Thursday, June 22, 2006

चढलेली गाणी

नवीन गाणी ऐकली की नक्की कधी आणि कशी आवडायला लागतात, हे सांगणं कठीण आहे. शाळा-कॉलेजात असताना सिनेमातली गाणी तर दिवसरात्र रेडिओवर, टी. व्ही. वर, गल्लीत लाउडस्पीकरवर ऐकून ऐकून आवडायला लागलेली खूप आहेत. तेही नेमकी परीक्षेच्या वेळेला. सिनेमातलीच कशाला, मी "माझा कोंबडा कोणी मारियला..." सुद्धा ऐकून ऐकून गुणगुणायला लागले होते, आणि आईची बोलणी पण खाल्ली होती. भारत सोडल्यापासून या आनंदाला मुकली आहे! म्हणजे गाणी टी. व्ही.-रेडिओवर ऐकायला मिळातात, पण "कोंबड्याची" सर नाही ;-)

फार थोडी गाणी अशी असतात की जी एकदाच ऐकून आवडून जातात. मला तर नवीन गाणं तीन-चार वेळा ऐकून, त्याचे शब्द नीट समजल्याशिवायत त्यात अगदी क्वचितच रस निर्माण होतो. नुसतीच धुन आवडली, आणि मग शब्द काहीही असले तरी चालेल असं नाही चालत. पण सगळीच नवीन गाणी खूप वेळा ऐकून आवडतात असंही नाही. त्यामुळे एखादी नवीन CD आणली की ती गाडीमधे बरेच दिवस असंख्य वेळा वाजत राहते. त्यातली काही गाणी आवडतात, काही खूप आवडतात, आणि काही चक्क चढतात! असं चढलेलं गाणं लागोपाठ दहा-बारा वेळा ऐकते मी. अगदी तोंडपाठ झाल्याशिवाय थांबतच नाही. आवडलेली, खूप आवडलेली गाणी सुद्धा पुन्हा पुन्हा ऐकली जातात, पण चढलेल्या गाण्यांची नशा वेगळीच असते न?

हे सगळं सांगायचं कारण म्हणजे अलिकडचं चढलेलं गाणं. सध्या पद्मजा फेणाणी जोगळेकरांची नवीन CD वाजतीये रोज गाडीत. यात इंदिरा संतांच्या चार कविता, शंकर रामाणी यांच्या दोन आणि कुसुमाग्रजांची "पृथ्वीचे प्रेमगीत" अशी गाणी पद्मजांच्या आवाजात आहेत. इंदिरा संतांच्या सोप्या, मोकळ्या, साधेपणातील सौंदर्याची ओळख ओळीओळीतून पटवून देणार्‍या कविता तर मोहक आहेतच. पृथ्वीचे प्रेमगीत बद्दल मी नव्याने काय सांगणार? पण मला शंकर रामाणींच्या कवितांची मात्र ओळख पहिल्यांदाच झाली. आणि त्या दोन्ही कविता चढल्या. त्यातली ही एक कविता.

सांजघडी सातजणी पाणियाला गेल्या
सावल्यात हरवून वाट विसरल्या

वाट विसरल्या आणि विसरल्या घाट
सात जणींच्या सावल्या झाल्या घनदाट

खोल सावळल्या तरी, सावरल्या काय
मनमोराला फुटले इथे तिथे पाय

सांजघडी सातजणी पाणियाला गेल्या
सावळ्यात हरवून वाट विसरल्या

हा सावल्या आणि सावळ्याचा खेळ किती वेधक आहे! आणि त्याच्या जोडीला सुंदर संगीत आणि पद्मजांचा मधुर आवाज, गाणं चढलं नाही तरच नवल!!