप आनंद झाला. आणि थोडीशी ओशाळून पण गेले. कारण मी काही खूप पुस्तकं "खाणारी" नाही. शिवाय भारत सोडल्यापासून मराठी वाचन कमी झालंय हेही खरंच. अगदी वर्षाकाठी घरी गेलं की विकत घेतलेली आणि भेट मिळालेली पुस्तकंसुद्धा सगळी नाही वाचून होत. तरी देखील कपाटात असलेली पुस्तकं कायम खुणावत असतात हे खरंच. शिवाय शाळेत असल्यापासून काही वाचलेलं, काही वेचलेलं आहेच की! तर माझ्या पुस्तक गाठोडीतलं काही...

१. सध्या वाचनात असलेले/शेवटचे वाचलेले वा विकत घेतलेले मराठी पुस्तक :
स्वत:विषयी : अनिल अवचट

२. वाचले असल्यास त्यावर थोडक्यात माहिती :
"स्वत:विषयी" म्हणजे अगदी सहज मोकळ्या, ओघवत्या भाषेत केलेलं स्वानुभवांचं प्रांजळ कथन. त्याच्या साधेपणात त्याचं सौंदर्य आहे. इतका मोठ खटाटोप मांडणारा माणूस किती साधा असू शकतो यानी अचंबित झाले मी हे पुस्तक वाचल्यावर. आणि लक्षात राहिली अर्पणपत्रिका - "सुनंदा, हे पुस्तक अर्पण करण्यासाठी तुला काही काळ माझ्यातून बाहेर काढावं लागतंय, त्याबद्दल थोडी रुखरुख."

३. अतिशय आवडणारी/प्रभाव पाडणारी ५ मराठी पुस्तके :
आनंदी गोपाळ : श्री. ज. जोशी
स्वामी : रणजीत देसाई
पाडस : राम पटवर्धन
समीधा : साधना आमटे
बोलगाणी : मंगेश पाडगावकर

४. अद्याप वाचायची आहेत, अशी ५ मराठी पुस्तके :
स्मृतिचित्रे : लक्ष्मीबाई टिळक
माझी जन्मठेप : वि. दा. सावरकर
आई : मॅक्सिम गॉर्की
टॉलस्टॉय एक माणूस : सुमती देवस्थळी
ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी : प्रतिभा रानडे

५. एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे :
निर्विवादपणे, "असा मी असामी", अतिशय प्रिय पुस्तक. चार मित्र मैत्रिणी जमले की अगदी नकळत या पुस्तकातील कुठली तरी कोटी निघतेच निघते. इतकं पु. लं. नी आमच्या तुमच्या सारख्या सगळ्या "असामींना" त्यात सामावून घेतलेलं. कुठलंही पान उघडून वाचावं... खरं म्हणजे पारायणं करून आता इतकं पाठ झालंय की पुस्तक उघडायचीही गरज नाही. पण तरीही उघडलं तरी हजाराव्यांदा वाचताना सुद्धा ओठावर स्मित फुटावं म्हणजे काय जादू आहे!

आता या सहब्लॉगर्सना tag करते ('खो' देते म्हणायचा मोह होतोय :-) )
दीपा
कौस्तुभ
विदग्ध
यतीन

Friday, April 21, 2006

बुचाची फुलं

काही दिवसांपूर्वी अपार्टमेंटच्या आवारात निलगिरीच्या टोप्यांचा सडा पडला होता. मंद वास पण येत होता. छाती भरून तो वास घेतला आणि शाळेची आठवण झाली. शाळेत अशीच झाडं होती निलगिरीची, आणि टोप्यांचा सडा पडायचा. बाकीचीही खूप झाडं होती. गुलमोहर, शिरीष, चिंच, विलायती चिंच, बदाम, चेंडूफळ (टण्णूचं झाड!), बूच, पिंपळ, अशोक.... ऋतूमानाप्रमाणे आम्ही कुठली कुठली फुलं गोळा करत असू. चिंचा, चिंचेची फुलं सुद्धा. गुलमोहराच्या पाकळ्यांच्या अंगठ्या करत असू. विलायती चिंचा तुरट लागल्या तरी गोळा करून चाखत असू. अशोकाच्या बिया गोळा करणे हा तर खूप जणींचा छंद होता.

पण सगळ्यात "लोकप्रिय" होती बुचाची फुलं. ती झाडं फुलली की आवारात शिरल्या शिरल्याच बुचाचा मस्त वास यायचा. आणि शाळा भरण्याआधी, छोट्या आणि मोठ्या सुट्टीत, शाळा सुटल्यावर बुचाची फुलं वेचायला काही "वेड्या" मुली नेहेमी झाडाखाली रेंगाळायच्या. नुसत्या रेंगाळायच्या नाहीत. ताजी फुलं झेलायला ताटकळत वर नजर लावून अक्षरश: "दबा" धरून असायच्या. एखादं फुल झाडावरून अलगद गिरक्या घेत खाली झेपावताना दिसलं की सगळ्या त्याकडे झेपावायच्या. अगदी स्पर्धाच असायची ते फुल झेलायला. जिला ते फुल मिळेल तिच्या चेहर्‍यावर विजयाचा आनंद अगदी ओसंडून वहायचा! आणि मग त्या वेचलेल्या फुलांच्या लांबच लांब वेण्या तयार करायची स्पर्धा. आवारातच नाही तर सगळ्या वर्गांमधूनही मग बुचाचा घमघमाट येत रहायचा. असे मोहक, गंधित, वेडे दिवस होते शाळेतले!

तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? शाळेच्या वेड्या दिवसांची आठवण व्हायला नुसता निलगिरीचा मंद वास पुरे होता. तसं पहायला गेलं तर शाळेच्या दिवसांची आठवण यायला फार काही लागत नाही. लहानपणाच्या आठवणी आपल्या सगळ्यांनाच व्याकुळ करतात. कधी कधी तर अगदी ध्यानी मनी नसताना समोर ठाकतात. त्यातून माझ्यासारख्या शाळेच्या प्रेमात असलेल्यांना तर अगदी "शाळाव्याकुळ" करून सोडतात. (हा ट्युलिपच्या "घरव्याकुळ" वरून बनवलेला शब्द, वाचतीयेस का ग ;-) )

Friday, April 14, 2006

स्वप्न

"ही शुभ्र फुलांची ज्वाला" या पद्मजा फेणाणी-जोगळेकरांच्या आवाजातील ध्वनीमुद्रिकेवर विंदा करंदीकरांची एक फार सुंदर कविता आहे,

मागू नको सख्या, जे माझे न राहीलेले
ते एक स्वप्न होते, स्वप्नात पाहीलेले...

त्यातल्या दोन ओळी मला फार मोहवतात :

स्वप्नात वाहीलेले म्हणुनी कसे असत्य
स्वप्नास सत्य असते सामील जाहलेले...

खरंच, स्वप्न आणि सत्य यांच्यातली सीमारेषा इतकी पुसट असते का? किमान ती तशी असावी असं वाटत राहतं हे नक्की. जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला सत्यात आणण्याची तीव्र इच्छा असते, पण ती सत्यात आणता येतेच असं नाही, तेव्हाच तर आपण त्याची स्वप्नं बघतो ना? पण म्हणून ती "असत्य" थोडीच असते? त्या गोष्टीची तीव्र इच्छा जणू काही त्याला सत्य बनवून टाकते. मग ते "स्वप्न" "असत्य" कसं होईल?

स्वप्नांना सत्यास सामील करणार्‍यासाठी आपण सगळेच झगडत असतो. स्वप्न सत्यात आणण्यासाठी आपण झगडत राहतो. जे जे जमेल ते ते करत राहतो, काही म्हणता काही सुद्धा सोडत नाहीत. आणि ती स्वप्नं आज न उद्या सत्यात उतरतातही. आपले प्रयत्नच आपलं स्वप्न सत्यास सामील करून टाकतात.

पण काही स्वप्नं मात्र फक्‍त रंगवण्यात रमून जायचं असतं, सत्यात आणण्यासाठी झगडायचं नसतं. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून काही क्षण स्वप्न बघण्यात घालवणं किती मनोरंजक असतं! अशी स्वप्नं सत्याला म्हणजेच आपल्या मनातल्या तीव्र, सूप्त इच्छेला आपल्यात सामील करून घेतात!

या Disney च्या गाण्याची आठवण झाली. स्वप्न आणि सत्याची किती छानशी सांगड घातली आहे:

A dream is a wish your heart makes,
When you're fast asleep
In dreams you lose your heartaches,
Whatever you wish for, you keep
Have faith in your dreams and someday,
Your rainbow will come smilling through
No matter how your heart is grieving,
If you keep on believing,
The dreams that you wish will come true.

Wednesday, April 12, 2006

समज

Tulip च्या ब्लॉगवर Emotional Dependence नोंद वाचली आणि ही कविता आठवली.

तुझ्याशी वाद करताना
आताशा माझा आवाज
तितकासा चढलेला नसतो
आणि तुझी प्रतिक्रियाही
झोंबण्याइतकी तिखट नसते

तुझ्या मागोमाग निमूटपणे येताना
मी फारशी खळखळ करत नाही
पण कधीतरी मी यायचं नाकारलंच
तर तूही हट्ट धरत नाहीस

तुझ्या निशिगंधाचं मला अप्रूप वाटावं
यामुळं तू भारावून जात नाहीस
नि मी लावलेल्या गुलाबाची
मला हवी तशी दखल
तू घेतली नाहीस तरी
मीही हळवी होत नाही

आपल्या हातून निसटून गेलेल्या
संवत्सरांनी जाता जाता
समंजसपणाची शाल
आपल्यावर पांघरली आहे?

की बरेच श्रावण बरसून गेल्यावर
आता सरावाने कोसळणार्‍या पावसात
तितकासा आवेग उरलेला नाही?

- आसावरी काकडे

Tuesday, April 04, 2006

मैफल

रविवारी मिलपिटास मधे एक अविस्मरणीय मैफल झाली. "शुभ्र फुलांच्या ज्वाला". पं. वसंतराव देशपांडेंचे नातू राहुल देशपांडे यांची. मी काही शास्त्रोक्‍त संगीताची जाणकार किंवा अभ्यासक नसल्याने, मैफिलीबद्दल काही विश्लेषणात्मक वगैरे लिहायचं धाडस नाही करत. स्वरांनी भारावलेले ते चार तास माझ्यातल्या सामान्य रसिकाला मंत्रमुग्ध करून गेले.

तेजोनिधी लोहगोल, वाटेवर काटे, घेइ छंद मकरंद, सुरत पिया, दाटून कंठ येतो, मृगनयना रसिकमोहिनी, दुनिया वेड्यांचा बाजार ... अशी सगळी नाट्य-चित्रपट गीतं आणि रागदारी. या बरोबरच वसंतरावांच्या काही आठवणी आणि काही किस्से सुद्धा.

एकदा वसंतरावांना एका खडूस श्रोत्यानं विचारले, "का हो, तुमचं कोणत्याही तबलजीशी जमतं का?" उत्तर तयार: "माझं गाणं कायम जमलेलंच असतं हो. पण तुमच्यासारख्याला ते कळावं म्हणून मी आपला साथीला तबला घेतो, झालं!"

अशा मैफिलींचा आनंद घेता येतो हेच मी माझं महाभाग्य समजते. आपण कुठे काही वाचलेलं छानसं असं दुसर्‍यांबरोबर वाटून घेऊन त्याचा आनंद द्विगुणित करता येणं तसं सोपं असतं. पण अशा सुरांच्या मैफिलीचा आनंद तुमच्यापर्यंत कसा पोचवू, कसा वाटून घेऊ, तिथे शब्द थिटे पडतात! त्या सुरांना त्या क्षणी डोळे मिटून मी माझ्यापुरते तरी बंदिस्त करून ठेवलेत. पण या निमित्तानं तुम्हीही कधी अशाच अनुभवलेल्या मैफिलीची आठवण डोळे मिटून दोन क्षण काढू शकलात, तरी माझा आनंद तुमच्या पर्यंत पोचला असं समजीन!

Tuesday, March 14, 2006

देखो मगर प्यार से!

गाडी चालवताना माझं लक्ष बर्‍याच वेळा समोरच्या गाडीच्या लायसन्स् प्लेट कडे जातं. काल सकाळी signal ला थांबले असताना एक लायसन्स् प्लेट बघितली "ANIM8AR", अर्थात "animator". इथे अशा प्लेटस् बर्‍याच वेळा बघायला मिळतात. मला कौतुक वाटतं त्या लोकांच्या कल्पकतेचं! "YFS CAR", "DON N4C", "ML8 ML8" या अजून काही लक्षात राहीलेल्या गंमतशीर पाट्या. google वर search मारला तर कदाचित मोठी यादी मिळेल.

"ANIM8AR" बघून या पाट्यांची आठवण झाली आणि एकदम भारतातल्या ट्रकच्या मागे लिहीलेली काहीच्या काही घोषवाक्यं आठवून खूप हसू आलं. अगदी "आई-वडीलांचा आशीर्वाद", "साई-कृपा" किंवा "जय भोलेनाथ" पासून "देखो मगर प्यार से", "चल मेरी धन्नो" किंवा "जंगल की रानी" पर्यंत आणि कुटुंबनियोजनाच्या घोषणांपासून ते वनसंवर्धनाच्या ब्रीदांपर्यंत काय वाट्टेल ते. तेही लिहीणार्‍यांच्या कल्पकतेचं कौतुक आहे न? आणि हे सगळं "Horn OK Please" (मधोमध कमळाचं चित्र!) याच्या अवती भवती विखुरलेलं, एक एक शब्द लावून वाक्‍य पूर्ण करायचं म्हणजे कसरत!

हे सगळं आठवून हसू आवरेना. ऑफिसच्या दारात एरिक (सहयोगी) दिसला.
"कशाला हसतीयेस इतकं?" त्यानं विचारलं.
"देखो मगर प्यारसे" अस्मादिक!
"Oh is that 'good morning' in Indian?"
"Yes", म्हणलं जरा फिरकी घ्यावी त्याची! त्याला मग "देखो मगर प्यारसे" म्हणायला शिकवलं. म्हणलं तुला कुणी Indian मुलगी पटवायची असेल तर उपयोग होईल. पठ्ठ्याची चिकाटी पण इतकी की दिवसभर घोकत होता!

आणि आज सकाळी आल्या आल्या "देखो मगर प्यारसे सुमेधा"!! आता थोडे दिवस रोज सकाळची करमणूक होणार आहे ही :-)

Friday, March 10, 2006

कळत जाते तसे...

कधी कधी कारण नसताना उदास, रिकामं वाटतं ना? बाहेर ढगाळ हवा असली, किंवा संध्याकाळी कातरवेळेला उगीचच घराची आठवण आली, किंवा दिवसभराच्या कामाचा शीण विसरायला म्हणून दोन क्षण डोळे मिटून बसलं आणि डोळे उघडल्यावर सुचत नाही काही ...

अशा वेळी मला हटकून बोरकरांची ही कविता आठवते! आपले अनुभव, त्यातून येणारं (कमीत कमी येणं अपेक्षित असलेलं) शहाणपण आणि ही उदास, रिकामी जाणीव याचा खरंच काही संबंध असतो का?

कळत जाते तसे कशी जवळचीही होतात दूर?
जुने शब्द सुने होउन वाजतात कसे बद्द निसूर?

कळत जाते तसे कसे ऊन पाण्यात खिरुन जाते
वाकुड सावल्यात वाट चुकून चांदणे कसे झुरून जाते?

कळत जाते तसे कशा मूर्ती सार्‍या झिजून जातात
पापण्यांमधले स्नेह थिजून ज्योती कशा विझून जातात?

कळत जाते तसे कशी झाडे पाखरे जीव लावतात
शब्द सारे मिटून कसे तळ्यामधेच पेंगू लागतात?

कळत जाते तसे कशा दूरच्या घंटा ऐकू येतात
दूरचे रंग दूरचे गंध प्राण कसा वेधून घेतात?

कळत जाते तसे का रे एकटा एकटा होतो जीव
राग रोष सरून कशी आपलीच आपणा येते कीव?

बा. भ. बोरकर

Monday, March 06, 2006

पाखरू

आज सकाळी खूप अस्वस्थ करणारी गोष्ट बघितली. सकाळी ऑफिसला जाताना एक चिमण्या पाखरांचा घोळका रस्त्याच्या कडेला अगदी जमिनीजवळून भरारी मारत होता. आणि माझ्या पुढच्या मोठया एस्. यू. व्ही. च्या चाकाखाली त्यातील एक पाखरू..... मला एकदम धक्का बसल्या सारखं झालं, मी कचकन् ब्रेक दाबला, अर्थात त्याचा काही उपयोग नव्हता! आणि मागच्या गाडीने जोरात हॉर्न वाजवला तो वेगळाच..

पण ते पाखरू काही दिवसभर डोक्यातून जाईना. त्याच्या घोळक्यातली पाखरं त्याला शोधत बसली असतील का? त्याला असं निपचित पडलेलं बघून चिवचिवाट करत तिथे घोटाळत राहिली असतील का? की आपल्या रोजच्या कार्यक्रमाला लागली असतील? माझ्यासारखं त्यांच्यापैकी कोणाच्या डोक्यात त्यांचा सोबती घोळत राहीला असेल का? एक न दोन.

आता थोडे दिवस तरी त्या रस्त्यावरून जाताना त्याची आठवण येत राहील...

Monday, February 27, 2006

स्मृति

कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीला प्रणाम. ही माझी खूप आवडती कविता!

नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परि स्मरते आणिक करते व्याकुळ केव्हा
त्या माजघरातिल मंद दिव्याची वात!

वार्‍यावर येथिल रातराणि ही धुंद
टाकता उसासे चरणचाल हो मंद
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
त्या परसामधला एकच तो निशिगंध

हेलावे भवती सागर येथ अफाट
तीरावर श्रीमान इमारतींचा थाट
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
तो नदीकिनारा आणि भंगला घाट

बेहोष चढे जलशांना येथिल रंग
रुणझुणता नूपुर जीव बने नि:संग
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
तू आर्त मला जो ऐकवलास अभंग

लावण्यवतींचा लालस येथ निवास
मदिरेत माणकापरी तरारे फेस
परि स्मरती आणिक करती व्याकुळ केव्हा
ते उदास डोळे, त्यातिल करूण-विलास

-कुसुमाग्रज

Friday, February 24, 2006

आहा!

अलीकडे दिसामाजी ब्लॉग "चाळायचा" छंदच जडला आहे. "marathiblogs.net" वर नवीन नोंदी तर लगेच बघायला मिळतात, पण कितीतरी वाचायच्या राहिलेल्या जुन्या नोंदी देखील खुणावत असतात. आणि एकदम असं काही गवसतं की वाटतं "आहा, मला सुद्धा अगदी हेच म्हणायचं होतं..." बहुतेक वेळा लेखकानी/लेखिकेनी ते इतक्या नेमक्या शब्दात मांडलेलं असतं, की आपला आणि त्या कधी न भेटलेल्या लेखकाचा/लेखिकेचा धागा असा जुळलेला जाणवून मन आनंदभरारी मारतं.

खूप वेळा असंही होतं की आपल्याला खूप छान काही कल्पना सुचते, आणि विश्वासच बसत नाही की हे आपल्याच डोक्यातून बाहेर आलंय्... असं वाटतं की हे नक्की आपण कुठेतरी वाचलं असणार पूर्वी! कुठल्यातरी पुस्तकात, कवितेत नाहीतर कोणाच्यातरी ब्लॉगवर. स्मरणशक्‍तीला ताण देऊन सुद्धा आठवत नाही, खूप अस्वस्थ वाटतं. आणि अचानक ध्यानी मनी नसताना ते कुठूनतरी समोर येतं आणि "आहा"!! आणि गंमत म्हणजे, तेव्हा सुद्धा आपण ते पहिल्यांदाच वाचत असतो! असं झालंय तुम्हाला कधी?

मागे नाटयप्रशिक्षण शिबीरात माधव वझेंनी सांगितलेलं काही आठवलं. आपल्या सगळ्यांनाच काहीतरी सांगायचं असतं. आपल्या सगळ्यांच्याच आत एक तोटी बंद करून ठेवलेली असते. उघडा ना ती तोटी, आणि वाहू देत ना ते विचार बाहेर. कशाला घाबरता? कशाला थोपवून ठेवता? कशाला लपवून ठेवता? फार फार तर काय होईल? लोक हसतील? हसू देत ना! आपण काही मोठे कलावंत तर होऊ बघत नाही ना, मग हसले लोक तर कुठे बिघडलं?

आणि मग हे लक्षात आलं की मला जे काही म्हणायचं आहे, ते मुक्‍तपणे प्रकट करायचा आनंद फार मोठा तर आहेच, पण कदाचित कुठेतरी कोणीतरी हे वाचून "आहा" चा आनंद घेईल, या जाणीवेतून द्विगुणित होणारा आनंद अमूल्य आहे! नाही का?

Monday, February 20, 2006

तू भ्रमत आहासी वाया

काही दिवसांपूर्वी वपुंचे "तू भ्रमत आहासी वाया" वाचले. प्रांजळपणे सांगते, पहिल्या वाचनात सगळे झेपले नाही. "कळले" नाही असे म्हणत नाही, पण खूप "जड" वाटले. मग थोडया दिवसांनी पुन्हा वाचले. खूप आवडून गेले. आपल्या सगळ्यांना रोजच्या आयुष्यात कधी ना कधी आव्हान देणारे, कधी ना कधी हुलकावणी देणारे, कधी ना कधी वेडावून जाणारे तत्त्वज्ञान एका छोटया कथाधाग्याच्या आधाराने अगदी सहज उलगडत नेले आहे. पाना-पानावरची ओळ न् ओळ आपल्याला विचार करायला भाग पाडते. सगळंच काही आपल्याला पटतं असंही नाही, पण थबकून विचार करायला लावतं. आपले अनुभव त्याच्याशी पडताळून पहायला लावतं. प्रश्न विचारायला भाग पाडतं.

"शरण आल्यानं फरक पडत नाही. रियलायझेशन केवळ पाय पकडून होत नाही. क्षमा मागणारा माणूस जास्त धोकादायक. क्षमा मागणं, चूक कबुल करणं हा बहाणा असतो. पुन: पहिल्याच मार्गावर जाण्याचा परवाना असतो, कारण वाकावं लागलं ह्याचा खोलवर राग असतो. कुणाचा तरी अपमान केला, असभ्य उद्गार काढले, आपल्या प्रतिमेला तडा गेला, तो सांधण्यासाठी माणूस क्षमा मागतो. आपण मूळचे तसे नाही आहोत, हे ठसवण्याचा तो दुबळा प्रयत्न असतो. क्षमा मागण्यानं पुन: पहिल्यासारखंच वागण्याची मोकळीक मिळते. त्याऐवजी विचार करावा."

Tuesday, February 14, 2006

गात रहा

खूप पूर्वी कवी अनिलांच्या काही कविता हाती लागल्या होत्या. वेगळी शैली आणि आशयघन कविता. त्यातली ही एक खूप लक्षात राहिली, मधून मधून गुणगुणावी अशी! कोणाकडे अजून अनिलांच्या कवितांचा संग्रह असेल तर जरूर नोंद करा!

गात रहा गात रहा आनंद देत जात रहा
उदासीचे काळे ढग आले तरी हसत रहा
जगाच्या रंगभूमीवर प्रत्येकाचेच दशावतार
त्यातला पहिला अर्भकाचा
तोच तुझा कायम तुझा
डोळ्यांमधे कौतुकाचं काजळ घालून जग पहा

झुकझुक गाडी खेळत खेळत रमत गमत फिरत रहा
जमलं तर रडणार्‍याचे डोळे पूस त्याचा देखील हव्यास नको
परवचा पाठ करु नको
कोणाचिही कविता म्हण
आली नाही तर नवीन कर

- अनिल.

Friday, February 10, 2006

उमराव जान

नाही, हे "उमराव जान" या जुन्या हिंदी सिनेमाचं परीक्षण नाही. किंवा नव्याने येऊ घातलेल्या सिनेमावरचं गॉसिप पण नाही!

मी शाळेत असताना दूरदर्शन वर "उमराव जान" रात्री जागून बघितलेला आठवतोय. तेव्हा त्यातलं काय कळलं, काय भावलं ते नाही नीट आठवत. खूप गाजलेला सिनेमा म्हणून बघितला. अर्थात आशाच्या आवाजातली भावपूर्ण गाणी आणि रेखाचा संयत अभिनय हा त्या चित्रपटाच्या यशातील मोठा वाटा होता, पण तो या ब्लॉगचा विषय नाही!

परवा परत एकदा "उमराव जान" बघितला. आणि खूप आवडून गेला. फक्‍त संगीत, अभिनय, ते वातावरण यासाठीच नाही, तर त्या कथेनी जी हु्रहूर लावली त्यासाठी. मी काही फार शोकांतिकांची चाहती नाही. पण ही कथा चटका लावून गेली.

आणि मग विचार करता लक्षात आलं की उमराव जानचा प्रवास इतका चटका लावून जातो त्याचं कारण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तिला लागलेल्या ठेचा. एका पाठोपाठ एक. तिच्या हातून हुकत जाणार्‍या गोष्टी उदास करून जातातच, पण त्याउपर त्या गोष्टी पुन्हा तिच्या रस्त्यात येऊन तिला वेडावत राहतात, त्यानी आपण गलबलून जातो! याला तिचं दुर्दैव म्हणावं की क्रूर योगायोग?

या प्रश्नापाशी मी थबकले! माझा "नशीब" या कल्पनेवर विश्वास आहे. पण सगळ्यांचा असतो असं नाही. माझ्या काही मित्र-मैत्रीणींचं असं मत आहे नशीब, प्राक्‍तन, दैव असं काही नसतंच, असतात फक्‍त योगायोग. आणि ते योगायोग सुद्धा कधी सुखावह ठरतात तर कधी दुखरे, हाही योगायोगच! तसं पाहीलं तर नशीब आणि योग यातील सीमारेषा पुसटच आहे. पण नशीब म्हणलं की ते कुणाच्या तरी माथी लिहीलेलं, प्रत्येकाचं वेगळं असं. आणि योग हा कोणाचाही असू शकतो, probability च्या व्याख्येप्रमाणे फक्‍त एक "शक्यता".

"नशीब" काय किंवा "योगायोग" काय, उत्तर न सापडणार्‍या प्रश्नांची ही आपण तयार केलेली उत्तरं आहेत, हे मात्र खरं. उमराव जाननी याची फक्‍त आठवण करून दिली! आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातले काही टोकाचे योगायोगच तर आपलं आयुष्य कधीतरी नाट्यमय करून टाकतात. कल्पनेतल्या उमरावच्या नशीबी असे दुखरे योगायोग आले (?), त्याला काय म्हणावं?

Wednesday, February 08, 2006

वरदान

नव्या वाटा ही नोंद वाचली, आणि वहीमधे लिहून ठेवलेली ही शांता शेळकेंची पूर्ण कविता इथे नोंदल्यावाचून राहावत नाही!!

किती सुंदर असते हे विस्मृतीचे वरदान
भूतकाळ चालला आहे अटळपणे विरघळत
आणि जिवापलीकडे जपून ठेवलेल्या
टवटवीत क्षणांच्याही पाकळ्या राहतात गळत!

पायाखालच्या जुन्या दिशा जरी हरवल्या
तरी नव्या वाटा घेतात त्यांची जागा
आणि प्रत्येक नव्या वळणावर पुन्हा
असतातच डवरलेल्या अनोख्या फुलबागा!

दिले होते मी आश्वासन प्रिय अनुभवांना
की ढळू देणार नाही हॄदयातले त्यांचे स्थान
पण तेव्हा कुठे ठाऊक होते मला
की अंतस्थ देखील बघता बघता होते बेइमान?

रात्र आसवांत भिजते, गदगदते हुंदक्यांनी
तरीही एकवटून अवघा आवेग, जोर
भविष्याची दुर्दम्य आश्वासने पदरात घेऊन
रसरसलेली हसरी पहाट ठाकतेच समोर!

नव्या वळणावरुन पुढे डोकाऊन बघायला धैर्य लागतं! तसंच जुन्या प्रिय-अप्रिय आठवणी आपण विसरुन चाललोय हे स्वीकारायला सुद्धा.

जुन्याला "अलविदा" करायचं आणि नव्याचं स्वागत करायचं धैर्य कायम माझ्या ठायी असू दे!

Sunday, February 05, 2006

बोलगाणी

पाडगावकरांची "बोलगाणी" आपल्या सगळ्यांचीच खूप लाडकी. या नावातच इतका निरागस आनंद भरून आहे, तो प्रत्येक गाण्यातून आपल्या बरोबर गुणगुणत राहतो!

"बोलगाणी" म्हणता क्षणी "प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे, प्रेम असतं", किंवा "शीळ घालत माणसं" किंवा "सांगा कसं जगायचं" ही गाणी आपल्या पटकन ओठावर येतात. आणि त्या गाण्यांचं अगदी रंगून जाऊन वाचन करणारी पाडगावकरांची प्रसन्न हसरी मूर्ती डोळ्यांसमोर येते!

त्यातलीच काही "वेडी" "चिमणी" बोलगाणी ...

भास
खिडकीतून चांदणं आत येत नाही,
तो नुसताच भास असतो!
खरं तर चांदण्यासारखा भासणारा
तो तुझा भारावलेला श्वास असतो!

खरं गाणं
पाखरांना ठाउक असतं,
बाजारात गळा विकून
आपलं खरं गाणं कधी गाता येत नाही!
सोन्याच्या पिंजर्‍याला पंख विकून
आभाळाच्या जवळ जाता येत नाही.

गूढ
मला सांग,
फुलपाखरु तुझ्याकडेच कसं वळलं?
फांदी सगळी रिकामी असूनही
फुलं येणार हे तुला कसं कळलं?

श्रेय
कधी कधी सगळंच कसं चुकत जातं!
नको ते हातात येतं, हवं ते हुकत जातं!
अशा वेळी काय करावं?
सुकलेल्या झाडाला न बोलता पाणी द्यावं!

Friday, February 03, 2006

कधी एकदा

आज विदुला च्या ब्लॉग वर समस्यापूर्तीचं आवाहन बघितलं आणि पुन्हा एकदा शाळेच्या दिवसांची आठवण झाली!

आमच्या शाळेच्या वार्षिकासाठी दर वर्षी एक समस्यापूर्तीची स्पर्धा असायची. आगटे बाई स्वत: कविता करायच्या, आणि त्याच्या पहिल्या एक किंवा दोन ओळी फक्‍त द्यायच्या. त्या स्पर्धेतली उत्तम कविता आणि बाईंची मूळ कविता दोन्ही मग वार्षिकात प्रसिद्ध होत.

तशी माझी स्मरणशक्‍ती काही फार भक्कम नाही. पण कशा कोणास ठाउक, एका वर्षीच्या समस्यापूर्तीच्या 2 ओळी माझ्या लक्षात राहिल्या. त्या बाईंच्या मूळ कवितेच्या होत्या की बक्षिस मिळालेल्या कवितेच्या हे सुद्धा आता आठवत नाही. आणि बर्‍याच वर्षांनंतर मला पुढच्या काही ओळी सुचल्या.


अशीच येते कधी एकदा उत्साहाला भरती ताजी
आणि मनाच्या आकाशातुन मनोरथांची आतषबाजी

असाच येतो कधी एकदा आठवणींना पूर केव्हढा
आणि मनाच्या कुपीत राही दरवळणारा गंध-केवडा

अशाच येती कधी एकदा सैरभैरही विचारधारा
आणि मनाच्या चित्री उमटे आकांक्षांचा मोरपिसारा

अशीच होते कधी एकदा श्रद्धासुमनांची उधळण
आणि मनाच्या गाभार्‍यातुन भावभक्‍तीची ओंजळ अर्पण

असेही येती कधी एकदा रिते हुंदके उदासवाणे
तरीहि मनाला हसवत खेळत गात रहावे जीवनगाणे

Wednesday, February 01, 2006

जीवन

"जीवन" हा शब्द कोणी नेहेमीच्या संभाषणात वापरला, की मला शाळेच्या दिवसांची आठवण येते. शाळेत असताना आमची एक मैत्रीण खूप जड जड भाषेत निबंध लिहायची. अर्थात, अतिशय हुशार आणि हळवी असलेली ही सखी आम्हा सर्वांचा अभिमानाचा विषय होती. तेव्हा हे लिहीण्या आधी तिची माफी मागते :-)
तर ही सखी निबंधातच जड जड शब्द वापरायची असं नाही, तर बोलताना सुद्धा बरेच वेळा "जीवन", "ध्येय", "अभिमान" असे शब्द अगदी सहजपणे वापरायची. आणि खरे सांगायचे तर तिच्या व्यक्‍तिमत्त्वाला ते शोभूनही दिसायचे. पण आम्ही बाकीच्या सामान्य मुली तिची चेष्टा करायची संधी कशाला सोडू? आम्ही भूमितीच्या तासाला मुद्दाम "g1", असे जोरात म्हणून मग "g2, g3, g4...." असं म्हणून खिदळायचो!!

तेव्हा आता मला "जीवन" या विषयावर काही लिहायचा फार अधिकार नाही!! पण कुसुमाग्रजांची ही कविता नक्की नोंदू शकते!

अनंततेचे गहन सरोवर
त्यात कडेला विश्वकमल हे
फुले सनातन
त्या कमळाच्या
एका दलावर
पडले आहे
थोडे दहिवर
थरथरणार्‍या त्या थेंबाला
पृथ्वीवरचे आम्ही मानव
म्हणतो जीवन

Monday, January 30, 2006

श्री गणेशा

मराठी ब्लॉगविश्वात प्रवेश करताना सर्व प्रथम ही परंपरा सुरु करणार्‍या आणि पुढे नेणार्‍या कित्येक मित्र-मैत्रीणींना प्रणाम!

बाकीच्या अनेक ब्लॉग प्रमाणे मी सुद्धा "मी हे का लिहीतीये?" याचे उत्तर देऊन सुरुवात करते. आणि कोण्या एका ब्लॉग वर वाचलेल्या या चारोळीची नोंद करते (गोखले आणि मूळ ब्लॉगर दोघांची माफी मागून):

वाचणारं कोणी असेल तर ब्लॉग लिहीण्यात अर्थ आहे
लिहायला काही सुचणार नसेल तर ब्लॉगस्पेस सुद्धा व्यर्थ आहे!

माझ्या एका मित्राचे मत आहे की, पत्र हे एकाच वेळी स्वगत आणि संवाद दोन्ही असते. ब्लॉग बद्दलही असंच म्हणता येईल न? तर असं हे थोडंसं स्वगत, थोडासा संवाद, आपला आपल्याशी आणि तुम्हा सर्वांशी. कधी काही आवडलेल्या कविता, उतारे, कधी स्वैर विचार. आणि सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे, "का नाही लिहायचे"?

शाळेत असताना प्रत्येक नवीन वहीच्या पहिल्या पानावर आपण नाव, यत्ता, विषय वगैरे लिहायचो. त्याशिवाय कोणी "श्री गणेशाय नम:" लिहायचे, कोणी ॐ काढायचे. मला कधीतरी तुकोबांच्या ओळी भावून गेल्या, म्हणून लिहायला सुरुवात केली

हेचि दान देगा देवा
तुझा विसर न व्हावा

त्याच चालीवर आज पहिला वहिला ब्लॉग प्रसिद्ध करताना, पहिल्या पानावर लिहीते

हेचि दान देगा ब्लॉग देवा
दिसामाजी काही ब्लॉग सुचावा