कॉलेजमधे असताना मैत्रिणींचे वाढदिवस जोरात साजरे व्हायचे. संध्याकाळी वाढदिवसाळू मैत्रिणीकडे धाड असायची. किलोनी पावभाजी (किंवा इडली-सांबार किंवा भेळ इ. इ.) आणि लिटरनी मिल्क-शेक (किंवा आइसक्रीम किंवा पियुश इ. इ.) तयार करणे हा आईचा न सांगता आखलेला आणि अर्थातच पार नेलेला पाककार्यक्रम असे! या धाडीमधे शाळेतल्या, कॉलेजमधल्या, गल्लीतल्या, क्लासमधल्या ज्या ज्या मैत्रिणींना वाढदिवस लक्षात असेल त्या सर्व सामील असायच्या. भेट म्हणून फक्त एक ग्रीटिंग कार्ड आणावे हा अलिखित नियम. एका वर्षी तर मला आठवतेय इतक्या मैत्रिणी एकदम आल्या की घरात जागाच नव्हती बसायला! हळूहळू सगळ्या पांगल्या, फक्त "घट्ट", सख्ख्या मैत्रिणी रेंगाळल्या. इतका वेळ आतल्या खोलीत तोच पेपर पुन्हा पुन्हा चाळत बसलेले पपा बाहेर डोकाऊन म्हणाले "अरे वा, आता फक्त 'inner circle' उरलंय वाटतं"...
तर मैत्रिची अशी वर्तुळं असतात खरी. म्हणजे आतलं वर्तुळ अधिक महत्त्वाचं किंवा बाहेरचं कमी दर्जाचं असं नाही. पण काही मैत्र्या अमुक एका त्रिज्येच्या आत जातच नाहीत हे मात्र खरं. अगदी कायमस्वरुपी मैत्री असेल तरीही. गंमत म्हणजे या वर्तुळांचा विस्तार कमी जास्त होतो, त्यात लोक प्रवेश करतात, क्वचित सोडूनही जातात; पण अगदी आतलं वर्तुळ तसंच राहतं. किंबहुना, या वर्तुळात फक्त प्रवेश करता येतो, बाहेर पडता येत नाही हेच त्याचं वैशिष्ट्य! आणि या वर्तुळात कोण असेल यालाही काही नियम नाहीत. म्हणजे फक्त अंतरानी जवळ असलं तरच या वर्तुळाची "membership" मिळते असं नाही. आणि तुम्ही पत्र-फोन-इमेल वर संपर्कात असाल तरच मिळते असंही नाही. इतकंच काय जितकी मैत्री जुनी तितके तुम्ही आतल्या वर्तुळात जाल याचाही नेम नसतो.
पण या आतल्या वर्तुळातले मित्र असतात तरी कोण? तुम्ही कधीही, कितीही काळानंतर, कुठूनही, कु्ठल्याही अवस्थेत या मित्राला संपर्क केलात तरी जन्मोजन्मीचं नातं असल्यासारखे एका क्षणात संवाद जोडू शकता. मधला काळ, अंतर नाहीसं होतं. फार काही शब्दांची देवाण-घेवाण करावी लागत नाही. "ए तुला आठवतं" किंवा "किती दिवसांनी बोलतोय आपण" असले संभाषण जोडणारे पूलही लागत नाहीत! आपण स्वत:शी संवाद करावा तसा मोकळा संवाद सहज होऊ शकतो.
अगदी लहानपणी विशाल असणारं हे वर्तुळ कळत नकळत संकुचित होत जातं खरं! पण न कळत्या वयातसुद्धा कुठेतरी पुसटसा परिघ आखलेला असावा बहुतेक. अशीही लहान मुलं दिसतातच की जी काही अनोळखी लोकांकडे सुद्धा सहज झेपावतात, पण अगदी जवळच्या नातेवाइकांकडेही रमत नाहीत! मोठेपणी तर, अगदी माणूस कितीही जगन्मित्र झाला, तरी प्रत्येकाचं आतलं वर्तुळ कधीतरी कुठेतरी आखलेलं असतं असा माझा दावा आहे. कोणाचं जरा अधिक गजबजलेलं असेल कदाचित इतकंच.
तेव्हा पपांना मी "छे! inner circle वगैरे काही नाही, सगळ्या सारख्याच मैत्रिणी आहेत" असं म्हणाल्याचं आठवतंय. त्यात कुठेतरी आपण जगन्मित्र (जगन्मैत्रीण म्हणा हवं तर) वगैरे असल्याची पोकळ पौढी किंवा सूप्त इच्छा असेल कदाचित. किंवा वर्तुळांची ही भूमिती तेव्हा उमजली नसावी. आता नकळत आपली आपल्यालाच ती वर्तुळं दिसायला लागली आहेत. यालाच वयानी, अनुभवानी येणारं शहाणपण म्हणायचं का?
Friday, June 15, 2007
Monday, June 11, 2007
वेडा कवी
तसे सगळेच कवी वेडे असतात. म्हणजे माझ्या सगळ्याच आवडत्या कवींना मे "वेडे" म्हणते. हे अगदी पहिल्यांदा माझ्या ताईकडून शिकले. बोलगाणी अगदी ताजं कोरं होतं तेव्हा त्यातल्या या ओळी ती अगदी भाराउन जाउन वाचत होती:
प्रेम कधी भांडतं सुद्धा
निळं चांदणं सांडतं सुद्धा!
आणि मधेच थांबून म्हणाली "काय वेडे आहेत न पाडगावकर!" तेव्हा मला हसू आलं होतं. पण नंतर लक्षात आलं की अशा थेट भिडणार्या कवीला "वेडा" हाच शब्द अगदी चपखल आहे! तेव्हापासून कुठल्या ओळी मनाला भिडून गेल्या, हसवून-रडवून गेल्या, वेड लावून गेल्या की तो कवी "वेडा आहे झालं" असा विचार मनात येउन जातो.
आज हे आठवायचं कारण, अर्थातच अजून एक महावेडा कवी! खूप दिवसांनी "मरासिम" ऐकली. गुलज़ार नावाच्या वेड्या कवीच्या या वेड्या ओळी बराच वेळ घुमत राहिल्या कानात! किती किती वेगळ्या नात्यांना, भावनांना, जाणीवांना, संवेदनांना वेड्या शब्दात सहज पकडणे एक फक्त गुलज़ारच जाणे!
मुझको भी तरकीब सिखा दो यार ज़ुलाहे!
अक्सर तुझको देखा है के ताना बुनते,
जब कोइ तागा टूट गया या ख़तम हुआ,
फिर से बांधके, और सिरा कोइ जोड के उसमे -
आगे बुनने लगते हो!
तेरे इस तानेमें लेकिन एक भी गांठ-गिरह बुंदरकी देख नहीं सकता कोई ...
मैंने तो एक बार बुना था एकही रिश्ता,
लेकिन उसकी सारी गिरहें साफ़ नज़र आती है मेरे यार जुलाहे!
मुझको भी तरकीब सिखा दो यार जुलाहे ...

Tuesday, April 17, 2007
बी आणि खत
कुठल्या न कुठल्या निमित्तानी हा कितीही उहापोह केला तरी उत्तर न मिळणारा प्रश्न डोकं काढतोच. मुळात बियाणं चांगलं असेल, तर कुठलंही खत घातलं तरी काय फरक पडतो? मुळात मातीच चांगली असेल तर सामान्य कौशल्य असलेला कुंभार सुद्धा सुबक मडकं करू शकतो का? गळा चांगला असेल तर कुठल्या गुरुकडे गेलात याल कितपत महत्त्व आहे?
एक मात्र खरं; खत, कुंभार, गुरु यांची मुळात गरज असते हे मात्र कोणी नाकारू शकत नाही!
तर परवा चर्चेचा विषय होता की आपल्या जडणघडणीत आपल्या शाळेचं किती योगदान असतं? आपल्या मुलाला अमुक एका शाळेतच प्रवेश मिळावा असा हट्ट धरणं खरच कितपत योग्य आहे? "अति तिथे माती" या न्यायानुसार, कुठलाच अवाजवी हट्ट धरु नये हे जरी खरं असलं, तरी शालेय शिक्षण बर्याच बाबतीत महत्त्वाचं असल्यामुळे "शाळा चांगली हवी" यात तथ्य आहे न?
मला माझ्या शाळेचा खूप अभिमान आहे. माझ्या जडणघडणीत माझ्या शालेय शिक्षकांचा, मैत्रीणींचा आणि शाळेच्या वातावरणाचा फार मोठा वाटा आहे असं मी मानत आलेय. यात शाळेच्या दगडी जुन्या इमारती, लाकडी जिने, मोकळी मैदानं, बुचाची झाडं, भलं मोठं सभागृह, थोरलं ग्रंथालय आणि त्यातली नकाशांनी भरलेली खोली, पाण्याची टाकी सगळं आलं! दरवर्षीच्या स्पर्धा आल्या, हस्तलिखितं आली, निवडणुका आल्या, स्नेहसंमेलनं आली! "मुळात तुमच्यामधे जे काही गुणावगुण असतील त्यात शाळेच्या शिकवणुकीमुळे खरंच किती फरक पडतो?" या प्रश्नाला उत्तर देताना हे सगळं माझ्या डोळ्यापुढून भर्रकन् सरकून गेलं. या सगळ्या गोष्टींचा माझ्यावर खरंच किती ठसा उमटलाय हे व्यक्त करायला बहुतेक मी अपुरीच पडले.
पण "तू दुसर्या कुठल्या शाळेत गेली असतीस तर खरंच तू वेगळी व्यक्ती झाली असतीस?" किंवा "तुझ्या शाळेत जाणार्या सगळ्यांनाच असं वाटतं?" या प्रश्नांचं ठाम उत्तर तर मी किंवा कोणीही देउ शकणार नाही. काहीजण स्वयंपूर्ण असतात, तर काही गुरुस्पर्शानं धन्य होतात. कधी भेट न दिलेल्या शक्यतेच्या जगात कुठलं बियाणं कसं उगवलं असतं हे कसं सांगणार?

Thursday, March 15, 2007
क्रिकेट क्रिकेट
आत्तापर्यंत माझ्या इ-मेल मध्ये पाच वेळा आलेली ही ad तुम्ही नक्कीच बघितली असेल :
http://youtube.com/watch?v=kf9tKOexxkw
क्रिकेट विश्वचषकामुळे तमाम भारतीय (तमाम 'भारतीय क्रिकेटप्रेमी' म्हणणार होते, पण ती द्विरुक्तीच होईल ना!) चांगलेच "पेटलेले" आहेत. Nike वाल्यांनी अगदी बरोबर नस पकडून तयार केलीये ही ad!भारतात क्रिकेट इतका लोकप्रिय का असावा याची कारणमीमांसा काही मी नको द्यायला. लहानपणी गल्लीत क्रिकेट न खेळलेला मुलगा (क्वचित मुलगी सुद्धा) भेटणं अवघड. टी.व्ही. वर दिवस न् दिवस सामने बघणारे वीर (अर्थात वीरांगना सुद्धा) घरोघरी. दुसर्या दिवशी वार्षिक परीक्षा सुरु होत असून सुद्धा दिवसभर बोलणी खात बघितलेली मॅच मलासुद्धा अजून आठवतीये तर कट्टर क्रिकेट भक्तांची बातच नको! सुट्टीमधे सगळी भावंडं जमल्यावर क्रिकेटचे सामने हमखास रंगणारच. त्यात मुलगी असल्याने (मग ती आठ-दहा भावांमधली एकुलती लाडकी बहीण असली म्हणून काय झालं), क्रिकेट मधे कायम लिंबूटिंबू. आणि काय खेळ तरी मांडलेला असायचा, दोन बाजूची जांभळाची झाडं म्हणजे boundary, बाजूच्या आंब्याच्या झाडावर बसणार अंपायर आणि घराच्या दगडी भिंतीवर खडुने रंगवलेल्या यष्ट्या. म्हणजे बॉलवर त्या खडुच्या उठणार्या छप्प्यानी ठरवायचे आउट आहे की नाही! असा सगळाच आनंद!
पुढे शिक्षणासाठी देश सोडल्यावर हे वेड थोडं कमी झालं. नाही म्हणायला cricketinfo.com नवीन नवीन सुरु झाली होती तेव्हा अगदी ball-by-ball सामने "बघितल्याचे" आठवतायत. पण मग हळू हळू ते पण कमी झालं. या Nike च्या जाहिरातीनं सगळं पुन्हा उजळून निघालं, "Eat cricket, sleep cricket, drink only Coca Cola" आठवलं. त्यातून विश्वचषकाचा माहोल. म्हणजे "rekindling old flame" का काय म्हणतात न, तसं झालं. आज बराच वेळ क्रिकेटच्या websites पालथ्या घालण्यात गेला, "Receive alerts on your desktop" ला sign-up केलं आणि Nike ची ad तमाम दोस्त वर्गाला पाठवली, तेव्हा कुठे जरा मोकळं वाटलं!
आता इतकं करून भारतीय संघाला काही स्फुरण येवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना :)

Saturday, March 10, 2007
काळ काम वेग
परवा सकाळी कामाला जाताना ट्रॅफिक सिग्नल पाशी थांबले होते. शेजारच्या गाडीकडे लक्ष गेले. शेजारच्या गाडीतले काका (खरं म्हणजे चांगला तरुण माणूस होता, पण सगळे अनोळखी लोक काका किंवा काकू असतात) "बिनपाण्याने" हजामत करत होते, स्वत:चीच हो! मला हसू आवरेना. नेमकं तेव्हाच त्यांचं पण लक्ष माझ्याकडे वळलं. मला जरा ओशाळल्यासारखं झालं, पण त्यांनी खांदे उडवत मोकळेपणानं हसत माझं लक्ष समोरच्या हिरव्या झालेल्या दिव्याकडे वेधलं! वेळेशी रोजच सकाळी उठून लढाई करणार्यांना हे काही नवीन नाही, काय? कामाच्या वाटेवर गाडीत बसून ब्रेकफास्ट करणारे, टाय बांधणारे, केस नीटनेटके करणारे काका आणि मेकप करणार्या काक्वा सर्रास दिसतात की!
ते काका घरी वेळ झाला नाही म्हणून गाडीत दाढी करत असावेत का? की त्यांनी तशी सवयच लावून घेतली असेल, वेळ वाचवण्यासाठी? मला "चीपर बाय द डझन" ची आठवण झाली. त्यातील डॅड मुलांना आंघोळीच्या वेळी कॅसेटस् ऐकायला लावून कमीत कमी वेळात नवीन भाषा शिकवत असत. इतकेच नाही रोज करायच्या प्रत्येक कामात कसा वेळ वाचवता येईल, एकाच वेळी दोन किंवा तीन कामे कशी करता येतील, त्यातून नवीन काही कसे शिकता येईल याचा रात्रंदिवस विचार ते करत आणि अमलात पण आणत.
माझ्या एका मित्राची यावरची प्रतिक्रिया म्हणजे "ह्यॅ, यात काय अर्थय? सारखा आपला डोक्याला भुंगा! आपल्याला नाही बुवा जमणार, आपण कसं एकदम मजेत आरामात करतो सगळं, no tension!" त्याला म्हणलं, "dude, you missed the point!" म्हणजे वेळेची गरज म्हणून अशी कसरत करणं वेगळं. पण असं एका वेळी 2-2, 3-3, किंवा 4-4 गोष्टी करून जो वेळ वाचवल्याचा, आपली कार्यक्षमता वाढवल्याचा आनंद असतो तो तुला नाही कळायचा!
एक मात्र खरं, ही गोष्टच अशी आहे की ती रक्तात असावी लागते, शिकणं फार अवघड. ती एक कला आहे. आणि हे नुसतं वेळ वाचवण्याबाबत नाही बरंका, सगळ्याच गोष्टींच्या नियोजनाबद्दल. सकाळी उठल्यापासून माझ्या डोक्यात हा "भुंगा" चालू असतो म्हणा न. अमुक एक गोष्ट केली की तमुक गोष्ट करायची, हे झाल्याशिवाय ते होउ शकणार नाही, हे करत असतानाच ते पण उरकून घेता येईल, समजा हे जमलं नाही तर निदान ते तरी होईल, एक ना दोन!
हे लिहीता लिहीता एक मात्र लक्षात आलं, मी मेकप करत नाही आणि दाढी पण ;) म्हणजे आता गाडी चालवताना करायला काहीतरी शोधून काढलं पाहिजे!

Sunday, February 11, 2007
कर कर करा
विंदा करंदीकरांचं "भारतीय स्त्रियांसाठी लिहीलेलं स्थानगीत" परवा ऐकलं (सौजन्य : नक्षत्रांचे देणे)
कर कर करा, मर मर मरा.
दळ दळ दळा, मळ मळ मळा, तळ तळ तळा
तळा आणि जळा.
बाज बाज बाजा, पाज पाज पाजा, पोस पोस पोसा
पोसा आणि सोसा.
धू धू धुवा, शिव शिव शिवा, चिर चिर चिरा
चिरा आणि झुरा.
कुढ कुढ कुढा, चिड चिड चिडा, झिज झिज झिजा
शिजवा आणि शिजा.
चटका बसला.
आमची पिढी भाग्यवान. आमच्यापैकी बहुतजणींना जळावं, सोसावं, झुरावं, शिजावं लागलं नाही. (आणि हे मी फक्त सुशिक्षित मध्यमवर्गींयांबद्दल बोलतीये). हा काळाचा महिमा आहे का? की मागच्या कित्येक पिढयांनी सोसून, वेळोवेळी त्याविरुद्ध झगडून आमच्यासाठी कमावून ठेवलेलं हे पुण्य आहे? असं असताना, विंदांनी जे शब्दात मांडलं ते प्रत्यक्ष न अनुभवता देखील आम्हाला कळतं का? डोळे मिटून क्षणभर मागच्या पिढीतल्या स्त्रियांचा विचार केला की अंगावर सर्रकन् काटा येतोच न? त्यांच्या परिस्थितीच्या नुसत्या कल्पनेनं हताश झालंसं वाटतंच न? वाडा चिरेबंदी मधली "सुख मिळेना तेव्हा मीच सुखास दूर लोटून दिलं" असं म्हणणारी आई आठवते. सुन्न व्हायला होतं, रागही येतो.
हे सगळं आम्ही कुठेतरी पाहिलंय्, आया-आज्यांकडून ऐकलंय्, स्वानुभवकथनातून वाचलंय्. मग मला प्रश्न पडला. मी जर हे असं काही सोसलं नाही, तर मला या "भारतीय स्त्रियांबद्दल" जे काही वाटतं ती सहानुभूती आहे की फक्त हळहळ? एक स्त्री म्हणून तो बसलेला चटका विंदांनी बघितलेल्या आणि म्हणून उत्कटपणे मांडलेल्या चटक्यापेक्षा वेगळा आहे का? मागच्या पिढयांमधून रक्तात वाहत आलेला वारसा आहे का? अजून काही पिढया भविष्यात डोकावून बघितलं, तर त्या भविष्यातल्या स्त्रीलाही असाच चटका बसेल? की काळाच्या ओघात ती जखम भरून निघाली असेल?
माहीत नाही.

Tuesday, January 30, 2007
कोई बात चले
सध्या गाडीत वाजतीये गुलज़ार-जगजित ची "कोई बात चले". "बात" कुछ तो ज़रूर है! पण "मरासिम" नंतर या अल्बमने अपेक्षाभंग केला असं नाही म्हणलं, तरी अपेक्षापूर्ती नक्कीच केली नाही. गुलज़ारच्या शब्दांपेक्षा जगजितच्या सुरांबाबत जास्त!
बाकी तर ऐकून ऐकून चढतीलच काही त्रिवेणी, पण पहिल्यांदाच ऐकून ही रुतून बसलीये, अगदी typical गुलज़ार!
उड के जाते हुए पंछी ने बस इतनाही देखा
देर तक हाथ हिलाती रही वोह शाख फिज़ा में
अलविदा कहती थी या पास बुलाती थी उसे?
अजून एक नोंदल्याशिवाय राहवत नाही:
उम्र के खेल में एकतर्फा है ये रस्साकशी
एक सिरा मुझको दिया होता तो कुछ बात भी थी
मुझसे तगडा भी है और सामने आता भी नहीं

Monday, November 27, 2006
पर्याय आणि निवडस्वातंत्र्य
ऑफिसच्या कॅंटीनच्या मेनूसमोर उभं राहून माझी एक सहकारी तक्रारीच्या सुरात म्हणाली, "हे काय, काही सुद्धा खावंसं वाटत नाही, याला हे लोक भरगच्च मेनू म्हणतात? काही choiceच नाही!" मेनूवर साताठ वेगवेगळे "पर्याय" असूनसुद्धा.
पर्याय ही मोठी मजेशीर गोष्ट आहे. भरगच्च पर्याय हे पुरेशा निवडस्वातंत्र्याचं निदर्शक आहे का? आपल्याला हवा असलेला नेमका पर्याय त्यात नसेल तर? जेव्हा आपण "सगळ्या पर्यायांचा नीट विचार करून मोकळ्या मनानी निवड करता आली पाहिजे" असं म्हणतो तेव्हा कुठेतरी आपल्याला मनापासून हवा असलेला पर्याय उपलब्ध आहे असं आपण गृहित धरलेलं असतं का? तसं नसेल तर मग कसा घेणार मोकळ्या मनानी निर्णय? कारण दिलेल्या पर्यायांची मर्यादा त्यावर आधीच पडलेली असते.
खर्या मोकळ्या मनानी तुम्ही निर्णय घेणार असाल तर तुम्हाला स्वत: पर्याय निर्माण करायचं, कमीत कमी धुंडाळायचं स्वातंत्र्य आणि सामर्थ्य हवं. निवडीचं स्वातंत्र्य हे उपलब्ध पर्यायांच्या पलिकडे जायला हवं. किंवा काही बहुपर्यायी प्रश्नांना कसा पाचवा पर्याय असतो न, "वरीलपैकी काहीही नाही", तसा कायम एक पाचवा पर्याय असावा! पण मग "वरीलपैकी काहीही नाही" हा पर्याय बाकीच्या सगळ्या पर्यायांना निरर्थक करतो. शिवाय "वरीलपैकी काहीही" नसलेलं म्हणजे काय हे नक्की माहीत असेल तर तो पाचवा पर्याय निवडण्यात अर्थ आहे न?
"हो ना, काही choiceच नाही" असं म्हणत आमचा घोळका ऑफिससमोरच्या रेस्टॉरंट कडे वळला, हे सांगणे नलगे! संध्याकाळी घरी आले आणि मेघना पेठेंचं "आंधळ्याच्या गायी" समोर दिसलं!
"
घटना घडतात.
पुरातल्या ओंडक्यासारखी माणसं त्यात वाहून जातात.
घडायचं ते घडून जातं...
पण तरीही पर्याय असतातच ठाकलेले..
तडफडण्याचे... हसण्याचे... रडण्याचे... हरण्याचे... जिंकण्याचे...
क्षमेचे... सूडाचे... स्वीकृतीचे... तुकण्याचे... साक्षित्त्वाचे...
त्यातला एकच निवडता येणार असतो,
आणि निवडावा तर लागणारच असतो!
पर्यवसान ठाऊक नसताना अंधारात घ्यावी लागणारी उडी...
माणसाच्या आयुष्यात नियत आहे ते हे.
यालाच आपण स्वातंत्र्य म्हणतो!
जाणिवेचा लख्ख उजेड नाही, आणि नेणिवेचा गच्च अंधार नाही,
अशा तिन्हीसांजेला, अंधुक प्रकाशातल्या जुलमी रानात
सोडाव्या लागणार्या या आंधळ्याच्या गायी...
त्यांना म्हणे देव राखतो...!
आणि आंधळा?
तो तर फक्त या भोळ्या विश्वासाची बासरी वाजवत राहतो.

Sunday, November 05, 2006
चार होत्या पक्षिणी त्या
तुम्हाला असं कधी तरी होतं का? होतच असणार. कुठल्या तरी बेसावध क्षणी कुठल्या तरी निमित्तानं कुठलीतरी जुनी गोष्ट आठवते. कुठलातरी जुना प्रसंग आठवतो. कुठलंतरी जुनं गाणं आठवतं. पण माझ्यासारखी "विस्मरणशक्ती" अफाट असेल तर धड पूर्ण आठवत नाही, बारकावे आठवत नाहीत... आणि मग अशी चुटपुट लागून राहते.
आता कालचीच गोष्ट बघा न....
निमित्त काय झालं ते पुन्हा कधीतरी. पण मला सारखी आठवत राहिली "वीज म्हणाली धरतीला" मधली जुलेखा, "चार होत्या पक्षिणी त्या". आणि हे गाणं पूर्ण काही आठवेना. तेव्हापासून जी काही अस्वस्थ झालीये!
तेव्हा या ब्लॉगच्या वाचकांनो (वाचतंय् का हो कोणी?), कोणाकडे असेल हे गाणं पूर्ण, कृपया नोंदा न!

Sunday, October 29, 2006
Sound of Music

My Day in the hills has come to an end, I know
A Star has come out, to tell me it's time to go
But deep in the dark green shadows
Are voices that urge me to stay
So I stop and I wait and I listen
For one more sound, for one more lovely thing
that the hills might say
The hills are alive with the sound of music
With songs they have sung for a thousand years.
The hills fill my heart with the sound of music
My heart wants to sing every song it hears....
Sound of Music. Magic of Music. ही संगीताची जादू जिवंत अनुभवायची संधी नुकतीच मिळाली. हेवर्डच्या डग्लस मॉरिसन थिएटरच्या कृपेने! मारियाची कथा प्रेमकथा आहे, पण सर्वसामान्य प्रेमकथा नाही. संगीताचं प्रेम, निसर्गाचं प्रेम, लहान मुलांचं प्रेम, देशावरचं प्रेम आणि प्रेमावरचं प्रेमसुद्धा! निखळ आणि निरागस, मोकळं आणि बेबंद, अल्लड आणि प्रगल्भ!
हा चित्रपट कैक वेळा बघूनही त्या संगीताची जादू इतकी अवीट आहे! सगळीच गाणी लहानपणापासून चढलेली! कोण्या मैत्रिणीनं लावून दिलेलं हे वेड कधी उतरलंच नाही. ती अद्भुत कथा, ते हृदयस्पर्शी आणि अर्थपूर्ण शब्द, ते जादुई संगीत याबद्दल मी नव्याने काय लिहीणार? जिथून या सगळ्या जादूला सुरुवात झाली तो मूळचा Broadway Show कसा असेल हे कुतूहल घेऊन बघायला गेले. आणि चलतचित्राच्या युगात इतकी प्रगती होऊनसुद्धा नाट्यकला का टिकून आहे याची पुन:प्रचिती आली.
अगदी छोट्याशा रंगमंदिरात सजलेला संगीताचा सोहळा मंत्रमुग्ध करून गेला. "live music" ची जादूच वेगळी! स्टेजवर आपल्या अगदी समोर पंधरा-वीस नन्स् हातात मेणबत्त्या घेऊन समरसून सुरेल प्रार्थना म्हणतात, त्यानी जी वातावरण निर्मिती झाली, ती कितीही आधुनिक ध्वनी सोयीनी युक्त असलेलं चित्रपटगृह, surround sound, dolby इ. इ. असलं तरी सुद्धा कदापि होणे नाही. अडिच-तीन तासाच्या त्या नाट्यानुभवात भुमिकेशी समरसून जाणार्या कलाकाराची एक-दोन वेळाच जरी नजरभेट झाली तरी तो सगळा अनुभव असा जिवंत होतो की वाटतं, "क्षण एक पुरे नाट्याचा, वर्षाव पडो चित्रांचा" ;-)
सुखदु:खाच्या प्रसंगी Sound of Music ची गाणी नेहेमीच साथ देत आली आहेत, देत राहतील. "She climbs a tree" मधला मिश्किल खिलाडूपणा, "High on the hills" मधली पोरकट गंमत, "Climb every mountain" मधलं धीरगंभीर मार्गदर्शन, "These are a few of my favourite things" मधला आनंदी खुशालचेंडूपणा, "I have confidence in confidence alone" मधला आशावाद, "Nothing comes from nothing" मधलं निखळ प्रेम... हे सगळं या नाटकानी परत जिवंत करून दिलं. आणि डोळे मिटून कधीही त्या वातावरणात शिरता येईल असा अनुभवही!
Monday, October 23, 2006
खरेच का हे!
परवा एका मैत्रिणीशी गप्पा मारताना अनिलांच्या या कवितेची आठवण निघाली. तिला नक्की शब्द आठवत नव्हते, आणि मला कुठेतरी लिहून ठेवलेली आठवत होती. म्हणून ही नोंद! त्या निमित्तानं, ही कविता प्रेमकविता आहे की भक्तिकविता किंवा विराणी असावी, अशी चर्चा झालेली आठवली...
तुझ्या पथावर तुझ्या पदांच्या
पायखुणांच्या शेजारी मम
पायखुणा या उमटत जाती
खरेच का हे?
मातीमधल्या मुशाफिरीतून
हात तुझा तो ईश्वरतेचा
चुरतो माझ्या मलीन हाती
खरेच का हे?
खरेच का हे बरेही का हे
दोन जगांचे तोडून कुंपण
गंधक तेज़ाबासम आपण
जळू पहावे?
आणि भयानक दहन टाळण्या
जवळपणातही दूर राहुनी
स्फोटाच्या या सरहद्दीवर
सदा रहावे?
-कुसुमाग्रज
तुझ्या पथावर तुझ्या पदांच्या
पायखुणांच्या शेजारी मम
पायखुणा या उमटत जाती
खरेच का हे?
मातीमधल्या मुशाफिरीतून
हात तुझा तो ईश्वरतेचा
चुरतो माझ्या मलीन हाती
खरेच का हे?
खरेच का हे बरेही का हे
दोन जगांचे तोडून कुंपण
गंधक तेज़ाबासम आपण
जळू पहावे?
आणि भयानक दहन टाळण्या
जवळपणातही दूर राहुनी
स्फोटाच्या या सरहद्दीवर
सदा रहावे?
-कुसुमाग्रज
Monday, September 25, 2006
सहानुभूती
जुनी गोष्ट. कत्रिना चक्रीवादळाच्या वेळी आम्ही काही सहयोगी चर्चा करत होतो, पीडितांच्या दुर्दशेबद्दल सहानुभूती व्यक्त करत होतो. आमच्यातील एक, फ्लोरिडा चा रहिवासी, बराच वेळ आमची चर्चा ऐकून घेत होता. आणि मग थोड्या वेळाने कत्रिना मुळे ताज्या झालेल्या त्याच्या लहानपणीच्या चक्रीवादळ एंड्र्यूच्या आठवणींबद्दल सांगायला लागला. त्या वेळी झालेले त्याचे हाल त्याला आठवले. सगळं घर उद्ध्वस्त झालेलं जणू काही त्याच्या डोळ्यांसमोर त्याला दिसत होतं. कत्रिना मधे वाताहत झालेल्या शेकडो कुटुंबांचं दु:ख त्याच्या आठवणीत उमटलेलं दिसत होतं. तेव्हा मला जाणवलं की कत्रिना पीडितांबद्दल खरी सहानुभूती फक्त बहुतेक त्यालाच वाटत होती, बाकीचे आम्ही व्यक्त करत होतो निव्वळ हळहळ.
सहनुभूती म्हणजे सह-अनुभूती. एकत्र घेतलेला अनुभव, किंवा एकसमान अनुभवातून निर्माण झालेली जवळीकीची भावना. दुसर्याचे दु:ख (बहुधा दु:खच, कारण सहानुभूती या शब्दात दु:ख अध्याहृत नसलं, तरी त्याच्या वापरात असतं) बघून आपल्याला आलेल्या तशाच अनुभवाची आठवण होऊन जागी झालेली वेदना. पण पुष्कळ वेळेला दुसर्याच्या दु:खाबद्दल व्यक्त केलेली हळहळ सहानुभूती म्हणुन गैरसमजली जाते. अर्थात याचा अर्थ असा नाही की मनापासून हळहळ व्यक्त करणार्याच्या भावना कमी महत्त्वाच्या असतात. पण जेव्हा आपण त्या वेदना जगलेल्या असतो, तेव्हाच त्याच्याशी खरी सहानुभूती दाखवू शकतो ना? कितीही मनापासून व्यक्त केली गेली तरी हळहळ खूपच परकी वाटायला लागते मग.
मन इतकं तरल होऊ शकतं का की स्वानुभवाशिवाय सहानुभूती जाणवावी? हळहळ आणि सहनुभूती यातील सीमारेषा नाहीशी व्हावी? फक्त दु:ख, वेदना यातून गेल्यावरच आपल्याकडे दुसर्याचं दु:ख समजण्याइतकी क्षमता येते? इंग्रजी मधे "relate" हा अगदी चपखल शब्द आहे या भावनेसाठी. त्याला मराठीत "सहकंप" म्हणता येईल का? असा सहकंप फक्त कटु अनुभवातूनच जन्म घेतो का? आनंद चार चौघांबरोबर वाटून घेतला की दुणावतो हे जरी खरं असलं, तरी एकत्र अनुभवलेली दु:खं आपल्याला एकमेकांच्या अधिक जवळ आणतात, घट्ट बंध निर्माण करतात. म्हणूनच "सहानुभूती" यात शब्दश: अध्याहृत नसलेलं दु:ख त्या भावनेत मात्र अंगभूत होऊन जात असेल का?

Tuesday, August 22, 2006
दाटून आलेल्या संध्याकाळी
अश्विनीच्या नोंदीने सुधीर मोघेंच्या या कवितेची आठवण करून दिली. माझ्या हॉस्टेल वरच्या एका मैत्रिणीने फार कौतुकानी ही कविता माझ्या लाडक्या कवितांच्या वहीत लिहून दिली होती. ती माझ्या छोट्या का होईना, पण गुंतवून ठेवणार्या त्या ठेव्यावर फारच खूष झाली होती. आणि मीही मिळतील ते थेंब गोळा करणारी, मग तिचाही ठेवा पालथा घातला! हॉस्टेल सोडल्यापासून दुर्दैवानं तिच्याशी संपर्क तुटला ("यथा काष्ठं च काष्ठं च" अन् दुसरं काय?), पण आज या कवितेच्या निमित्ताने तिची आठवण ताजी झाली. त्याबद्दल अश्विनीला धन्यवाद!
दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित सोनेरी उन पडतं
तसंच काहीसं पाउल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येतं!
शोधून कधी सापडत नाही
मागून कधी मिळत नाही
वादळ वेडं घुसतं तेव्हा
टाळू म्हणुन टळत नाही!
आकाश, पाणी, तारे, वारे
सारे सारे ताजे होतात
वर्षांच्या विटलेल्या बधिर मनाला
आवेशांचे तुरे फुटतात!
संभ्रम, स्वप्न, तळमळ, सांत्वन
किती किती तर्हा असतात
सार्या सार्या सारख्याच जीवघेण्या
आणि खोल जिव्हारी ठसतात!
प्रेमाच्या सफल विफलतेला
खरं तर काहीच महत्त्व नसतं
इथल्या जय पराजयात
एकच गहिरं सार्थक असतं!
मात्र ते भोगण्यासाठी
एक उसळणारं मन लागतं
खुळ्या सोनेरी उन्हासारखं
आपल्या आयुष्यात प्रेम यावं लागतं!
-सुधीर मोघे
दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित सोनेरी उन पडतं
तसंच काहीसं पाउल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येतं!
शोधून कधी सापडत नाही
मागून कधी मिळत नाही
वादळ वेडं घुसतं तेव्हा
टाळू म्हणुन टळत नाही!
आकाश, पाणी, तारे, वारे
सारे सारे ताजे होतात
वर्षांच्या विटलेल्या बधिर मनाला
आवेशांचे तुरे फुटतात!
संभ्रम, स्वप्न, तळमळ, सांत्वन
किती किती तर्हा असतात
सार्या सार्या सारख्याच जीवघेण्या
आणि खोल जिव्हारी ठसतात!
प्रेमाच्या सफल विफलतेला
खरं तर काहीच महत्त्व नसतं
इथल्या जय पराजयात
एकच गहिरं सार्थक असतं!
मात्र ते भोगण्यासाठी
एक उसळणारं मन लागतं
खुळ्या सोनेरी उन्हासारखं
आपल्या आयुष्यात प्रेम यावं लागतं!
-सुधीर मोघे
पाऊस कधीचा पडतो...
पावसाच्या दिवसांत आपल्या सर्वांच्याच मनात पावसाळी आठवणींचा पाऊस पडतो. आणि त्याचे प्रतिबिंब मराठी ब्लॉगविश्वात सुद्धा पावसाबद्दलच्या आठवणी, कविता, गझला यांच्या वर्षावाने उमटले. निसर्गाच्या अगदी "नेमेचि येणार्या" या साहजिक घटनेशी इतका हळवेपणा का बरं निगडित असावा?
अगदी लहानपणापासून मनावर उमटलेले शाळेचे नवीन वर्ष आणि त्यासोबत येणारे बरेच सारे नवेपण आठवते म्हणून? की पाण्यात खेळायचे बालसुलभ थरार कोणत्याही वयात पुन्हा लहान करून जाते म्हणून? की छत्री-रेनकोट सांभाळत अर्धं भिजून घरी आल्यावर गरम गरम चहा, भजी किंवा भाजलेल्या कणसाची तशी चव दुसर्या कुठल्याच दिवसात येत नाही म्हणून? की "रिमझिम पाऊस पडे सारखा" पासून "पाऊस कधीचा पडतो" पर्यंत आणि "ये रे ये रे पावसा" पासून "ती गेली तेव्हा रिमझिम" पर्यंत असंख्य गाणी मनात गर्दी करून नकळत असंख्य रंगांच्या भावनांत भिजवून टाकतात म्हणून?
की दुलई पांघरून खिडकीबाहेर तासंतास नुसता पाऊस बघत बसायची, समोरच्या घराच्या पन्हाळीतून पडणार्या धारेच्या नुसत्या आवाजावरून पावसाचा जोर किती आहे त्याचा अंदाज बांधायची, घरासमोर साठणार्या तळ्यात पाऊसच रेखत असलेल्या भिंगोर्या क्षणोक्षणी नवीन नक्षी करत आहेत असंच वाटून रमून जायची मजा आणखी कशात येऊच शकत नाही म्हणून? की आडोशाला पंखात चोची खुपसून उगीच रिकामटेकडे उद्योग करणार्या कबुतरांमधे आणि आपल्यामधे या क्षणी काहीच फरक नाही याची जाणीव फक्त तो पाऊसच देऊ शकतो म्हणून?
आणि अगदीच "क्लिशे" म्हणजे पहिल्या पावसानी भिजलेला मातीचा सुगंध वेडावणारा असतो म्हणून? पण खरं सांगते, घरच्यासारखा मातीचा सुगंध कुठेही येत नाही! परदेशात सुद्धा भिजलेल्या मातीचा सुगंध सुखावणारा अनुभव देऊन जातो खरा, पण तो वेडावणारा नसतो. शेवटी, घरची मातीच वेगळी असते हेच खरं, हे देखील सांगणारा तो पाऊसच!
पावसाचे दिवस सुरु झाल्यापासून, पावसावर इतक्या नोंदी वाचून खूप वेळा मोह होऊन सुद्धा मी ही नोंद उतरवायची अळंटळं करत होते. पण आज शेवटी राहवले नाही. आणि मी पण पावसाच्या नुसत्या उल्लेखानी येणार्या घरव्याकुळतेला शरण गेले!
हे पर्जन्यराया, तुझा महिमा अगाध आहे!

Saturday, July 01, 2006
एक तरी मैत्रीण हवी
परवा मैत्रीण ही कविता वाचली आणि शांता शेळकेंची याच नावाची कविता आठवली. दोन्ही कवितांचा मुखडा एकच असला तरी रुप किती वेगळं आहे! खूप पूर्वी सकाळच्या (बहुतेक सकाळच, कदाचित लोकसत्ता सुद्धा असेल) बालपुरवणीमधे प्रकाशित झालेली. हमखास सख्ख्या मैत्रिणीची आठवण काढून हुरहूर लावणारी...
एक तरी मैत्रीण हवी
कधीतरी तिच्यासंगे कडकडून भांडायला
मनामधल्या सार्या गमती तिच्यासमोर मांडायला!
एक तरी मैत्रीण हवी
शाळेमधे एका डब्यात एकत्र बसून जेवायला
घासामधला अर्धा घास अलगद काढून ठेवायला!
एक तरी मैत्रीण हवी
झाडाखाली गुलगुल गोष्टी किलबिल किलबिल बोलायला
कधी कधी लाडात येऊन गळ्याची शप्पथ घालायला!
-शांता शेळके

Thursday, June 22, 2006
चढलेली गाणी
नवीन गाणी ऐकली की नक्की कधी आणि कशी आवडायला लागतात, हे सांगणं कठीण आहे. शाळा-कॉलेजात असताना सिनेमातली गाणी तर दिवसरात्र रेडिओवर, टी. व्ही. वर, गल्लीत लाउडस्पीकरवर ऐकून ऐकून आवडायला लागलेली खूप आहेत. तेही नेमकी परीक्षेच्या वेळेला. सिनेमातलीच कशाला, मी "माझा कोंबडा कोणी मारियला..." सुद्धा ऐकून ऐकून गुणगुणायला लागले होते, आणि आईची बोलणी पण खाल्ली होती. भारत सोडल्यापासून या आनंदाला मुकली आहे! म्हणजे गाणी टी. व्ही.-रेडिओवर ऐकायला मिळातात, पण "कोंबड्याची" सर नाही ;-)
फार थोडी गाणी अशी असतात की जी एकदाच ऐकून आवडून जातात. मला तर नवीन गाणं तीन-चार वेळा ऐकून, त्याचे शब्द नीट समजल्याशिवायत त्यात अगदी क्वचितच रस निर्माण होतो. नुसतीच धुन आवडली, आणि मग शब्द काहीही असले तरी चालेल असं नाही चालत. पण सगळीच नवीन गाणी खूप वेळा ऐकून आवडतात असंही नाही. त्यामुळे एखादी नवीन CD आणली की ती गाडीमधे बरेच दिवस असंख्य वेळा वाजत राहते. त्यातली काही गाणी आवडतात, काही खूप आवडतात, आणि काही चक्क चढतात! असं चढलेलं गाणं लागोपाठ दहा-बारा वेळा ऐकते मी. अगदी तोंडपाठ झाल्याशिवाय थांबतच नाही. आवडलेली, खूप आवडलेली गाणी सुद्धा पुन्हा पुन्हा ऐकली जातात, पण चढलेल्या गाण्यांची नशा वेगळीच असते न?
हे सगळं सांगायचं कारण म्हणजे अलिकडचं चढलेलं गाणं. सध्या पद्मजा फेणाणी जोगळेकरांची नवीन CD वाजतीये रोज गाडीत. यात इंदिरा संतांच्या चार कविता, शंकर रामाणी यांच्या दोन आणि कुसुमाग्रजांची "पृथ्वीचे प्रेमगीत" अशी गाणी पद्मजांच्या आवाजात आहेत. इंदिरा संतांच्या सोप्या, मोकळ्या, साधेपणातील सौंदर्याची ओळख ओळीओळीतून पटवून देणार्या कविता तर मोहक आहेतच. पृथ्वीचे प्रेमगीत बद्दल मी नव्याने काय सांगणार? पण मला शंकर रामाणींच्या कवितांची मात्र ओळख पहिल्यांदाच झाली. आणि त्या दोन्ही कविता चढल्या. त्यातली ही एक कविता.
सांजघडी सातजणी पाणियाला गेल्या
सावल्यात हरवून वाट विसरल्या
वाट विसरल्या आणि विसरल्या घाट
सात जणींच्या सावल्या झाल्या घनदाट
खोल सावळल्या तरी, सावरल्या काय
मनमोराला फुटले इथे तिथे पाय
सांजघडी सातजणी पाणियाला गेल्या
सावळ्यात हरवून वाट विसरल्या
हा सावल्या आणि सावळ्याचा खेळ किती वेधक आहे! आणि त्याच्या जोडीला सुंदर संगीत आणि पद्मजांचा मधुर आवाज, गाणं चढलं नाही तरच नवल!!

Friday, May 05, 2006
पुस्तकनिष्ठांची मांदियाळी
ट्युलिपनं मला या विषयावर लिहायला टॅग केलं तेव्हा खूप आनंद झाला. आणि थोडीशी ओशाळून पण गेले. कारण मी काही खूप पुस्तकं "खाणारी" नाही. शिवाय भारत सोडल्यापासून मराठी वाचन कमी झालंय हेही खरंच. अगदी वर्षाकाठी घरी गेलं की विकत घेतलेली आणि भेट मिळालेली पुस्तकंसुद्धा सगळी नाही वाचून होत. तरी देखील कपाटात असलेली पुस्तकं कायम खुणावत असतात हे खरंच. शिवाय शाळेत असल्यापासून काही वाचलेलं, काही वेचलेलं आहेच की! तर माझ्या पुस्तक गाठोडीतलं काही...
१. सध्या वाचनात असलेले/शेवटचे वाचलेले वा विकत घेतलेले मराठी पुस्तक :
स्वत:विषयी : अनिल अवचट
२. वाचले असल्यास त्यावर थोडक्यात माहिती :
"स्वत:विषयी" म्हणजे अगदी सहज मोकळ्या, ओघवत्या भाषेत केलेलं स्वानुभवांचं प्रांजळ कथन. त्याच्या साधेपणात त्याचं सौंदर्य आहे. इतका मोठ खटाटोप मांडणारा माणूस किती साधा असू शकतो यानी अचंबित झाले मी हे पुस्तक वाचल्यावर. आणि लक्षात राहिली अर्पणपत्रिका - "सुनंदा, हे पुस्तक अर्पण करण्यासाठी तुला काही काळ माझ्यातून बाहेर काढावं लागतंय, त्याबद्दल थोडी रुखरुख."
३. अतिशय आवडणारी/प्रभाव पाडणारी ५ मराठी पुस्तके :
आनंदी गोपाळ : श्री. ज. जोशी
स्वामी : रणजीत देसाई
पाडस : राम पटवर्धन
समीधा : साधना आमटे
बोलगाणी : मंगेश पाडगावकर
४. अद्याप वाचायची आहेत, अशी ५ मराठी पुस्तके :
स्मृतिचित्रे : लक्ष्मीबाई टिळक
माझी जन्मठेप : वि. दा. सावरकर
आई : मॅक्सिम गॉर्की
टॉलस्टॉय एक माणूस : सुमती देवस्थळी
ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी : प्रतिभा रानडे
५. एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे :
निर्विवादपणे, "असा मी असामी", अतिशय प्रिय पुस्तक. चार मित्र मैत्रिणी जमले की अगदी नकळत या पुस्तकातील कुठली तरी कोटी निघतेच निघते. इतकं पु. लं. नी आमच्या तुमच्या सारख्या सगळ्या "असामींना" त्यात सामावून घेतलेलं. कुठलंही पान उघडून वाचावं... खरं म्हणजे पारायणं करून आता इतकं पाठ झालंय की पुस्तक उघडायचीही गरज नाही. पण तरीही उघडलं तरी हजाराव्यांदा वाचताना सुद्धा ओठावर स्मित फुटावं म्हणजे काय जादू आहे!
आता या सहब्लॉगर्सना tag करते ('खो' देते म्हणायचा मोह होतोय :-) )
दीपा
कौस्तुभ
विदग्ध
यतीन

Friday, April 21, 2006
बुचाची फुलं
काही दिवसांपूर्वी अपार्टमेंटच्या आवारात निलगिरीच्या टोप्यांचा सडा पडला होता. मंद वास पण येत होता. छाती भरून तो वास घेतला आणि शाळेची आठवण झाली. शाळेत अशीच झाडं होती निलगिरीची, आणि टोप्यांचा सडा पडायचा. बाकीचीही खूप झाडं होती. गुलमोहर, शिरीष, चिंच, विलायती चिंच, बदाम, चेंडूफळ (टण्णूचं झाड!), बूच, पिंपळ, अशोक.... ऋतूमानाप्रमाणे आम्ही कुठली कुठली फुलं गोळा करत असू. चिंचा, चिंचेची फुलं सुद्धा. गुलमोहराच्या पाकळ्यांच्या अंगठ्या करत असू. विलायती चिंचा तुरट लागल्या तरी गोळा करून चाखत असू. अशोकाच्या बिया गोळा करणे हा तर खूप जणींचा छंद होता.
पण सगळ्यात "लोकप्रिय" होती बुचाची फुलं. ती झाडं फुलली की आवारात शिरल्या शिरल्याच बुचाचा मस्त वास यायचा. आणि शाळा भरण्याआधी, छोट्या आणि मोठ्या सुट्टीत, शाळा सुटल्यावर बुचाची फुलं वेचायला काही "वेड्या" मुली नेहेमी झाडाखाली रेंगाळायच्या. नुसत्या रेंगाळायच्या नाहीत. ताजी फुलं झेलायला ताटकळत वर नजर लावून अक्षरश: "दबा" धरून असायच्या. एखादं फुल झाडावरून अलगद गिरक्या घेत खाली झेपावताना दिसलं की सगळ्या त्याकडे झेपावायच्या. अगदी स्पर्धाच असायची ते फुल झेलायला. जिला ते फुल मिळेल तिच्या चेहर्यावर विजयाचा आनंद अगदी ओसंडून वहायचा! आणि मग त्या वेचलेल्या फुलांच्या लांबच लांब वेण्या तयार करायची स्पर्धा. आवारातच नाही तर सगळ्या वर्गांमधूनही मग बुचाचा घमघमाट येत रहायचा. असे मोहक, गंधित, वेडे दिवस होते शाळेतले!
तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? शाळेच्या वेड्या दिवसांची आठवण व्हायला नुसता निलगिरीचा मंद वास पुरे होता. तसं पहायला गेलं तर शाळेच्या दिवसांची आठवण यायला फार काही लागत नाही. लहानपणाच्या आठवणी आपल्या सगळ्यांनाच व्याकुळ करतात. कधी कधी तर अगदी ध्यानी मनी नसताना समोर ठाकतात. त्यातून माझ्यासारख्या शाळेच्या प्रेमात असलेल्यांना तर अगदी "शाळाव्याकुळ" करून सोडतात. (हा ट्युलिपच्या "घरव्याकुळ" वरून बनवलेला शब्द, वाचतीयेस का ग ;-) )

Friday, April 14, 2006
स्वप्न
"ही शुभ्र फुलांची ज्वाला" या पद्मजा फेणाणी-जोगळेकरांच्या आवाजातील ध्वनीमुद्रिकेवर विंदा करंदीकरांची एक फार सुंदर कविता आहे,
मागू नको सख्या, जे माझे न राहीलेले
ते एक स्वप्न होते, स्वप्नात पाहीलेले...
त्यातल्या दोन ओळी मला फार मोहवतात :
स्वप्नात वाहीलेले म्हणुनी कसे असत्य
स्वप्नास सत्य असते सामील जाहलेले...
खरंच, स्वप्न आणि सत्य यांच्यातली सीमारेषा इतकी पुसट असते का? किमान ती तशी असावी असं वाटत राहतं हे नक्की. जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला सत्यात आणण्याची तीव्र इच्छा असते, पण ती सत्यात आणता येतेच असं नाही, तेव्हाच तर आपण त्याची स्वप्नं बघतो ना? पण म्हणून ती "असत्य" थोडीच असते? त्या गोष्टीची तीव्र इच्छा जणू काही त्याला सत्य बनवून टाकते. मग ते "स्वप्न" "असत्य" कसं होईल?
स्वप्नांना सत्यास सामील करणार्यासाठी आपण सगळेच झगडत असतो. स्वप्न सत्यात आणण्यासाठी आपण झगडत राहतो. जे जे जमेल ते ते करत राहतो, काही म्हणता काही सुद्धा सोडत नाहीत. आणि ती स्वप्नं आज न उद्या सत्यात उतरतातही. आपले प्रयत्नच आपलं स्वप्न सत्यास सामील करून टाकतात.
पण काही स्वप्नं मात्र फक्त रंगवण्यात रमून जायचं असतं, सत्यात आणण्यासाठी झगडायचं नसतं. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून काही क्षण स्वप्न बघण्यात घालवणं किती मनोरंजक असतं! अशी स्वप्नं सत्याला म्हणजेच आपल्या मनातल्या तीव्र, सूप्त इच्छेला आपल्यात सामील करून घेतात!
या Disney च्या गाण्याची आठवण झाली. स्वप्न आणि सत्याची किती छानशी सांगड घातली आहे:
A dream is a wish your heart makes,
When you're fast asleep
In dreams you lose your heartaches,
Whatever you wish for, you keep
Have faith in your dreams and someday,
Your rainbow will come smilling through
No matter how your heart is grieving,
If you keep on believing,
The dreams that you wish will come true.

Wednesday, April 12, 2006
समज
Tulip च्या ब्लॉगवर Emotional Dependence नोंद वाचली आणि ही कविता आठवली.
तुझ्याशी वाद करताना
आताशा माझा आवाज
तितकासा चढलेला नसतो
आणि तुझी प्रतिक्रियाही
झोंबण्याइतकी तिखट नसते
तुझ्या मागोमाग निमूटपणे येताना
मी फारशी खळखळ करत नाही
पण कधीतरी मी यायचं नाकारलंच
तर तूही हट्ट धरत नाहीस
तुझ्या निशिगंधाचं मला अप्रूप वाटावं
यामुळं तू भारावून जात नाहीस
नि मी लावलेल्या गुलाबाची
मला हवी तशी दखल
तू घेतली नाहीस तरी
मीही हळवी होत नाही
आपल्या हातून निसटून गेलेल्या
संवत्सरांनी जाता जाता
समंजसपणाची शाल
आपल्यावर पांघरली आहे?
की बरेच श्रावण बरसून गेल्यावर
आता सरावाने कोसळणार्या पावसात
तितकासा आवेग उरलेला नाही?
- आसावरी काकडे
तुझ्याशी वाद करताना
आताशा माझा आवाज
तितकासा चढलेला नसतो
आणि तुझी प्रतिक्रियाही
झोंबण्याइतकी तिखट नसते
तुझ्या मागोमाग निमूटपणे येताना
मी फारशी खळखळ करत नाही
पण कधीतरी मी यायचं नाकारलंच
तर तूही हट्ट धरत नाहीस
तुझ्या निशिगंधाचं मला अप्रूप वाटावं
यामुळं तू भारावून जात नाहीस
नि मी लावलेल्या गुलाबाची
मला हवी तशी दखल
तू घेतली नाहीस तरी
मीही हळवी होत नाही
आपल्या हातून निसटून गेलेल्या
संवत्सरांनी जाता जाता
समंजसपणाची शाल
आपल्यावर पांघरली आहे?
की बरेच श्रावण बरसून गेल्यावर
आता सरावाने कोसळणार्या पावसात
तितकासा आवेग उरलेला नाही?
- आसावरी काकडे
Subscribe to:
Posts (Atom)