Monday, November 03, 2008

मंगल तोरण

आज किती दिवसांनी इंद्र धनुष्य भेटलं! तेसुद्धा कसं? एखादा रोमांचक नाट्यसोहळा व्हावा तसं!

आणि रंगमंच तरी काय सजला होता! आकाशात वर बघावं तर अगदी गर्द निळे ढग. धीरगंभीर, अविचल उत्सुकतेनं सोहळ्यासाठी तयार झालेले! आणि कुठून तरी चुकार सूर्यकिरण डोकावत होतेच! असा जादूई सोनेरी प्रकाश अक्षरश: सांडला होता न सगळीकडे, की प्राजक्‍ताची फुलं नाजूक हातानं वेचावी तसा तो जाऊन वेचता आला तर आयुष्यभर जपून ठेवता येईल असं वाटलं! सगळं खरंच शांत झालं की माझ्या संवेदना बाकी काही टिपेना झाल्या कोणास ठाऊक! आणि मग अचानक "lights, camera rolling, ACTION" असं कोणी म्हणावं आणि नटून थटून सज्ज झालेल्या कलाकारानी प्रवेश करावा, तसे ते सातही रंग प्रकट झाले, बघता बघता गडद होत गेले! काय झोकदार प्रवेश! सातही रंग पारखून घ्यावे, चित्रही तेच, नाट्यही तेच, नृत्यही तेच आणि संगीतही तेच! साथ होती नं, उत्स्फूर्तपणे वाजणार्‍या वार्‍याच्या शीळेतून आणि उत्साहानी पिटणार्‍या पानांच्या टाळ्यांतून खुलत जाणारी! बाकी आकाशात काहीच हालचाल नाही! सहकलाकारही दिपून, दबून गेले असावेत, तो रंगसोहळा बघून आपला पदन्यास विसरून गेले असावेत? की त्या सप्तरंगांच्या जादूवर खिळून राहिलेल्या माझ्या नजरेनी त्यांची नृत्यसाथ टिपली नसावी?

किती वेळ झाला असेल माहीत नाही! मग त्या आकाशातल्या नायकाचं दिलखुलास मिरवून झालं म्हणून, की ढळणार्‍या सूर्याची साथ करत जाणं भाग पडलं म्हणून की डोंगरांपलिकडे दुसरा रंगमंच सजताना दिसतोय म्हणून; त्यानी आपलं प्रदर्शन आवरतं घेतलं खरं! आणि तेही कसं डौलानं. एका क्षितिजावर घट्ट पाय रोवून दुसर्‍या टोकाकडून हळूच अंग चोरून घेत. त्याच्यावर खिळलेली माझी नजर सुद्धा आकाशात एक गोफ विणत गेली, गोलाकार, झोकदार!

पण छे! नाट्य संपलं नव्हतं अजून! आता तर सहकलाकारांना उत्साह आला. भानावर येऊन, अंग घुसळून आसमंत त्यांनी दणाणून सोडला आणि क्षणार्धात चारी दिशा चिंब भिजवून टाकल्या! त्या नव्यानी सुरु झालेल्या नाट्यातून त्यांचा निरोप खचित माझ्यापर्यंत पोचला,

"असतील त्याच्याकडे रंग तेजस्वी, आमचेही नृत्य कौशल्य काही कमी नाही!"

"हो रे बाबांनो!"

मी हसत माझ्या कामाला लागले. खिडकी सोडताना आता कुठे लक्ष गेलं रस्त्यावर शिस्तीत धावणार्‍या गाड्यांकडे! नुसतंच हसून त्यांना म्हणाले, "रंगमंदिरात हजर असूनसुद्धा हा अप्रतिम सोहळा सोडून नीरस रस्त्याकडे बघावं लागणं हे काय अहोदुर्भाग्य! तुम्हालाही कधीतरी तो कलाकार उराउरी भेटू दे!"

कोणे एके काळी अशाच कुठल्याशा अनुभूतीला बालकवींनी शब्दबद्ध केले असेल न? आज तो सोहळा त्या सदाबहार शब्दांची अनुभूति देत भिजवून गेला! आणि तो डोळ्यांसमोर तरळत असतानाच मी त्या रंगांच्या जादूगाराला प्रश्न केला, पुढची भेट कधी? अशीच अवचित?

5 comments:

Harshada Vinaya said...

क्या बात है! ही तर गद्यातली कविता.. सूंदर लिखाण

Abhi said...

खूपच सुंदर, खूपच उत्कट!!!

HAREKRISHNAJI said...

After long time

संवादिनी said...

masta..khoop avadala....

Anand Sarolkar said...

Classsssssssssssssssss!!!

Kay mast lihila ahes :)