Friday, April 21, 2006

बुचाची फुलं

काही दिवसांपूर्वी अपार्टमेंटच्या आवारात निलगिरीच्या टोप्यांचा सडा पडला होता. मंद वास पण येत होता. छाती भरून तो वास घेतला आणि शाळेची आठवण झाली. शाळेत अशीच झाडं होती निलगिरीची, आणि टोप्यांचा सडा पडायचा. बाकीचीही खूप झाडं होती. गुलमोहर, शिरीष, चिंच, विलायती चिंच, बदाम, चेंडूफळ (टण्णूचं झाड!), बूच, पिंपळ, अशोक.... ऋतूमानाप्रमाणे आम्ही कुठली कुठली फुलं गोळा करत असू. चिंचा, चिंचेची फुलं सुद्धा. गुलमोहराच्या पाकळ्यांच्या अंगठ्या करत असू. विलायती चिंचा तुरट लागल्या तरी गोळा करून चाखत असू. अशोकाच्या बिया गोळा करणे हा तर खूप जणींचा छंद होता.

पण सगळ्यात "लोकप्रिय" होती बुचाची फुलं. ती झाडं फुलली की आवारात शिरल्या शिरल्याच बुचाचा मस्त वास यायचा. आणि शाळा भरण्याआधी, छोट्या आणि मोठ्या सुट्टीत, शाळा सुटल्यावर बुचाची फुलं वेचायला काही "वेड्या" मुली नेहेमी झाडाखाली रेंगाळायच्या. नुसत्या रेंगाळायच्या नाहीत. ताजी फुलं झेलायला ताटकळत वर नजर लावून अक्षरश: "दबा" धरून असायच्या. एखादं फुल झाडावरून अलगद गिरक्या घेत खाली झेपावताना दिसलं की सगळ्या त्याकडे झेपावायच्या. अगदी स्पर्धाच असायची ते फुल झेलायला. जिला ते फुल मिळेल तिच्या चेहर्‍यावर विजयाचा आनंद अगदी ओसंडून वहायचा! आणि मग त्या वेचलेल्या फुलांच्या लांबच लांब वेण्या तयार करायची स्पर्धा. आवारातच नाही तर सगळ्या वर्गांमधूनही मग बुचाचा घमघमाट येत रहायचा. असे मोहक, गंधित, वेडे दिवस होते शाळेतले!

तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? शाळेच्या वेड्या दिवसांची आठवण व्हायला नुसता निलगिरीचा मंद वास पुरे होता. तसं पहायला गेलं तर शाळेच्या दिवसांची आठवण यायला फार काही लागत नाही. लहानपणाच्या आठवणी आपल्या सगळ्यांनाच व्याकुळ करतात. कधी कधी तर अगदी ध्यानी मनी नसताना समोर ठाकतात. त्यातून माझ्यासारख्या शाळेच्या प्रेमात असलेल्यांना तर अगदी "शाळाव्याकुळ" करून सोडतात. (हा ट्युलिपच्या "घरव्याकुळ" वरून बनवलेला शब्द, वाचतीयेस का ग ;-) )

12 comments:

Different Stroke said...

Hi sumedha,
I just read many of your marathi blogs.They are really beutiful becaz they are straight from heart.
You seems to be a fond of marathi kavita.
I'm looking for two marahi poems,
one is by Girish and other is by Padgavonkar.Both these poems are given in Va. Pu's book "Mahotsav".
i'm not getting that book anywhere now.
If you find these book will you please publish or at least send to my email-id?
Thanks & regards
Ajit
(ajitwce2rediffmail.com)

Gayatri said...

नेहमीसारखंच सुरेख, सुमेधा! :) निलगिरीच्या 'टोप्या', पांगाऱ्याच्या बिया, बिट्ट्या-सागरगोटे, चिंचांचे गोळे, मसाल्याच्या गोळ्या, वहीतली 'विद्या देणारी' मोरपिसं..मीपण शाळाव्याकुळ झालेय!

Tulip said...

wow सुमेधा! शाळेची अशी 'सुगंधी' आठवण अजून कोणी काढली नसेल कधी. आणि बुचाच्या फुलांचा वास खरच काय वेड लावणारा असतो! ती फुलेही किती सुंदर असतात.
मला आठवतय शाळेत असताना एकदा नाशीक मधे camp ला गेलो होतो आम्ही सुट्टीत आणि तिथे एका रस्त्यावर सगळी बुचाचीच झाडे. सगळी नुसती फुललेली. अहा! खरच ते दिवसच डोळ्यांपुढे आणलेस.
मस्तं लिहिले आहेस.

Sumedha said...

अजित, गायत्री, ट्युलिप, धन्यवाद!

अजित, माझ्या संग्रही ते पुस्तक नाही. कवितांचे शीर्षक किंवा मुखडा माहीत आहे का, कदाचित त्यावरून आठवेल/सापडेल! माझ्याकडच्या दुसर्‍या कुठल्या पुस्तकामधे मिळण्याची शक्यता आहे.

आणि मला नाही मिळाले, तरी मराठी ब्लॉगविश्वातल्या इथे भेट देणार्‍या एखाद्या पांथस्थाला माहीत असेल तर तो/ती नक्कीच नोंदेल अशी आशा करुया!

Deepa said...

सुमेधा, मस्त आहे लेख! पुण्यातल्या BMCC Road वर बुचाची खूप झाडं आहेत. त्या रस्त्यावर पडलेला बुचाच्या फ़ुलांच्या आठवणी मनात जाग्या झाल्या.

Kaustubh said...

Hi Sumedha,

Tu maajhya blog la lihilelyaa pratikriyetuun tujhaa patta kaLalaa aaNi pahilyaandaach tujhaa blog vaachala. Chaanach aahe. Lihit rahaa ...

~Kaustubh

Monsieur K said...

hi sumedha,

lahaanpani chya aathvani ujal-lya - building chya pudhe aslele buchaache aani ashoka chya jhaada.. shaalet astaana tannu golaa karaaycho.. ajun ek sundar aathvan mhanje paarijaataacha sadaa :-)

hya aathvani-nna ujaala dilyaa baddal dhanyawaad :-)

ketan

Chakrapani said...

सुमेधा, सुंदर लिहिले आहेस. शाळेच्या आठवणींसाठी एखादी छोटीशी गोष्टसुद्धा कारणीभूत कशी होऊ शकते याचे परिणामकारक चित्रण! आवडले. यावरूनच मला माझ्या 'बालपण सदैव नटवायचं असतं या कवितेची आठवण झाली.त्याबद्दल तुझे विशेष आभार नि पुढील लेखनासाठी शुभेच्छा

Milind said...

सुमेधा, माझ्या blog वरील अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
हा लेख सुरेख आहे. वाचल्यावर मलासुद्धा शाळेतल्या निलगिरीच्या मंद वासाची आठवण येऊन मी 'शाळाव्याकुळ' झालो :) लिहीत राहा.

आदित्य said...

मी हे वाचता वाचता माझ्या शाळकरी दिवसात जावून पोहोचलो आणि बघता बघता 'शाळाव्याकुळ' झालो.माझ्या शाळेत झाडं,फुलं नव्हती पण घरासमोर बुचाचं झाड होतं तिथे आम्हीसुद्धा फुलं झेलण्यासाठी टपून असायचो अगदी असंच.

Ashutosh Bapat (आशुतोष बापट) said...

तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

आरती प्रभूंच्या काही कविता http://nivadak.blogspot.com/ इथे दिल्या आहेत. शक्य तेव्हा रसग्रहण लिहिन.

इतर साधन नसल्याने, या जुन्या लेखावरील प्रतिक्रियेद्वारे कळवत आहे.

तुमचे लेख छान आहेत.

Anonymous said...

Channnch........mala suddha mazya.shalechi...aathavan zali...
sarva...jan...changalech...lihita...thanks ... theva...japun kasa thevava..he dakhavun dilya...baddal..