Tuesday, August 22, 2006

दाटून आलेल्या संध्याकाळी

अश्विनीच्या नोंदीने सुधीर मोघेंच्या या कवितेची आठवण करून दिली. माझ्या हॉस्टेल वरच्या एका मैत्रिणीने फार कौतुकानी ही कविता माझ्या लाडक्या कवितांच्या वहीत लिहून दिली होती. ती माझ्या छोट्या का होईना, पण गुंतवून ठेवणार्‍या त्या ठेव्यावर फारच खूष झाली होती. आणि मीही मिळतील ते थेंब गोळा करणारी, मग तिचाही ठेवा पालथा घातला! हॉस्टेल सोडल्यापासून दुर्दैवानं तिच्याशी संपर्क तुटला ("यथा काष्ठं च काष्ठं च" अन् दुसरं काय?), पण आज या कवितेच्या निमित्ताने तिची आठवण ताजी झाली. त्याबद्दल अश्विनीला धन्यवाद!

दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित सोनेरी उन पडतं
तसंच काहीसं पाउल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येतं!

शोधून कधी सापडत नाही
मागून कधी मिळत नाही
वादळ वेडं घुसतं तेव्हा
टाळू म्हणुन टळत नाही!

आकाश, पाणी, तारे, वारे
सारे सारे ताजे होतात
वर्षांच्या विटलेल्या बधिर मनाला
आवेशांचे तुरे फुटतात!

संभ्रम, स्वप्न, तळमळ, सांत्वन
किती किती तर्‍हा असतात
सार्‍या सार्‍या सारख्याच जीवघेण्या
आणि खोल जिव्हारी ठसतात!

प्रेमाच्या सफल विफलतेला
खरं तर काहीच महत्त्व नसतं
इथल्या जय पराजयात
एकच गहिरं सार्थक असतं!

मात्र ते भोगण्यासाठी
एक उसळणारं मन लागतं
खुळ्या सोनेरी उन्हासारखं
आपल्या आयुष्यात प्रेम यावं लागतं!

-सुधीर मोघे

पाऊस कधीचा पडतो...

पावसाच्या दिवसांत आपल्या सर्वांच्याच मनात पावसाळी आठवणींचा पाऊस पडतो. आणि त्याचे प्रतिबिंब मराठी ब्लॉगविश्वात सुद्धा पावसाबद्दलच्या आठवणी, कविता, गझला यांच्या वर्षावाने उमटले. निसर्गाच्या अगदी "नेमेचि येणार्‍या" या साहजिक घटनेशी इतका हळवेपणा का बरं निगडित असावा?

अगदी लहानपणापासून मनावर उमटलेले शाळेचे नवीन वर्ष आणि त्यासोबत येणारे बरेच सारे नवेपण आठवते म्हणून? की पाण्यात खेळायचे बालसुलभ थरार कोणत्याही वयात पुन्हा लहान करून जाते म्हणून? की छत्री-रेनकोट सांभाळत अर्धं भिजून घरी आल्यावर गरम गरम चहा, भजी किंवा भाजलेल्या कणसाची तशी चव दुसर्‍या कुठल्याच दिवसात येत नाही म्हणून? की "रिमझिम पाऊस पडे सारखा" पासून "पाऊस कधीचा पडतो" पर्यंत आणि "ये रे ये रे पावसा" पासून "ती गेली तेव्हा रिमझिम" पर्यंत असंख्य गाणी मनात गर्दी करून नकळत असंख्य रंगांच्या भावनांत भिजवून टाकतात म्हणून?

की दुलई पांघरून खिडकीबाहेर तासंतास नुसता पाऊस बघत बसायची, समोरच्या घराच्या पन्हाळीतून पडणार्‍या धारेच्या नुसत्या आवाजावरून पावसाचा जोर किती आहे त्याचा अंदाज बांधायची, घरासमोर साठणार्‍या तळ्यात पाऊसच रेखत असलेल्या भिंगोर्‍या क्षणोक्षणी नवीन नक्षी करत आहेत असंच वाटून रमून जायची मजा आणखी कशात येऊच शकत नाही म्हणून? की आडोशाला पंखात चोची खुपसून उगीच रिकामटेकडे उद्योग करणार्‍या कबुतरांमधे आणि आपल्यामधे या क्षणी काहीच फरक नाही याची जाणीव फक्‍त तो पाऊसच देऊ शकतो म्हणून?

आणि अगदीच "क्लिशे" म्हणजे पहिल्या पावसानी भिजलेला मातीचा सुगंध वेडावणारा असतो म्हणून? पण खरं सांगते, घरच्यासारखा मातीचा सुगंध कुठेही येत नाही! परदेशात सुद्धा भिजलेल्या मातीचा सुगंध सुखावणारा अनुभव देऊन जातो खरा, पण तो वेडावणारा नसतो. शेवटी, घरची मातीच वेगळी असते हेच खरं, हे देखील सांगणारा तो पाऊसच!

पावसाचे दिवस सुरु झाल्यापासून, पावसावर इतक्या नोंदी वाचून खूप वेळा मोह होऊन सुद्धा मी ही नोंद उतरवायची अळंटळं करत होते. पण आज शेवटी राहवले नाही. आणि मी पण पावसाच्या नुसत्या उल्लेखानी येणार्‍या घरव्याकुळतेला शरण गेले!

हे पर्जन्यराया, तुझा महिमा अगाध आहे!