Saturday, November 08, 2008

रचुया पुस्तक पंढरी...

असं कधी तुम्हाला झालंय का? एखाद्या कवितेची एखादी ओळ आठवतीये, खूप पूर्वी वाचलेल्या पुस्तकातला एखादा संवाद आठवतोय, शाळेच्या पुस्तकातला एखादा उतारा आठवतोय पण काही केल्या पुढचं काही आठवत नाही. भारतातल्या घरी पुस्तकांच्या कपाटात ते पुस्तक नेमकं कुठे आहे हेसुद्धा माहीत असतं. आणि आत्ता जाऊन ते उघडून बघावं या तीव्र इच्छेनी सगळा दिवस अस्वस्थतेत जातो. शेवटी एकदाची संध्याकाळ होते, तुम्ही फोन फिरवता आणि कोणीतरी "घरुन" पुढच्या ओळी वाचून दाखवतं! तेव्हा कुठे चैने पडतं!

किंवा तुम्ही भारतातही असलात तरी एखादं जुनं पुस्तक, नाटक,कवितासंग्रह शोधशोधून सुद्धा मिळत नाही. अप्पा बळवंत चौक पालथा घालून झालेला असतो, बुजूर्ग मित्र-नातेवाईकांच्या पायर्‍या चढून झालेल्या असतात. त्यांच्याकडून त्या पुस्तकाबद्दल ऐकायला मिळतं पण पुस्तक काही मिळत नाही. विद्यापीठाच्या ग्रंथालयातून नेमकी शेवटची प्रत गहाळ झालेली असते :(

"आत्ता ते पुस्तक online असतं तर..." विचार मनाला शिवून जातो. अगदी याच विचारानी सुरु झालेला प्रकल्प आहे marathipustake.org. तुम्ही भेट दिलीये? नसेल तर जरुर द्या!

मराठीतील जुनी दुर्मिळ पण मौल्यवान पुस्तके digitize करून internet वर मुक्‍तपणे सर्वांना उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. जी पुस्तकं आता दुकानातून नाहीशी झाली आहेत, ग्रंथालयातूनही कदाचितच उपलब्ध आहेत. ज्या पुस्तकांनी इतिहास घडवला आहे, पण तरी आज फक्‍त नावंच उरली आहेत. संत वाङमय, जुनी नाटकं, कविता, निबंध. हे सगळं जुनं सोनं पुनर्जीवित करून सर्वांना उपलब्ध करून देणे हा एकच उद्देश. यासाठी लेखाधिकाराच्या कक्षेबाहेरची पुस्तके मिळवून टंकलिखित करणे हे मुख्य काम स्वयंसेवकांच्या प्रयासानी सुरु आहे.

अर्थात हा महत्त्वाकांक्षी दूरदर्शी प्रकल्प दीर्घकाळ चालू ठेवायला आणि यशस्वी करायला गरज आहे मराठी साहित्यप्रेमी स्वयंसेवकांची! California च्या San Francisco Bay Area मधील CalAA (California Arts Association) या संस्थेतर्फे या प्रकल्पास हातभार लावण्यासाठी नुकतेच संघटित प्रयत्न सुरु झाले आहेत. तुम्हाला या प्रकल्पात सामील व्हायला आवडेल?

या प्रकल्पासाठी पुस्तके सुचविणे, शक्य असल्यास ती मिळविणे, मराठी टंकलेखनात भाग घेऊन ती पुस्तके digitize करणे, आणि टंकित झालेल्या पुस्तकांचे मुद्रितशोधन (proof-reading) करणे अशा विविध प्रकारे तुम्ही योगदान देऊ शकता. उदा. सध्या आम्ही "समग्र बालकवी" चे टंकलेखन सुरु केले आहे.

तुम्हाला या प्रकल्पा बद्दल काही प्रश्न असतील, तर मला या ब्लॉगवर प्रतिक्रियेद्वारे संपर्क करा. या प्रकल्पात सामील होण्यासाठी PustaCalAA या google - इ-पत्र गटात सामील व्हा, बाकीच्या सभासदांशी संवाद साधा, आत्तापर्यंत सुचवलेली पुस्तके बघा, अजून पुस्तके सुचवा, ती मिळवून सर्वांपर्यंत पोचवा आणि टंकलेखनाच्या कामात सहभागी व्हा! त्यासाठी तुमच्या प्रतिक्रियेत तुमचा email पत्ता कळवा (मी तो प्रसिद्ध करणार नाही!). किंवा तुमचा google ID वापरून या गटाच्या सभासदत्त्वाचा अर्ज करा!

तुमच्या उत्साही प्रतिसादाची वाट बघते :)

Monday, November 03, 2008

मंगल तोरण

आज किती दिवसांनी इंद्र धनुष्य भेटलं! तेसुद्धा कसं? एखादा रोमांचक नाट्यसोहळा व्हावा तसं!

आणि रंगमंच तरी काय सजला होता! आकाशात वर बघावं तर अगदी गर्द निळे ढग. धीरगंभीर, अविचल उत्सुकतेनं सोहळ्यासाठी तयार झालेले! आणि कुठून तरी चुकार सूर्यकिरण डोकावत होतेच! असा जादूई सोनेरी प्रकाश अक्षरश: सांडला होता न सगळीकडे, की प्राजक्‍ताची फुलं नाजूक हातानं वेचावी तसा तो जाऊन वेचता आला तर आयुष्यभर जपून ठेवता येईल असं वाटलं! सगळं खरंच शांत झालं की माझ्या संवेदना बाकी काही टिपेना झाल्या कोणास ठाऊक! आणि मग अचानक "lights, camera rolling, ACTION" असं कोणी म्हणावं आणि नटून थटून सज्ज झालेल्या कलाकारानी प्रवेश करावा, तसे ते सातही रंग प्रकट झाले, बघता बघता गडद होत गेले! काय झोकदार प्रवेश! सातही रंग पारखून घ्यावे, चित्रही तेच, नाट्यही तेच, नृत्यही तेच आणि संगीतही तेच! साथ होती नं, उत्स्फूर्तपणे वाजणार्‍या वार्‍याच्या शीळेतून आणि उत्साहानी पिटणार्‍या पानांच्या टाळ्यांतून खुलत जाणारी! बाकी आकाशात काहीच हालचाल नाही! सहकलाकारही दिपून, दबून गेले असावेत, तो रंगसोहळा बघून आपला पदन्यास विसरून गेले असावेत? की त्या सप्तरंगांच्या जादूवर खिळून राहिलेल्या माझ्या नजरेनी त्यांची नृत्यसाथ टिपली नसावी?

किती वेळ झाला असेल माहीत नाही! मग त्या आकाशातल्या नायकाचं दिलखुलास मिरवून झालं म्हणून, की ढळणार्‍या सूर्याची साथ करत जाणं भाग पडलं म्हणून की डोंगरांपलिकडे दुसरा रंगमंच सजताना दिसतोय म्हणून; त्यानी आपलं प्रदर्शन आवरतं घेतलं खरं! आणि तेही कसं डौलानं. एका क्षितिजावर घट्ट पाय रोवून दुसर्‍या टोकाकडून हळूच अंग चोरून घेत. त्याच्यावर खिळलेली माझी नजर सुद्धा आकाशात एक गोफ विणत गेली, गोलाकार, झोकदार!

पण छे! नाट्य संपलं नव्हतं अजून! आता तर सहकलाकारांना उत्साह आला. भानावर येऊन, अंग घुसळून आसमंत त्यांनी दणाणून सोडला आणि क्षणार्धात चारी दिशा चिंब भिजवून टाकल्या! त्या नव्यानी सुरु झालेल्या नाट्यातून त्यांचा निरोप खचित माझ्यापर्यंत पोचला,

"असतील त्याच्याकडे रंग तेजस्वी, आमचेही नृत्य कौशल्य काही कमी नाही!"

"हो रे बाबांनो!"

मी हसत माझ्या कामाला लागले. खिडकी सोडताना आता कुठे लक्ष गेलं रस्त्यावर शिस्तीत धावणार्‍या गाड्यांकडे! नुसतंच हसून त्यांना म्हणाले, "रंगमंदिरात हजर असूनसुद्धा हा अप्रतिम सोहळा सोडून नीरस रस्त्याकडे बघावं लागणं हे काय अहोदुर्भाग्य! तुम्हालाही कधीतरी तो कलाकार उराउरी भेटू दे!"

कोणे एके काळी अशाच कुठल्याशा अनुभूतीला बालकवींनी शब्दबद्ध केले असेल न? आज तो सोहळा त्या सदाबहार शब्दांची अनुभूति देत भिजवून गेला! आणि तो डोळ्यांसमोर तरळत असतानाच मी त्या रंगांच्या जादूगाराला प्रश्न केला, पुढची भेट कधी? अशीच अवचित?

Thursday, August 28, 2008

साखळी हायकू!

बर्‍याच वर्षांपूर्वी कोणीतरी हायकू या प्रकाराची ओळख करून देताना हे ऐकवलं होतं :

देवळातल्या घंटेचा
आवाज दूरवर लोपला
रस्ता तिथेच संपला!

काही दिवसांपूर्वी ते असंच आठवलं आणि काही केल्या डोक्यातून जाईना. मागच्या आठवड्यात संवेदनी काव्यमय खो खो सुरु केला. आज सागरनी माझ्या कवितेवर कवितारुपी प्रतिक्रिया धाडली आणि या सगळ्यातून साखळी हायकूची कल्पना सुचली.

तर नियम :

१) वर दिलेल्या हायकू प्रमाणे दोन किंवा तीनच ओळींचा (की ओळींची?) हायकू रचायचा.
२) त्यातील मात्रा, ताल, ध्वनीरुप तसंच्या तसं आलं तर उत्तम, शक्य तितकं साम्य राखायचा प्रयत्न करायचा.
३) सर्वात महत्त्वाचे, ही साखळी असल्यामुळे तुम्ही जी कडी गुंफणार आहात तिची आधीच्या कडीशी काहीतरी जोडणी असावी : त्यातील लपलेल्या किंवा स्पष्ट दिसणार्‍या अर्थानुसार, त्यातील वापरलेल्या प्रतिमेनुसार, सुचित केलेल्या कल्पनेनुसार किंवा व्यक्‍त होणार्‍या भावनेनुसार किंवा अजून काही असेल!
४) कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त ३ जणांना खो द्यायचा. त्यांच्या ब्लॉगवर त्यांना प्रतिक्रिया देऊन तसं कळवायचं आणि शक्य असल्यास माझ्या ब्लॉगवर मला कळवायचं. मला कळवायचा हेतू इतकाच की मी सगळ्या कड्या एकत्र करू शकीन.
५) तुमच्या नोंदीच्या सुरुवातीला हे नियम डकवा, तुम्ही ज्या कडीच्या पुढे लिहीताय ती कडी उतरवा, आणि शक्यतो तुम्ही ज्यांना खो देताय त्यांच्या ब्लॉगची link द्या.

आता माझी कडी:

रस्त्यातल्या फुलांचा
धुंद गंध दरवळला
मुक्काम तिथेच हरवला!

आणि माझा खो संवेद, सागर आणि चक्रपाणिला.

ता. क. : सईनी हायकूवर एक छान नोंद मांडली आहे!

Sunday, August 24, 2008

आवडलेले थोडे काही

संवेदनी सुरु केलेला खो-खो क्षिप्रा कडून माझ्यापर्यंत पोचला!

संवेदचे नियम इथे परत देते:

१. कविता आवडते पण पुर्ण आठवत नाही आणि हाताशी पुस्तकही नाही? हरकत नाही, आठवतं तेव्हढं लिहा. कवीचं नाव मात्र आवश्य लिहा
२. एक से मेरा क्या होगा सिन्ड्रोम? या वेळी तुम्ही तुमच्या सध्या आवडणारया टॉप २ कविता लिहु शकता आणि कवितांच्या प्रमाणात खो देखील देऊ शकता. जेव्हढ्या कविता तेव्हढे खो (जास्तीजास्त अर्थात २)
३. खो खो नीट चालवण्याची जबाबदारी अर्थात सारयांचीच. त्यामुळे तुमच्या पोस्ट मधे तुम्ही ज्या/जिला खो देताय, त्या/तीचं नाव तर लिहाच, शिवाय त्या/तिच्या ब्लॉगवर ही खो दिल्याची नोंद आवश्य करा
४. कविता का आवडली किंवा कवितेचा अर्थ किंवा काहीच स्पष्टीकरण आपेक्षित नाही
५. अजून नियम नाहीत :)


जोगीण

साद घालशील तेव्हाच येईन
जितकं मागशील तितकंच देईन
दिल्यानंतर देहावेगळ्या
सावलीसारखी निघून जाईन!

तुझा मुकुट मागणार नाही
सभेत नातं सांगणार नाही
माझ्यामधल्या तुझेपणात
जोगीण बनून जगत राहीन!

- कुसुमाग्रज



तुझ्या एका हाकेसाठी

तुझ्या एका हाकेसाठी,
किती बघावी रे वाट,
माझी अधिरता मोठी
तुझे मौन ही अफाट!

तुझ्या एका हाकेसाठी,
उभी कधीची दारात,
तुझी चाहूलही नाही
होते माझीच वरात!

आले दिशा ओलांडून,
दिली सोडून रहाटी
दंगा दारात हा माझा,
तुझ्या एका हाकेसाठी!

तुझ्या एका हाकेसाठी,
साद मीच का घालावी?
सात सुरांची आरास,
मीच मांडून मोडावी!

- यशवंत देव


माझा खो प्रिया आणि सारिकाला!

Tuesday, August 05, 2008

खेड्यामधले...

हे सगळं का आठवलं तेच आठवेना...

छोटासा गाभारा. मधोमध शंकराची पिंडी. दोन्ही बाजूच्या भिंतींवर चौकोनी खिडक्या, कधीच बंद न होणार्‍या. अंगाचं मुटकुळं करून बसता येईल (म्हणजे तेव्हा तरी यायचं, लहानपणी हो!) इतक्या रुंदीच्या. पण या सगळ्यापेक्षा ते देऊळ आठवलं की फक्‍त तो भरून राहिलेला वास आठवतो. तेलाच्या दिवाच्या विझत आलेल्या वातीचा वास. त्यात मिसळलेला धुपाचा वास. त्यात मिसळलेला फुलांचा सुकलेला वास. आणि थोडासा बेलपत्रांचा हिरवट वास. ह्यॅ! तसला वास फक्‍त स्मरणातच आहे आता.

सटाण्याचं जुनं घर. रस्त्यापासून चार पायर्‍या चढून वर उंचावर. घराला काटकोनात ते देऊळ. देवळासमोरचा नंदी अगदी अंगणातच. घराचा मोठा दरवाजा, मधली बैठी खिडकी, बैठक. बैठकीत कोपर्‍यात जुनं कपाट आणि जुनं डेस्क. वरचा उघडा माळा, म्हणजे तिथून थेट बैठकीत उडी मारता येईल असा.

मग बैठकीतून आत गेलं की वर जायला जिना आणि डावीकडे प्रचंड मोठं मधलं घर, कायमच अंधारलेलं. त्या जिन्यात एक छोटी गजांची खिडकी, त्यातून छान दिसणारा मधल्या घराचा मोठा भाग. कित्ती वेळा त्या खिडकीत गर्दी करून, या पायावरून त्यापायावर ताटकळत मोठ्या पुरुष लोकांची जेवणं व्हायची वाट बघत बसणारी आम्ही मुलं. मधल्या घरातून डावीकडे छोटी खोली, आजोबांची. आणि उजवीकडे स्वयपाक घर. स्वयपाक घरातून मागे गेलं की माजघर, मग मागचं अंगण. तिथेच कोपर्‍यात मोरी. एकीकडे बुजलेली विहीर, पण आईच्या आठवणीत असलेलं आणि तिथे उभे राहून नुसतंच कल्पना केलेलं ते विहीरीतून पाणी शेंदणं.

स्वयपाकघरातल्या चुलीचा धूर. शेणानी सारवलेली जमीन. हे थोरलं देवघर - अंधारं, खोल, पण आत डोकावताच शांत वाटणारं. जेवणाच्या पंक्‍तींच्या पत्रावळी आणि द्रोण. कुठेकुठे भिंतीत कोनाडे, त्यात कुठे घड्याळ, कुठे चंची, कुठे वाती होण्याची वाट बघत बसलेला कापूस, कुठे वाळून कोरड्या झालेल्या अमृतांजनची बाटली!

जिन्यावरून चढून गेलं की डावीकडे मोठी झोपायची खोली. खोलीच्या खिडकीतून दिसणारं मागचं अंगण. एका बाजूला तो उघडा माळा ज्यातून खालच्या बैठकीवर उडी मारता आली असती. या खोलीत अगदी हलक्या पावलानी चालायचं. उड्या मारणं नाचणं तर दूरची गोष्ट. कारण जरा जोरानं पावलं टाकली तर खाली मधल्या घरात माती पदते अशी वदंता! आजोबांच्या धाकानं ते खरं की खोटं हे पडताळुन बघायची कोणाची हिंमत असणार!

आणि जिन्यातून उजवीकडे उघडा मोठा ढाबा. त्यावर मोकाट उगवलेलं गवत. त्या ढाब्यावरून थेट पुढच्या अंगणात उडी मारता येईल, म्हणून आम्हा लहान पोरांना तिथे न जाण्याची ताकीद, आणि म्हणूनच आमची मोठ्यांची नजर चुकवून तिथे जाण्याची धडपड. दादा लोक तिथे आपण सर्रास जात असल्याची फुशारकी मिरवणारे!

संध्याकाळी देवळात जमणार्‍या पोरी बाळी. बरोबर आणलेले पितळीचे दिवे मातीनं घासून लख्ख करणार्‍या. देवळात दिवा लावून खिदळत शिवणापाणी खेळणार्‍या. परकराचे ओचे बांधून देवळासमोरच्या ओबडधोबड नंदीभवती लंगडी घालणार्‍या. अंधार पडून दिसेनासं होईपर्यंत पायानी धूळ उडवत गलका करत राहणार्‍या.

हे सगळं का आठवलं तेच आठवेना...

आठवणींना कुठे लागतात निमित्तांचे हिंदोळे?

Friday, June 13, 2008

पाणीच पाणी ...

पाणी, विपुल पाणी.

खळाळतं पाणी, स्तब्ध पाणी.

शांतपणे वाहणारं, गर्जना करणारं, नुसतंच धीरगंभीर.

काहीतरी नातं आहे जरूर. जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी पाण्याच्या जवळ गेलं की ते नातं उब देत राहतं. मग ती अगदी लहानपणी कोलाडच्या नदीत मारलेली डुबकी असेल. एका पावसाळ्यात पुण्याच्या बालगंधर्व पुलावरून पाहिलेली, कधी नव्हे ते भरभरून वाहणारी मुठा असेल. किंवा खळखळत खिदळत जाणारी स्फटिक शुभ्र हृषिकेशची गंगामाई असेल! आणि देशोदेशीच्या हौशी पर्यटकांबरोबर घेतलेल्या बोट राइड मधून अगदी ओझरतीच भेटलेली सेंन नदी, थेम्स् नदी, सिंगापूर नदी असेल.

भीमाशंकर असेल, होगानिकल असेल, किंवा जगप्रसिद्ध नायगरा! उंचीवरून कशाची पर्वा न करता कोसळणारं पाणी! मुबलक पाणी! आपलाच आवाज आपल्याला ऐकू न येईल इतकी गर्जना करणारं मोठं आणि केसांच्या बटांमधे अडकून चिमुकल्या मोत्यांचं रुप घेण्याइतकं छोटं!

आणि आपल्यात बाकी सार्‍यांना सामावून घेणार्‍या खुळ्या सागराबद्दल तर काय बोलावं. गणपतीपुळ्या पासून कन्याकुमारी पर्यंत आणि चौपटीपासून हाफमून बे पर्यंत. वेगवेगळी रूपं पण एकच गाज. वेगवेगळे रंग, कुठे उगवतीचे कुठे मावळतीचे, कधी चमचमणारे चंचल तर कधी शांत, गंभीर; पण एकच अस्तित्त्व.

सगळंच तर पाणी. आपल्या सहवासानी शांत करणारं. पाण्याशी नातं म्हणलं ना ते हे. एकांताचं. कुठेही कधीही पाण्याला भेटायला गेलं की भोवती किती का गर्दी असेना, "हा संवाद फक्‍त आपल्या दोघांचा हं" असं म्हणणारं. आपलं अस्तित्त्व विरघळून टाकणारं. खळखळाटातून संगीत, तरंगांतून रंग आणि लहरींतून आकाराची भाषा बोलणारं नातं.

याच नात्याच्या अनुभूतीतून अरती प्रभूंना सुचलं असेल का?


पाणी स्तब्ध आहे ...
त्याने आपल्या रंगाची चिरगुटें
सांजउन्हासारखी वाळत घातली आहेत
काठाकाठावरील बाळमुठींनी घडवलेल्या
वाळूच्या मनोर्‍यांवर .
पाण्याखालचा तळ तरंगापासून अंतरंगापर्यंत
त्याही पल्याड आरसा होऊ पहात आहे;
होडी सुद्धा पायांतळी
सांजउन्हाची साखळी सोडून उभी आहे
सनईच्या सादेसाठी.
स्तब्ध आहे ... पाणी स्तब्ध आहे ...

Sunday, April 13, 2008

प्रश्न तत्त्वाचा आहे..

परवा एका मित्राचं पत्र आलं होतं. साहेबांनी फारच मनावर घेउन, पेटून वगैरे लिहीलं होतं. बाकी तपशील जाउद्या, पण स्वत:च्या मनाविरुद्ध घरात काही धार्मिक कर्मकांड करावं लागल्यामुळे झालेली चिडचीड पत्रात अगदी पुरेपूर दिसत होती. आणि एक पराभव आणि अपमान झाल्याचा सूरही.

आपल्या मनाविरुद्ध कुठलीही गोष्ट करावी लागणं यातून होणारा त्रास कधी ना कधी सगळ्यांना अनुभवावा लागतो. त्यातून जर "प्रश्न तत्त्वाचा" असेल तर मग विचारायलाच नको! म्हणजे या मित्राच्या बाबतीत, कर्मकांडांना त्याचा तत्त्वत: विरोध असूनही केवळ घरच्या बाकीचांच्या आग्रहावरून त्याला माघार घ्यावी लागली हे तर स्पष्ट आहे. पण मग त्याची पराभूत मन:स्थिती, राग आणि अपमान कितपत समर्थनीय आहे हे मला कळेना. आपल्या जवळच्या, प्रिय व्यक्‍ती, कुटूंबीय यांच्या साठी आपल्या तत्त्वांना मुरड घालावी लागणे हा पराभव समजावा का?

आणि त्याहीपलिकडे हा पराभव आपला आहे की तत्त्वाचा? मुळात इतका अपमान होण्याइतके आपण मोठे आहोत का? असू, तर मग ज्यांकडून आपला पराभव झाला (असं आपल्याला वाटंतय्) ते आपल्याहीपेक्षा आणि आपल्या "तत्त्वा"पेक्षा मोठे असणार नं? आणि नसू, तर असं धुसफुसत रहाण्यापेक्षा, आपल्याला अजून बरंच मोठं व्हायचं आहे असं समजावं का?

केवळ तत्त्वासाठी मैत्र्या, नाती तुटलेली आपण बघतोच की. पण नात्यांसाठी तत्त्वांना मु्रड घातलेलीही बघतो. मग नात्यांमधला कडूपणा स्वीकारून "तत्त्वनिष्ठा" जपणारे आपण की नात्यांचं मोल तत्त्वांपेक्षा वरचढ ठरवणारे आपण? आणि बाकी वेळेला तत्त्वांचा उदो उदो करत फिरणारे जेव्हा नात्यांसाठी तडजोड करतो, तेव्हा दांभिक होतो का आपण? आणि काळाच्या ओघात नात्यांची उलथापालथ होऊ शकते, तशीच तत्त्वं सुद्धा बदलणार नाहीत याची काय हमी?

मित्राची मारे अशाच काही शब्दात समजूत घालून मी मोकळी झाले. पण माझ्यावर अशी वेळ आली की हे प्रश्न भेडसावत रहाणार ही जाणीवही झाली.

शेवटी प्रश्न तत्त्वाचा आहे...

नाही, ज्याच्यात्याच्या तत्त्वाचा आहे!!