Showing posts with label हलकं-फुलकं. Show all posts
Showing posts with label हलकं-फुलकं. Show all posts

Friday, August 24, 2007

खोड

सकाळच्या उन्हात कॉफी घेत घराच्या पायरीवर उभी होते. रविवारची आळसावलेली सकाळ. हे घर असं टेकाडावर. आजूबाजूला बैठी टुमदार म्हणावी अशी घरं. मागे वर थोडीशी चढत जाणारी टेकडी, आणि घनदाट होत जाणारी झाडी. समोर तीच उतरत जाणारी टेकडी, थोडी घरं आणि मग समोरच्या परिसराला कापत जाणारा रेल्वेमार्ग, पलिकडे आडवा पसरलेला महारस्ता. त्याही पलिकडे औद्योगिक इमारतींचा पट्टा. मधेच एक-दोन अलिशान हॉटेलं. या परिसरात कामाला येणार्‍यांची नेहेमीची विश्रांतीस्थानं. त्याहीपलिकडे खाडी. आणि खाडीच्या पलिकडे? आहेत की क्षितिजावर निळे डोंगर! छानपैकी अस्ताव्यस्त पसरलेले. बापरे घराच्या पायरीवरून इतकं सगळं दिसतं हे लक्षातच आलं नव्हतं कधी! इथे घटकाभर बसून हे सगळं साठवून ठेवायलाच पहिजे डोळ्यांत!

महारस्त्यावरून जाणार्‍या वाहनांचा आवाज एकदम जाणवला. म्हणजे इतका वेळ वर्दळ नव्हती असं नाही. पण अचानक कोणीतरी कळ फिरवावी तसा तो आवाज आपल्या अस्तित्त्वाची जाणीव करून द्यायला लागला. आणि मग अचानक सगळेच आत्तापर्यंत फक्‍त दिसणारे आवाज ऐकू सुद्धा यायला लागले. वार्‍यानी हलणारी पानं सळसळ आवाज करतायत होय. आणि पलिकडच्या मैदानावर खेळणारी चालत्या बोलत्या बाहुल्यांसारखी दिसणारी मुलं आरडाओरडा सुद्धा करतायत. गंमत म्हणजे आत्तापर्यंत फक्‍त ऐकू येणार्‍या गोष्टी दिसायलासुद्धा लागल्या. इतका वेळ नुसतीच चिवचिव करणारी पाखरं चक्क पानांआडून डोकवायला लागली. शेजार्‍यांच्या हिरवळीवर लावलाय पाण्याचा फवारा, तो एकदमच उन्हात चमकायला लागला.

मला गंमत कळेना. या अचानक माझ्या दुक-श्राव्य संवेदना अशा तीक्ष्ण कशा झाल्या? पलिकडच्या गल्लीत एक गाडी येऊन थांबली. गराजचे दार उघडून आत गेली. गराज बंद झालं. वार्‍याच्या झुळुकेनी रस्त्याच्या या कडेचा पाचोळा फरफटत त्या कडेला गेला. आणखी एक गाडी टेकडीवरून येतीये, मी बरोब्बर वळून बघितलं त्या क्षणी समोरून वळसा घेऊन खालच्या रस्त्याला लागली ती. मागच्या बाजूला रहाणारे आजोबा नेहेमीप्रमाणे अडगळीतच्या जुन्या पान्या वस्तू काढून काहीतरी खाटखुट करत बसलेत. आणि इतका वेळ नुसताच चिवचिवाट ऐकू येत होता, ते एकूण चार, नाही पाच असावेत बहुतेक, वेगवेगळे पक्षी आपापल्या ताला-सुरात गातायत हेही लक्षात आलं. समोरच्या निळ्या फुलांच्या वाफ्यात मधेच नाजूक गुलाबी फुलं पण आहेत. आणि पलिकडच्या अंगणात दगडगोट्यांनी सजवलेलं ते कारंजं म्हणजे दोन सुबक मासोळ्या आहेत.

हे सगळं आधीपासून होतं, चालूच होतं की. पण दिसलं नाही, आणि ऐकू सुद्धा आलं नाही. आपल्याला हव्या त्या गोष्टी ऐकायची आणि बघायची, नाही चुकलं.... आपल्याला नको त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायची भारी खोड आहे हे खाडकन जाणवलं. आणि ठरवलं रोज घरातून बाहेर पडताना पायरीवर दोन क्षण थांबायचं, डोळे मिटून ऐकायचं, कान बंद करून बघायचं. खूप काय काय दिसतं आणि ऐकू येतं, तेही रोज नवीन नवीन! करून बघा, मजा आहे!

Wednesday, July 25, 2007

Dementor and Patronus

आभाळ गच्च भरून आलेलं असतं. अगदी उदास वाटतं. मग वाफाळलेला कॉफीचा कप घ्यावा आणि लताचं "ओ सजना" लावावं. बस! उदास वातावरण एकदम जादुइ होऊन जातं! धो धो पाउस येऊन कधी आकाश मोकळं करून जातो समजतही नाही!

कामाला काही म्हणता सुर सापडत नसतो. नको असलेल्या गोष्टी पुढयात येत असतात आणि सोप्या सोप्या ठिकाणी पण घोडं अडतं. मग याहू वर "काय म्हणताय, काय चाललंय्?" असा संदेश पाठवावा! फुटकळ चकाट्या पिटायला वेळ नाही हे विसरून मस्त गप्पा टप्पा व्हाव्यात. पुढचा दिवस कसा सुरळीत जातो.

आपल्या मागे लागलेल्या लहान-मोठ्या demontors ना पळवून लावायला आपल्याच पोतडीत असतात की लहान मोठे patronus. एक इशारा पुरे असतो, जादूची कांडी सुद्धा नाही लागत.

एक मिनिट, हॅरी पॉटर न वाचणार्‍या पामरांनो (sigh, you don't know what you are missing!), तुम्हाला काय सांगणार कप्पाळ की dementor म्हणजे काय आणि patronus कोण! पण तुम्ही हे गाणं तर नक्कीच ऐकलं असेल न?

When the dog bites, when the bee stings, when I am feeling sad!
I simply remember my favourite things,
And then I don't feel so bad!

हे सुद्धा गाणं माहीत नाही तुम्हाला? आता मात्र हद्द झाली! मग पाडगावकर काय म्हणतात बघा

कधी कधी सगळंच कसं चुकत जातं!
नको ते हातात येतं, हवं ते हुकत जातं!
अशा वेळी काय करावं?
सुकलेल्या झाडाला न बोलता पाणी द्यावं!

यालाच आपली J. K. म्हणते dementor ला पळवून लावायला patronus बोलवायचा! पुढच्या वेळी तुमच्या मागे लागलाच कोणी dementor, तर सहजी बोलवून आणा तुमच्या patronus ला! आता कळलं?

Thursday, March 15, 2007

क्रिकेट क्रिकेट

आत्तापर्यंत माझ्या इ-मेल मध्ये पाच वेळा आलेली ही ad तुम्ही नक्कीच बघितली असेल :

http://youtube.com/watch?v=kf9tKOexxkw

क्रिकेट विश्वचषकामुळे तमाम भारतीय (तमाम 'भारतीय क्रिकेटप्रेमी' म्हणणार होते, पण ती द्विरुक्‍तीच होईल ना!) चांगलेच "पेटलेले" आहेत. Nike वाल्यांनी अगदी बरोबर नस पकडून तयार केलीये ही ad!भारतात क्रिकेट इतका लोकप्रिय का असावा याची कारणमीमांसा काही मी नको द्यायला. लहानपणी गल्लीत क्रिकेट न खेळलेला मुलगा (क्वचित मुलगी सुद्धा) भेटणं अवघड. टी.व्ही. वर दिवस न् दिवस सामने बघणारे वीर (अर्थात वीरांगना सुद्धा) घरोघरी. दुसर्‍या दिवशी वार्षिक परीक्षा सुरु होत असून सुद्धा दिवसभर बोलणी खात बघितलेली मॅच मलासुद्धा अजून आठवतीये तर कट्टर क्रिकेट भक्‍तांची बातच नको! सुट्टीमधे सगळी भावंडं जमल्यावर क्रिकेटचे सामने हमखास रंगणारच. त्यात मुलगी असल्याने (मग ती आठ-दहा भावांमधली एकुलती लाडकी बहीण असली म्हणून काय झालं), क्रिकेट मधे कायम लिंबूटिंबू. आणि काय खेळ तरी मांडलेला असायचा, दोन बाजूची जांभळाची झाडं म्हणजे boundary, बाजूच्या आंब्याच्या झाडावर बसणार अंपायर आणि घराच्या दगडी भिंतीवर खडुने रंगवलेल्या यष्ट्या. म्हणजे बॉलवर त्या खडुच्या उठणार्‍या छप्प्यानी ठरवायचे आउट आहे की नाही! असा सगळाच आनंद!

पुढे शिक्षणासाठी देश सोडल्यावर हे वेड थोडं कमी झालं. नाही म्हणायला cricketinfo.com नवीन नवीन सुरु झाली होती तेव्हा अगदी ball-by-ball सामने "बघितल्याचे" आठवतायत. पण मग हळू हळू ते पण कमी झालं. या Nike च्या जाहिरातीनं सगळं पुन्हा उजळून निघालं, "Eat cricket, sleep cricket, drink only Coca Cola" आठवलं. त्यातून विश्वचषकाचा माहोल. म्हणजे "rekindling old flame" का काय म्हणतात न, तसं झालं. आज बराच वेळ क्रिकेटच्या websites पालथ्या घालण्यात गेला, "Receive alerts on your desktop" ला sign-up केलं आणि Nike ची ad तमाम दोस्त वर्गाला पाठवली, तेव्हा कुठे जरा मोकळं वाटलं!

आता इतकं करून भारतीय संघाला काही स्फुरण येवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना :)

Saturday, March 10, 2007

काळ काम वेग

परवा सकाळी कामाला जाताना ट्रॅफिक सिग्नल पाशी थांबले होते. शेजारच्या गाडीकडे लक्ष गेले. शेजारच्या गाडीतले काका (खरं म्हणजे चांगला तरुण माणूस होता, पण सगळे अनोळखी लोक काका किंवा काकू असतात) "बिनपाण्याने" हजामत करत होते, स्वत:चीच हो! मला हसू आवरेना. नेमकं तेव्हाच त्यांचं पण लक्ष माझ्याकडे वळलं. मला जरा ओशाळल्यासारखं झालं, पण त्यांनी खांदे उडवत मोकळेपणानं हसत माझं लक्ष समोरच्या हिरव्या झालेल्या दिव्याकडे वेधलं! वेळेशी रोजच सकाळी उठून लढाई करणार्‍यांना हे काही नवीन नाही, काय? कामाच्या वाटेवर गाडीत बसून ब्रेकफास्ट करणारे, टाय बांधणारे, केस नीटनेटके करणारे काका आणि मेकप करणार्‍या काक्वा सर्रास दिसतात की!

ते काका घरी वेळ झाला नाही म्हणून गाडीत दाढी करत असावेत का? की त्यांनी तशी सवयच लावून घेतली असेल, वेळ वाचवण्यासाठी? मला "चीपर बाय द डझन" ची आठवण झाली. त्यातील डॅड मुलांना आंघोळीच्या वेळी कॅसेटस् ऐकायला लावून कमीत कमी वेळात नवीन भाषा शिकवत असत. इतकेच नाही रोज करायच्या प्रत्येक कामात कसा वेळ वाचवता येईल, एकाच वेळी दोन किंवा तीन कामे कशी करता येतील, त्यातून नवीन काही कसे शिकता येईल याचा रात्रंदिवस विचार ते करत आणि अमलात पण आणत.

माझ्या एका मित्राची यावरची प्रतिक्रिया म्हणजे "ह्यॅ, यात काय अर्थय? सारखा आपला डोक्याला भुंगा! आपल्याला नाही बुवा जमणार, आपण कसं एकदम मजेत आरामात करतो सगळं, no tension!" त्याला म्हणलं, "dude, you missed the point!" म्हणजे वेळेची गरज म्हणून अशी कसरत करणं वेगळं. पण असं एका वेळी 2-2, 3-3, किंवा 4-4 गोष्टी करून जो वेळ वाचवल्याचा, आपली कार्यक्षमता वाढवल्याचा आनंद असतो तो तुला नाही कळायचा!

एक मात्र खरं, ही गोष्टच अशी आहे की ती रक्‍तात असावी लागते, शिकणं फार अवघड. ती एक कला आहे. आणि हे नुसतं वेळ वाचवण्याबाबत नाही बरंका, सगळ्याच गोष्टींच्या नियोजनाबद्दल. सकाळी उठल्यापासून माझ्या डोक्यात हा "भुंगा" चालू असतो म्हणा न. अमुक एक गोष्ट केली की तमुक गोष्ट करायची, हे झाल्याशिवाय ते होउ शकणार नाही, हे करत असतानाच ते पण उरकून घेता येईल, समजा हे जमलं नाही तर निदान ते तरी होईल, एक ना दोन!

हे लिहीता लिहीता एक मात्र लक्षात आलं, मी मेकप करत नाही आणि दाढी पण ;) म्हणजे आता गाडी चालवताना करायला काहीतरी शोधून काढलं पाहिजे!

Tuesday, March 14, 2006

देखो मगर प्यार से!

गाडी चालवताना माझं लक्ष बर्‍याच वेळा समोरच्या गाडीच्या लायसन्स् प्लेट कडे जातं. काल सकाळी signal ला थांबले असताना एक लायसन्स् प्लेट बघितली "ANIM8AR", अर्थात "animator". इथे अशा प्लेटस् बर्‍याच वेळा बघायला मिळतात. मला कौतुक वाटतं त्या लोकांच्या कल्पकतेचं! "YFS CAR", "DON N4C", "ML8 ML8" या अजून काही लक्षात राहीलेल्या गंमतशीर पाट्या. google वर search मारला तर कदाचित मोठी यादी मिळेल.

"ANIM8AR" बघून या पाट्यांची आठवण झाली आणि एकदम भारतातल्या ट्रकच्या मागे लिहीलेली काहीच्या काही घोषवाक्यं आठवून खूप हसू आलं. अगदी "आई-वडीलांचा आशीर्वाद", "साई-कृपा" किंवा "जय भोलेनाथ" पासून "देखो मगर प्यार से", "चल मेरी धन्नो" किंवा "जंगल की रानी" पर्यंत आणि कुटुंबनियोजनाच्या घोषणांपासून ते वनसंवर्धनाच्या ब्रीदांपर्यंत काय वाट्टेल ते. तेही लिहीणार्‍यांच्या कल्पकतेचं कौतुक आहे न? आणि हे सगळं "Horn OK Please" (मधोमध कमळाचं चित्र!) याच्या अवती भवती विखुरलेलं, एक एक शब्द लावून वाक्‍य पूर्ण करायचं म्हणजे कसरत!

हे सगळं आठवून हसू आवरेना. ऑफिसच्या दारात एरिक (सहयोगी) दिसला.
"कशाला हसतीयेस इतकं?" त्यानं विचारलं.
"देखो मगर प्यारसे" अस्मादिक!
"Oh is that 'good morning' in Indian?"
"Yes", म्हणलं जरा फिरकी घ्यावी त्याची! त्याला मग "देखो मगर प्यारसे" म्हणायला शिकवलं. म्हणलं तुला कुणी Indian मुलगी पटवायची असेल तर उपयोग होईल. पठ्ठ्याची चिकाटी पण इतकी की दिवसभर घोकत होता!

आणि आज सकाळी आल्या आल्या "देखो मगर प्यारसे सुमेधा"!! आता थोडे दिवस रोज सकाळची करमणूक होणार आहे ही :-)

Friday, February 24, 2006

आहा!

अलीकडे दिसामाजी ब्लॉग "चाळायचा" छंदच जडला आहे. "marathiblogs.net" वर नवीन नोंदी तर लगेच बघायला मिळतात, पण कितीतरी वाचायच्या राहिलेल्या जुन्या नोंदी देखील खुणावत असतात. आणि एकदम असं काही गवसतं की वाटतं "आहा, मला सुद्धा अगदी हेच म्हणायचं होतं..." बहुतेक वेळा लेखकानी/लेखिकेनी ते इतक्या नेमक्या शब्दात मांडलेलं असतं, की आपला आणि त्या कधी न भेटलेल्या लेखकाचा/लेखिकेचा धागा असा जुळलेला जाणवून मन आनंदभरारी मारतं.

खूप वेळा असंही होतं की आपल्याला खूप छान काही कल्पना सुचते, आणि विश्वासच बसत नाही की हे आपल्याच डोक्यातून बाहेर आलंय्... असं वाटतं की हे नक्की आपण कुठेतरी वाचलं असणार पूर्वी! कुठल्यातरी पुस्तकात, कवितेत नाहीतर कोणाच्यातरी ब्लॉगवर. स्मरणशक्‍तीला ताण देऊन सुद्धा आठवत नाही, खूप अस्वस्थ वाटतं. आणि अचानक ध्यानी मनी नसताना ते कुठूनतरी समोर येतं आणि "आहा"!! आणि गंमत म्हणजे, तेव्हा सुद्धा आपण ते पहिल्यांदाच वाचत असतो! असं झालंय तुम्हाला कधी?

मागे नाटयप्रशिक्षण शिबीरात माधव वझेंनी सांगितलेलं काही आठवलं. आपल्या सगळ्यांनाच काहीतरी सांगायचं असतं. आपल्या सगळ्यांच्याच आत एक तोटी बंद करून ठेवलेली असते. उघडा ना ती तोटी, आणि वाहू देत ना ते विचार बाहेर. कशाला घाबरता? कशाला थोपवून ठेवता? कशाला लपवून ठेवता? फार फार तर काय होईल? लोक हसतील? हसू देत ना! आपण काही मोठे कलावंत तर होऊ बघत नाही ना, मग हसले लोक तर कुठे बिघडलं?

आणि मग हे लक्षात आलं की मला जे काही म्हणायचं आहे, ते मुक्‍तपणे प्रकट करायचा आनंद फार मोठा तर आहेच, पण कदाचित कुठेतरी कोणीतरी हे वाचून "आहा" चा आनंद घेईल, या जाणीवेतून द्विगुणित होणारा आनंद अमूल्य आहे! नाही का?

Wednesday, February 01, 2006

जीवन

"जीवन" हा शब्द कोणी नेहेमीच्या संभाषणात वापरला, की मला शाळेच्या दिवसांची आठवण येते. शाळेत असताना आमची एक मैत्रीण खूप जड जड भाषेत निबंध लिहायची. अर्थात, अतिशय हुशार आणि हळवी असलेली ही सखी आम्हा सर्वांचा अभिमानाचा विषय होती. तेव्हा हे लिहीण्या आधी तिची माफी मागते :-)
तर ही सखी निबंधातच जड जड शब्द वापरायची असं नाही, तर बोलताना सुद्धा बरेच वेळा "जीवन", "ध्येय", "अभिमान" असे शब्द अगदी सहजपणे वापरायची. आणि खरे सांगायचे तर तिच्या व्यक्‍तिमत्त्वाला ते शोभूनही दिसायचे. पण आम्ही बाकीच्या सामान्य मुली तिची चेष्टा करायची संधी कशाला सोडू? आम्ही भूमितीच्या तासाला मुद्दाम "g1", असे जोरात म्हणून मग "g2, g3, g4...." असं म्हणून खिदळायचो!!

तेव्हा आता मला "जीवन" या विषयावर काही लिहायचा फार अधिकार नाही!! पण कुसुमाग्रजांची ही कविता नक्की नोंदू शकते!

अनंततेचे गहन सरोवर
त्यात कडेला विश्वकमल हे
फुले सनातन
त्या कमळाच्या
एका दलावर
पडले आहे
थोडे दहिवर
थरथरणार्‍या त्या थेंबाला
पृथ्वीवरचे आम्ही मानव
म्हणतो जीवन

Monday, January 30, 2006

श्री गणेशा

मराठी ब्लॉगविश्वात प्रवेश करताना सर्व प्रथम ही परंपरा सुरु करणार्‍या आणि पुढे नेणार्‍या कित्येक मित्र-मैत्रीणींना प्रणाम!

बाकीच्या अनेक ब्लॉग प्रमाणे मी सुद्धा "मी हे का लिहीतीये?" याचे उत्तर देऊन सुरुवात करते. आणि कोण्या एका ब्लॉग वर वाचलेल्या या चारोळीची नोंद करते (गोखले आणि मूळ ब्लॉगर दोघांची माफी मागून):

वाचणारं कोणी असेल तर ब्लॉग लिहीण्यात अर्थ आहे
लिहायला काही सुचणार नसेल तर ब्लॉगस्पेस सुद्धा व्यर्थ आहे!

माझ्या एका मित्राचे मत आहे की, पत्र हे एकाच वेळी स्वगत आणि संवाद दोन्ही असते. ब्लॉग बद्दलही असंच म्हणता येईल न? तर असं हे थोडंसं स्वगत, थोडासा संवाद, आपला आपल्याशी आणि तुम्हा सर्वांशी. कधी काही आवडलेल्या कविता, उतारे, कधी स्वैर विचार. आणि सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे, "का नाही लिहायचे"?

शाळेत असताना प्रत्येक नवीन वहीच्या पहिल्या पानावर आपण नाव, यत्ता, विषय वगैरे लिहायचो. त्याशिवाय कोणी "श्री गणेशाय नम:" लिहायचे, कोणी ॐ काढायचे. मला कधीतरी तुकोबांच्या ओळी भावून गेल्या, म्हणून लिहायला सुरुवात केली

हेचि दान देगा देवा
तुझा विसर न व्हावा

त्याच चालीवर आज पहिला वहिला ब्लॉग प्रसिद्ध करताना, पहिल्या पानावर लिहीते

हेचि दान देगा ब्लॉग देवा
दिसामाजी काही ब्लॉग सुचावा