Tuesday, April 04, 2006

मैफल

रविवारी मिलपिटास मधे एक अविस्मरणीय मैफल झाली. "शुभ्र फुलांच्या ज्वाला". पं. वसंतराव देशपांडेंचे नातू राहुल देशपांडे यांची. मी काही शास्त्रोक्‍त संगीताची जाणकार किंवा अभ्यासक नसल्याने, मैफिलीबद्दल काही विश्लेषणात्मक वगैरे लिहायचं धाडस नाही करत. स्वरांनी भारावलेले ते चार तास माझ्यातल्या सामान्य रसिकाला मंत्रमुग्ध करून गेले.

तेजोनिधी लोहगोल, वाटेवर काटे, घेइ छंद मकरंद, सुरत पिया, दाटून कंठ येतो, मृगनयना रसिकमोहिनी, दुनिया वेड्यांचा बाजार ... अशी सगळी नाट्य-चित्रपट गीतं आणि रागदारी. या बरोबरच वसंतरावांच्या काही आठवणी आणि काही किस्से सुद्धा.

एकदा वसंतरावांना एका खडूस श्रोत्यानं विचारले, "का हो, तुमचं कोणत्याही तबलजीशी जमतं का?" उत्तर तयार: "माझं गाणं कायम जमलेलंच असतं हो. पण तुमच्यासारख्याला ते कळावं म्हणून मी आपला साथीला तबला घेतो, झालं!"

अशा मैफिलींचा आनंद घेता येतो हेच मी माझं महाभाग्य समजते. आपण कुठे काही वाचलेलं छानसं असं दुसर्‍यांबरोबर वाटून घेऊन त्याचा आनंद द्विगुणित करता येणं तसं सोपं असतं. पण अशा सुरांच्या मैफिलीचा आनंद तुमच्यापर्यंत कसा पोचवू, कसा वाटून घेऊ, तिथे शब्द थिटे पडतात! त्या सुरांना त्या क्षणी डोळे मिटून मी माझ्यापुरते तरी बंदिस्त करून ठेवलेत. पण या निमित्तानं तुम्हीही कधी अशाच अनुभवलेल्या मैफिलीची आठवण डोळे मिटून दोन क्षण काढू शकलात, तरी माझा आनंद तुमच्या पर्यंत पोचला असं समजीन!

3 comments:

Nandan said...

Sumedha, aamchya San Diego maharashtra mandalatarfe suddha hi maifal karayache ghatat hote, pan nidhi abhavi ha bet radda karava lagala. Tumcha lekh vachoon ti hurhur jari taji zali asali, tari shevati mhatalyapramane aadhichya rangalelya maifilinchi aathavan yeun barehi vatale.

Gayatri said...

पोचला गं तो आनंद! आणि डिसेंबरात अगदी याच कार्यक्रमाला गेले होते मी..त्यामुळे ती मैफल परत अनुभवता आली :)

HAREKRISHNAJI said...

राहुल वर मी तिन चार बॉग लिहिले आहेत व त्यांची जाणी ही टाकलेली आहेत.
खर म्हणजे ते एक उत्तम शास्त्रीय संगीताचे गायक आहेत. सध्या मुकुल शिवपुत्र यांच्या कडॆ शिकत आहेत. त्यांच्यावर त्यांच्या आजोबांप्रमाणॆ नाट्य संगित गायक हे लेबल न लागो