Friday, April 21, 2006

बुचाची फुलं

काही दिवसांपूर्वी अपार्टमेंटच्या आवारात निलगिरीच्या टोप्यांचा सडा पडला होता. मंद वास पण येत होता. छाती भरून तो वास घेतला आणि शाळेची आठवण झाली. शाळेत अशीच झाडं होती निलगिरीची, आणि टोप्यांचा सडा पडायचा. बाकीचीही खूप झाडं होती. गुलमोहर, शिरीष, चिंच, विलायती चिंच, बदाम, चेंडूफळ (टण्णूचं झाड!), बूच, पिंपळ, अशोक.... ऋतूमानाप्रमाणे आम्ही कुठली कुठली फुलं गोळा करत असू. चिंचा, चिंचेची फुलं सुद्धा. गुलमोहराच्या पाकळ्यांच्या अंगठ्या करत असू. विलायती चिंचा तुरट लागल्या तरी गोळा करून चाखत असू. अशोकाच्या बिया गोळा करणे हा तर खूप जणींचा छंद होता.

पण सगळ्यात "लोकप्रिय" होती बुचाची फुलं. ती झाडं फुलली की आवारात शिरल्या शिरल्याच बुचाचा मस्त वास यायचा. आणि शाळा भरण्याआधी, छोट्या आणि मोठ्या सुट्टीत, शाळा सुटल्यावर बुचाची फुलं वेचायला काही "वेड्या" मुली नेहेमी झाडाखाली रेंगाळायच्या. नुसत्या रेंगाळायच्या नाहीत. ताजी फुलं झेलायला ताटकळत वर नजर लावून अक्षरश: "दबा" धरून असायच्या. एखादं फुल झाडावरून अलगद गिरक्या घेत खाली झेपावताना दिसलं की सगळ्या त्याकडे झेपावायच्या. अगदी स्पर्धाच असायची ते फुल झेलायला. जिला ते फुल मिळेल तिच्या चेहर्‍यावर विजयाचा आनंद अगदी ओसंडून वहायचा! आणि मग त्या वेचलेल्या फुलांच्या लांबच लांब वेण्या तयार करायची स्पर्धा. आवारातच नाही तर सगळ्या वर्गांमधूनही मग बुचाचा घमघमाट येत रहायचा. असे मोहक, गंधित, वेडे दिवस होते शाळेतले!

तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? शाळेच्या वेड्या दिवसांची आठवण व्हायला नुसता निलगिरीचा मंद वास पुरे होता. तसं पहायला गेलं तर शाळेच्या दिवसांची आठवण यायला फार काही लागत नाही. लहानपणाच्या आठवणी आपल्या सगळ्यांनाच व्याकुळ करतात. कधी कधी तर अगदी ध्यानी मनी नसताना समोर ठाकतात. त्यातून माझ्यासारख्या शाळेच्या प्रेमात असलेल्यांना तर अगदी "शाळाव्याकुळ" करून सोडतात. (हा ट्युलिपच्या "घरव्याकुळ" वरून बनवलेला शब्द, वाचतीयेस का ग ;-) )

Friday, April 14, 2006

स्वप्न

"ही शुभ्र फुलांची ज्वाला" या पद्मजा फेणाणी-जोगळेकरांच्या आवाजातील ध्वनीमुद्रिकेवर विंदा करंदीकरांची एक फार सुंदर कविता आहे,

मागू नको सख्या, जे माझे न राहीलेले
ते एक स्वप्न होते, स्वप्नात पाहीलेले...

त्यातल्या दोन ओळी मला फार मोहवतात :

स्वप्नात वाहीलेले म्हणुनी कसे असत्य
स्वप्नास सत्य असते सामील जाहलेले...

खरंच, स्वप्न आणि सत्य यांच्यातली सीमारेषा इतकी पुसट असते का? किमान ती तशी असावी असं वाटत राहतं हे नक्की. जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला सत्यात आणण्याची तीव्र इच्छा असते, पण ती सत्यात आणता येतेच असं नाही, तेव्हाच तर आपण त्याची स्वप्नं बघतो ना? पण म्हणून ती "असत्य" थोडीच असते? त्या गोष्टीची तीव्र इच्छा जणू काही त्याला सत्य बनवून टाकते. मग ते "स्वप्न" "असत्य" कसं होईल?

स्वप्नांना सत्यास सामील करणार्‍यासाठी आपण सगळेच झगडत असतो. स्वप्न सत्यात आणण्यासाठी आपण झगडत राहतो. जे जे जमेल ते ते करत राहतो, काही म्हणता काही सुद्धा सोडत नाहीत. आणि ती स्वप्नं आज न उद्या सत्यात उतरतातही. आपले प्रयत्नच आपलं स्वप्न सत्यास सामील करून टाकतात.

पण काही स्वप्नं मात्र फक्‍त रंगवण्यात रमून जायचं असतं, सत्यात आणण्यासाठी झगडायचं नसतं. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून काही क्षण स्वप्न बघण्यात घालवणं किती मनोरंजक असतं! अशी स्वप्नं सत्याला म्हणजेच आपल्या मनातल्या तीव्र, सूप्त इच्छेला आपल्यात सामील करून घेतात!

या Disney च्या गाण्याची आठवण झाली. स्वप्न आणि सत्याची किती छानशी सांगड घातली आहे:

A dream is a wish your heart makes,
When you're fast asleep
In dreams you lose your heartaches,
Whatever you wish for, you keep
Have faith in your dreams and someday,
Your rainbow will come smilling through
No matter how your heart is grieving,
If you keep on believing,
The dreams that you wish will come true.

Wednesday, April 12, 2006

समज

Tulip च्या ब्लॉगवर Emotional Dependence नोंद वाचली आणि ही कविता आठवली.

तुझ्याशी वाद करताना
आताशा माझा आवाज
तितकासा चढलेला नसतो
आणि तुझी प्रतिक्रियाही
झोंबण्याइतकी तिखट नसते

तुझ्या मागोमाग निमूटपणे येताना
मी फारशी खळखळ करत नाही
पण कधीतरी मी यायचं नाकारलंच
तर तूही हट्ट धरत नाहीस

तुझ्या निशिगंधाचं मला अप्रूप वाटावं
यामुळं तू भारावून जात नाहीस
नि मी लावलेल्या गुलाबाची
मला हवी तशी दखल
तू घेतली नाहीस तरी
मीही हळवी होत नाही

आपल्या हातून निसटून गेलेल्या
संवत्सरांनी जाता जाता
समंजसपणाची शाल
आपल्यावर पांघरली आहे?

की बरेच श्रावण बरसून गेल्यावर
आता सरावाने कोसळणार्‍या पावसात
तितकासा आवेग उरलेला नाही?

- आसावरी काकडे

Tuesday, April 04, 2006

मैफल

रविवारी मिलपिटास मधे एक अविस्मरणीय मैफल झाली. "शुभ्र फुलांच्या ज्वाला". पं. वसंतराव देशपांडेंचे नातू राहुल देशपांडे यांची. मी काही शास्त्रोक्‍त संगीताची जाणकार किंवा अभ्यासक नसल्याने, मैफिलीबद्दल काही विश्लेषणात्मक वगैरे लिहायचं धाडस नाही करत. स्वरांनी भारावलेले ते चार तास माझ्यातल्या सामान्य रसिकाला मंत्रमुग्ध करून गेले.

तेजोनिधी लोहगोल, वाटेवर काटे, घेइ छंद मकरंद, सुरत पिया, दाटून कंठ येतो, मृगनयना रसिकमोहिनी, दुनिया वेड्यांचा बाजार ... अशी सगळी नाट्य-चित्रपट गीतं आणि रागदारी. या बरोबरच वसंतरावांच्या काही आठवणी आणि काही किस्से सुद्धा.

एकदा वसंतरावांना एका खडूस श्रोत्यानं विचारले, "का हो, तुमचं कोणत्याही तबलजीशी जमतं का?" उत्तर तयार: "माझं गाणं कायम जमलेलंच असतं हो. पण तुमच्यासारख्याला ते कळावं म्हणून मी आपला साथीला तबला घेतो, झालं!"

अशा मैफिलींचा आनंद घेता येतो हेच मी माझं महाभाग्य समजते. आपण कुठे काही वाचलेलं छानसं असं दुसर्‍यांबरोबर वाटून घेऊन त्याचा आनंद द्विगुणित करता येणं तसं सोपं असतं. पण अशा सुरांच्या मैफिलीचा आनंद तुमच्यापर्यंत कसा पोचवू, कसा वाटून घेऊ, तिथे शब्द थिटे पडतात! त्या सुरांना त्या क्षणी डोळे मिटून मी माझ्यापुरते तरी बंदिस्त करून ठेवलेत. पण या निमित्तानं तुम्हीही कधी अशाच अनुभवलेल्या मैफिलीची आठवण डोळे मिटून दोन क्षण काढू शकलात, तरी माझा आनंद तुमच्या पर्यंत पोचला असं समजीन!

Tuesday, March 14, 2006

देखो मगर प्यार से!

गाडी चालवताना माझं लक्ष बर्‍याच वेळा समोरच्या गाडीच्या लायसन्स् प्लेट कडे जातं. काल सकाळी signal ला थांबले असताना एक लायसन्स् प्लेट बघितली "ANIM8AR", अर्थात "animator". इथे अशा प्लेटस् बर्‍याच वेळा बघायला मिळतात. मला कौतुक वाटतं त्या लोकांच्या कल्पकतेचं! "YFS CAR", "DON N4C", "ML8 ML8" या अजून काही लक्षात राहीलेल्या गंमतशीर पाट्या. google वर search मारला तर कदाचित मोठी यादी मिळेल.

"ANIM8AR" बघून या पाट्यांची आठवण झाली आणि एकदम भारतातल्या ट्रकच्या मागे लिहीलेली काहीच्या काही घोषवाक्यं आठवून खूप हसू आलं. अगदी "आई-वडीलांचा आशीर्वाद", "साई-कृपा" किंवा "जय भोलेनाथ" पासून "देखो मगर प्यार से", "चल मेरी धन्नो" किंवा "जंगल की रानी" पर्यंत आणि कुटुंबनियोजनाच्या घोषणांपासून ते वनसंवर्धनाच्या ब्रीदांपर्यंत काय वाट्टेल ते. तेही लिहीणार्‍यांच्या कल्पकतेचं कौतुक आहे न? आणि हे सगळं "Horn OK Please" (मधोमध कमळाचं चित्र!) याच्या अवती भवती विखुरलेलं, एक एक शब्द लावून वाक्‍य पूर्ण करायचं म्हणजे कसरत!

हे सगळं आठवून हसू आवरेना. ऑफिसच्या दारात एरिक (सहयोगी) दिसला.
"कशाला हसतीयेस इतकं?" त्यानं विचारलं.
"देखो मगर प्यारसे" अस्मादिक!
"Oh is that 'good morning' in Indian?"
"Yes", म्हणलं जरा फिरकी घ्यावी त्याची! त्याला मग "देखो मगर प्यारसे" म्हणायला शिकवलं. म्हणलं तुला कुणी Indian मुलगी पटवायची असेल तर उपयोग होईल. पठ्ठ्याची चिकाटी पण इतकी की दिवसभर घोकत होता!

आणि आज सकाळी आल्या आल्या "देखो मगर प्यारसे सुमेधा"!! आता थोडे दिवस रोज सकाळची करमणूक होणार आहे ही :-)

Friday, March 10, 2006

कळत जाते तसे...

कधी कधी कारण नसताना उदास, रिकामं वाटतं ना? बाहेर ढगाळ हवा असली, किंवा संध्याकाळी कातरवेळेला उगीचच घराची आठवण आली, किंवा दिवसभराच्या कामाचा शीण विसरायला म्हणून दोन क्षण डोळे मिटून बसलं आणि डोळे उघडल्यावर सुचत नाही काही ...

अशा वेळी मला हटकून बोरकरांची ही कविता आठवते! आपले अनुभव, त्यातून येणारं (कमीत कमी येणं अपेक्षित असलेलं) शहाणपण आणि ही उदास, रिकामी जाणीव याचा खरंच काही संबंध असतो का?

कळत जाते तसे कशी जवळचीही होतात दूर?
जुने शब्द सुने होउन वाजतात कसे बद्द निसूर?

कळत जाते तसे कसे ऊन पाण्यात खिरुन जाते
वाकुड सावल्यात वाट चुकून चांदणे कसे झुरून जाते?

कळत जाते तसे कशा मूर्ती सार्‍या झिजून जातात
पापण्यांमधले स्नेह थिजून ज्योती कशा विझून जातात?

कळत जाते तसे कशी झाडे पाखरे जीव लावतात
शब्द सारे मिटून कसे तळ्यामधेच पेंगू लागतात?

कळत जाते तसे कशा दूरच्या घंटा ऐकू येतात
दूरचे रंग दूरचे गंध प्राण कसा वेधून घेतात?

कळत जाते तसे का रे एकटा एकटा होतो जीव
राग रोष सरून कशी आपलीच आपणा येते कीव?

बा. भ. बोरकर

Monday, March 06, 2006

पाखरू

आज सकाळी खूप अस्वस्थ करणारी गोष्ट बघितली. सकाळी ऑफिसला जाताना एक चिमण्या पाखरांचा घोळका रस्त्याच्या कडेला अगदी जमिनीजवळून भरारी मारत होता. आणि माझ्या पुढच्या मोठया एस्. यू. व्ही. च्या चाकाखाली त्यातील एक पाखरू..... मला एकदम धक्का बसल्या सारखं झालं, मी कचकन् ब्रेक दाबला, अर्थात त्याचा काही उपयोग नव्हता! आणि मागच्या गाडीने जोरात हॉर्न वाजवला तो वेगळाच..

पण ते पाखरू काही दिवसभर डोक्यातून जाईना. त्याच्या घोळक्यातली पाखरं त्याला शोधत बसली असतील का? त्याला असं निपचित पडलेलं बघून चिवचिवाट करत तिथे घोटाळत राहिली असतील का? की आपल्या रोजच्या कार्यक्रमाला लागली असतील? माझ्यासारखं त्यांच्यापैकी कोणाच्या डोक्यात त्यांचा सोबती घोळत राहीला असेल का? एक न दोन.

आता थोडे दिवस तरी त्या रस्त्यावरून जाताना त्याची आठवण येत राहील...

Monday, February 27, 2006

स्मृति

कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीला प्रणाम. ही माझी खूप आवडती कविता!

नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परि स्मरते आणिक करते व्याकुळ केव्हा
त्या माजघरातिल मंद दिव्याची वात!

वार्‍यावर येथिल रातराणि ही धुंद
टाकता उसासे चरणचाल हो मंद
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
त्या परसामधला एकच तो निशिगंध

हेलावे भवती सागर येथ अफाट
तीरावर श्रीमान इमारतींचा थाट
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
तो नदीकिनारा आणि भंगला घाट

बेहोष चढे जलशांना येथिल रंग
रुणझुणता नूपुर जीव बने नि:संग
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
तू आर्त मला जो ऐकवलास अभंग

लावण्यवतींचा लालस येथ निवास
मदिरेत माणकापरी तरारे फेस
परि स्मरती आणिक करती व्याकुळ केव्हा
ते उदास डोळे, त्यातिल करूण-विलास

-कुसुमाग्रज

Friday, February 24, 2006

आहा!

अलीकडे दिसामाजी ब्लॉग "चाळायचा" छंदच जडला आहे. "marathiblogs.net" वर नवीन नोंदी तर लगेच बघायला मिळतात, पण कितीतरी वाचायच्या राहिलेल्या जुन्या नोंदी देखील खुणावत असतात. आणि एकदम असं काही गवसतं की वाटतं "आहा, मला सुद्धा अगदी हेच म्हणायचं होतं..." बहुतेक वेळा लेखकानी/लेखिकेनी ते इतक्या नेमक्या शब्दात मांडलेलं असतं, की आपला आणि त्या कधी न भेटलेल्या लेखकाचा/लेखिकेचा धागा असा जुळलेला जाणवून मन आनंदभरारी मारतं.

खूप वेळा असंही होतं की आपल्याला खूप छान काही कल्पना सुचते, आणि विश्वासच बसत नाही की हे आपल्याच डोक्यातून बाहेर आलंय्... असं वाटतं की हे नक्की आपण कुठेतरी वाचलं असणार पूर्वी! कुठल्यातरी पुस्तकात, कवितेत नाहीतर कोणाच्यातरी ब्लॉगवर. स्मरणशक्‍तीला ताण देऊन सुद्धा आठवत नाही, खूप अस्वस्थ वाटतं. आणि अचानक ध्यानी मनी नसताना ते कुठूनतरी समोर येतं आणि "आहा"!! आणि गंमत म्हणजे, तेव्हा सुद्धा आपण ते पहिल्यांदाच वाचत असतो! असं झालंय तुम्हाला कधी?

मागे नाटयप्रशिक्षण शिबीरात माधव वझेंनी सांगितलेलं काही आठवलं. आपल्या सगळ्यांनाच काहीतरी सांगायचं असतं. आपल्या सगळ्यांच्याच आत एक तोटी बंद करून ठेवलेली असते. उघडा ना ती तोटी, आणि वाहू देत ना ते विचार बाहेर. कशाला घाबरता? कशाला थोपवून ठेवता? कशाला लपवून ठेवता? फार फार तर काय होईल? लोक हसतील? हसू देत ना! आपण काही मोठे कलावंत तर होऊ बघत नाही ना, मग हसले लोक तर कुठे बिघडलं?

आणि मग हे लक्षात आलं की मला जे काही म्हणायचं आहे, ते मुक्‍तपणे प्रकट करायचा आनंद फार मोठा तर आहेच, पण कदाचित कुठेतरी कोणीतरी हे वाचून "आहा" चा आनंद घेईल, या जाणीवेतून द्विगुणित होणारा आनंद अमूल्य आहे! नाही का?

Monday, February 20, 2006

तू भ्रमत आहासी वाया

काही दिवसांपूर्वी वपुंचे "तू भ्रमत आहासी वाया" वाचले. प्रांजळपणे सांगते, पहिल्या वाचनात सगळे झेपले नाही. "कळले" नाही असे म्हणत नाही, पण खूप "जड" वाटले. मग थोडया दिवसांनी पुन्हा वाचले. खूप आवडून गेले. आपल्या सगळ्यांना रोजच्या आयुष्यात कधी ना कधी आव्हान देणारे, कधी ना कधी हुलकावणी देणारे, कधी ना कधी वेडावून जाणारे तत्त्वज्ञान एका छोटया कथाधाग्याच्या आधाराने अगदी सहज उलगडत नेले आहे. पाना-पानावरची ओळ न् ओळ आपल्याला विचार करायला भाग पाडते. सगळंच काही आपल्याला पटतं असंही नाही, पण थबकून विचार करायला लावतं. आपले अनुभव त्याच्याशी पडताळून पहायला लावतं. प्रश्न विचारायला भाग पाडतं.

"शरण आल्यानं फरक पडत नाही. रियलायझेशन केवळ पाय पकडून होत नाही. क्षमा मागणारा माणूस जास्त धोकादायक. क्षमा मागणं, चूक कबुल करणं हा बहाणा असतो. पुन: पहिल्याच मार्गावर जाण्याचा परवाना असतो, कारण वाकावं लागलं ह्याचा खोलवर राग असतो. कुणाचा तरी अपमान केला, असभ्य उद्गार काढले, आपल्या प्रतिमेला तडा गेला, तो सांधण्यासाठी माणूस क्षमा मागतो. आपण मूळचे तसे नाही आहोत, हे ठसवण्याचा तो दुबळा प्रयत्न असतो. क्षमा मागण्यानं पुन: पहिल्यासारखंच वागण्याची मोकळीक मिळते. त्याऐवजी विचार करावा."

Tuesday, February 14, 2006

गात रहा

खूप पूर्वी कवी अनिलांच्या काही कविता हाती लागल्या होत्या. वेगळी शैली आणि आशयघन कविता. त्यातली ही एक खूप लक्षात राहिली, मधून मधून गुणगुणावी अशी! कोणाकडे अजून अनिलांच्या कवितांचा संग्रह असेल तर जरूर नोंद करा!

गात रहा गात रहा आनंद देत जात रहा
उदासीचे काळे ढग आले तरी हसत रहा
जगाच्या रंगभूमीवर प्रत्येकाचेच दशावतार
त्यातला पहिला अर्भकाचा
तोच तुझा कायम तुझा
डोळ्यांमधे कौतुकाचं काजळ घालून जग पहा

झुकझुक गाडी खेळत खेळत रमत गमत फिरत रहा
जमलं तर रडणार्‍याचे डोळे पूस त्याचा देखील हव्यास नको
परवचा पाठ करु नको
कोणाचिही कविता म्हण
आली नाही तर नवीन कर

- अनिल.

Friday, February 10, 2006

उमराव जान

नाही, हे "उमराव जान" या जुन्या हिंदी सिनेमाचं परीक्षण नाही. किंवा नव्याने येऊ घातलेल्या सिनेमावरचं गॉसिप पण नाही!

मी शाळेत असताना दूरदर्शन वर "उमराव जान" रात्री जागून बघितलेला आठवतोय. तेव्हा त्यातलं काय कळलं, काय भावलं ते नाही नीट आठवत. खूप गाजलेला सिनेमा म्हणून बघितला. अर्थात आशाच्या आवाजातली भावपूर्ण गाणी आणि रेखाचा संयत अभिनय हा त्या चित्रपटाच्या यशातील मोठा वाटा होता, पण तो या ब्लॉगचा विषय नाही!

परवा परत एकदा "उमराव जान" बघितला. आणि खूप आवडून गेला. फक्‍त संगीत, अभिनय, ते वातावरण यासाठीच नाही, तर त्या कथेनी जी हु्रहूर लावली त्यासाठी. मी काही फार शोकांतिकांची चाहती नाही. पण ही कथा चटका लावून गेली.

आणि मग विचार करता लक्षात आलं की उमराव जानचा प्रवास इतका चटका लावून जातो त्याचं कारण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तिला लागलेल्या ठेचा. एका पाठोपाठ एक. तिच्या हातून हुकत जाणार्‍या गोष्टी उदास करून जातातच, पण त्याउपर त्या गोष्टी पुन्हा तिच्या रस्त्यात येऊन तिला वेडावत राहतात, त्यानी आपण गलबलून जातो! याला तिचं दुर्दैव म्हणावं की क्रूर योगायोग?

या प्रश्नापाशी मी थबकले! माझा "नशीब" या कल्पनेवर विश्वास आहे. पण सगळ्यांचा असतो असं नाही. माझ्या काही मित्र-मैत्रीणींचं असं मत आहे नशीब, प्राक्‍तन, दैव असं काही नसतंच, असतात फक्‍त योगायोग. आणि ते योगायोग सुद्धा कधी सुखावह ठरतात तर कधी दुखरे, हाही योगायोगच! तसं पाहीलं तर नशीब आणि योग यातील सीमारेषा पुसटच आहे. पण नशीब म्हणलं की ते कुणाच्या तरी माथी लिहीलेलं, प्रत्येकाचं वेगळं असं. आणि योग हा कोणाचाही असू शकतो, probability च्या व्याख्येप्रमाणे फक्‍त एक "शक्यता".

"नशीब" काय किंवा "योगायोग" काय, उत्तर न सापडणार्‍या प्रश्नांची ही आपण तयार केलेली उत्तरं आहेत, हे मात्र खरं. उमराव जाननी याची फक्‍त आठवण करून दिली! आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातले काही टोकाचे योगायोगच तर आपलं आयुष्य कधीतरी नाट्यमय करून टाकतात. कल्पनेतल्या उमरावच्या नशीबी असे दुखरे योगायोग आले (?), त्याला काय म्हणावं?

Wednesday, February 08, 2006

वरदान

नव्या वाटा ही नोंद वाचली, आणि वहीमधे लिहून ठेवलेली ही शांता शेळकेंची पूर्ण कविता इथे नोंदल्यावाचून राहावत नाही!!

किती सुंदर असते हे विस्मृतीचे वरदान
भूतकाळ चालला आहे अटळपणे विरघळत
आणि जिवापलीकडे जपून ठेवलेल्या
टवटवीत क्षणांच्याही पाकळ्या राहतात गळत!

पायाखालच्या जुन्या दिशा जरी हरवल्या
तरी नव्या वाटा घेतात त्यांची जागा
आणि प्रत्येक नव्या वळणावर पुन्हा
असतातच डवरलेल्या अनोख्या फुलबागा!

दिले होते मी आश्वासन प्रिय अनुभवांना
की ढळू देणार नाही हॄदयातले त्यांचे स्थान
पण तेव्हा कुठे ठाऊक होते मला
की अंतस्थ देखील बघता बघता होते बेइमान?

रात्र आसवांत भिजते, गदगदते हुंदक्यांनी
तरीही एकवटून अवघा आवेग, जोर
भविष्याची दुर्दम्य आश्वासने पदरात घेऊन
रसरसलेली हसरी पहाट ठाकतेच समोर!

नव्या वळणावरुन पुढे डोकाऊन बघायला धैर्य लागतं! तसंच जुन्या प्रिय-अप्रिय आठवणी आपण विसरुन चाललोय हे स्वीकारायला सुद्धा.

जुन्याला "अलविदा" करायचं आणि नव्याचं स्वागत करायचं धैर्य कायम माझ्या ठायी असू दे!

Sunday, February 05, 2006

बोलगाणी

पाडगावकरांची "बोलगाणी" आपल्या सगळ्यांचीच खूप लाडकी. या नावातच इतका निरागस आनंद भरून आहे, तो प्रत्येक गाण्यातून आपल्या बरोबर गुणगुणत राहतो!

"बोलगाणी" म्हणता क्षणी "प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे, प्रेम असतं", किंवा "शीळ घालत माणसं" किंवा "सांगा कसं जगायचं" ही गाणी आपल्या पटकन ओठावर येतात. आणि त्या गाण्यांचं अगदी रंगून जाऊन वाचन करणारी पाडगावकरांची प्रसन्न हसरी मूर्ती डोळ्यांसमोर येते!

त्यातलीच काही "वेडी" "चिमणी" बोलगाणी ...

भास
खिडकीतून चांदणं आत येत नाही,
तो नुसताच भास असतो!
खरं तर चांदण्यासारखा भासणारा
तो तुझा भारावलेला श्वास असतो!

खरं गाणं
पाखरांना ठाउक असतं,
बाजारात गळा विकून
आपलं खरं गाणं कधी गाता येत नाही!
सोन्याच्या पिंजर्‍याला पंख विकून
आभाळाच्या जवळ जाता येत नाही.

गूढ
मला सांग,
फुलपाखरु तुझ्याकडेच कसं वळलं?
फांदी सगळी रिकामी असूनही
फुलं येणार हे तुला कसं कळलं?

श्रेय
कधी कधी सगळंच कसं चुकत जातं!
नको ते हातात येतं, हवं ते हुकत जातं!
अशा वेळी काय करावं?
सुकलेल्या झाडाला न बोलता पाणी द्यावं!

Friday, February 03, 2006

कधी एकदा

आज विदुला च्या ब्लॉग वर समस्यापूर्तीचं आवाहन बघितलं आणि पुन्हा एकदा शाळेच्या दिवसांची आठवण झाली!

आमच्या शाळेच्या वार्षिकासाठी दर वर्षी एक समस्यापूर्तीची स्पर्धा असायची. आगटे बाई स्वत: कविता करायच्या, आणि त्याच्या पहिल्या एक किंवा दोन ओळी फक्‍त द्यायच्या. त्या स्पर्धेतली उत्तम कविता आणि बाईंची मूळ कविता दोन्ही मग वार्षिकात प्रसिद्ध होत.

तशी माझी स्मरणशक्‍ती काही फार भक्कम नाही. पण कशा कोणास ठाउक, एका वर्षीच्या समस्यापूर्तीच्या 2 ओळी माझ्या लक्षात राहिल्या. त्या बाईंच्या मूळ कवितेच्या होत्या की बक्षिस मिळालेल्या कवितेच्या हे सुद्धा आता आठवत नाही. आणि बर्‍याच वर्षांनंतर मला पुढच्या काही ओळी सुचल्या.


अशीच येते कधी एकदा उत्साहाला भरती ताजी
आणि मनाच्या आकाशातुन मनोरथांची आतषबाजी

असाच येतो कधी एकदा आठवणींना पूर केव्हढा
आणि मनाच्या कुपीत राही दरवळणारा गंध-केवडा

अशाच येती कधी एकदा सैरभैरही विचारधारा
आणि मनाच्या चित्री उमटे आकांक्षांचा मोरपिसारा

अशीच होते कधी एकदा श्रद्धासुमनांची उधळण
आणि मनाच्या गाभार्‍यातुन भावभक्‍तीची ओंजळ अर्पण

असेही येती कधी एकदा रिते हुंदके उदासवाणे
तरीहि मनाला हसवत खेळत गात रहावे जीवनगाणे

Wednesday, February 01, 2006

जीवन

"जीवन" हा शब्द कोणी नेहेमीच्या संभाषणात वापरला, की मला शाळेच्या दिवसांची आठवण येते. शाळेत असताना आमची एक मैत्रीण खूप जड जड भाषेत निबंध लिहायची. अर्थात, अतिशय हुशार आणि हळवी असलेली ही सखी आम्हा सर्वांचा अभिमानाचा विषय होती. तेव्हा हे लिहीण्या आधी तिची माफी मागते :-)
तर ही सखी निबंधातच जड जड शब्द वापरायची असं नाही, तर बोलताना सुद्धा बरेच वेळा "जीवन", "ध्येय", "अभिमान" असे शब्द अगदी सहजपणे वापरायची. आणि खरे सांगायचे तर तिच्या व्यक्‍तिमत्त्वाला ते शोभूनही दिसायचे. पण आम्ही बाकीच्या सामान्य मुली तिची चेष्टा करायची संधी कशाला सोडू? आम्ही भूमितीच्या तासाला मुद्दाम "g1", असे जोरात म्हणून मग "g2, g3, g4...." असं म्हणून खिदळायचो!!

तेव्हा आता मला "जीवन" या विषयावर काही लिहायचा फार अधिकार नाही!! पण कुसुमाग्रजांची ही कविता नक्की नोंदू शकते!

अनंततेचे गहन सरोवर
त्यात कडेला विश्वकमल हे
फुले सनातन
त्या कमळाच्या
एका दलावर
पडले आहे
थोडे दहिवर
थरथरणार्‍या त्या थेंबाला
पृथ्वीवरचे आम्ही मानव
म्हणतो जीवन

Monday, January 30, 2006

श्री गणेशा

मराठी ब्लॉगविश्वात प्रवेश करताना सर्व प्रथम ही परंपरा सुरु करणार्‍या आणि पुढे नेणार्‍या कित्येक मित्र-मैत्रीणींना प्रणाम!

बाकीच्या अनेक ब्लॉग प्रमाणे मी सुद्धा "मी हे का लिहीतीये?" याचे उत्तर देऊन सुरुवात करते. आणि कोण्या एका ब्लॉग वर वाचलेल्या या चारोळीची नोंद करते (गोखले आणि मूळ ब्लॉगर दोघांची माफी मागून):

वाचणारं कोणी असेल तर ब्लॉग लिहीण्यात अर्थ आहे
लिहायला काही सुचणार नसेल तर ब्लॉगस्पेस सुद्धा व्यर्थ आहे!

माझ्या एका मित्राचे मत आहे की, पत्र हे एकाच वेळी स्वगत आणि संवाद दोन्ही असते. ब्लॉग बद्दलही असंच म्हणता येईल न? तर असं हे थोडंसं स्वगत, थोडासा संवाद, आपला आपल्याशी आणि तुम्हा सर्वांशी. कधी काही आवडलेल्या कविता, उतारे, कधी स्वैर विचार. आणि सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे, "का नाही लिहायचे"?

शाळेत असताना प्रत्येक नवीन वहीच्या पहिल्या पानावर आपण नाव, यत्ता, विषय वगैरे लिहायचो. त्याशिवाय कोणी "श्री गणेशाय नम:" लिहायचे, कोणी ॐ काढायचे. मला कधीतरी तुकोबांच्या ओळी भावून गेल्या, म्हणून लिहायला सुरुवात केली

हेचि दान देगा देवा
तुझा विसर न व्हावा

त्याच चालीवर आज पहिला वहिला ब्लॉग प्रसिद्ध करताना, पहिल्या पानावर लिहीते

हेचि दान देगा ब्लॉग देवा
दिसामाजी काही ब्लॉग सुचावा