Friday, June 18, 2010

भय

भय. भयाबद्दल एक नक्कीच सांगीन. जीवनाचा तो एकमेव खरा शत्रू. फक्त भयच जीवनाला हरवू शकतं. भय चलाख असतं, क्रूर गनीम असतं... त्याला न सभ्यता, न नियमांचं बंधन, न कोणाची दया माया. त्याला तुमची कमकुवत बाजू बरोब्बर दिसते, आणि थेट तिथेच ते जाउन भिडतं! त्याची सुरुवातच मुळी तुमच्या मनात होते. एका क्षणी तुम्ही शांत, धीरगंभीर असता. स्वत:शी आनंदी, समाधानी असता. मग? मग एखाद्या निरुपद्रवी कुशंकेचा बुरखा पांघरून भय चलाखीनं तुमच्या मनात शिरतं. पाउल न वाजवता, एखाद्या गुप्तहेरा सारखं... तुम्ही अनभिद्न्य असता, नकळत स्वत:ला समजावता "ही बारीकशी कुशंका माझं काय करणार?" तुमचा अविश्वास कुशंकेला हुसकावून लावू बघतो. पण अविश्वास चिलखत नसलेल्या शिपायासारखा असतो. कुशंकेला त्यावर अचूक वार करून पुरता नाकाम करायला असा कितीसा वेळ लागणार? मग मात्र तुम्ही अस्वस्थ होता. विवेकाला पाचारण करता. अविश्वास हरला म्हणून काय झालं, विवेकबुद्धि तर सशत्र, सुसज्ज आहे न? तुम्हाला खात्री वाटते, बुद्धि नक्की मात करेल कुशंकेवर. पण अहो आश्चर्यम्, लहान सहान वार सहजी परतवून लावणारी विवेकबुद्धि सुद्धा थकतेच शेवटी, आणि हार मानते! आणि तिथेच पहिल्यांदा तुमच्या पायाखालची जमीन सरकते. तुम्ही धपापता...

भय मग आपला मोर्चा तुमच्या शरीराकडे वळवतं. त्या बापड्याला येणा-या संकटाची चाहूल लागलेली असतेच की! एव्हाना तुमच्या नकळत तुमच्या छातीचा भाता झालेला असतो आणि पोटात ढवळून निघत असतं. जिभेला कोरड पडलेली असते, दात वाजत असतात. थोडक्यात काय तुम्ही गलितगात्र होता! तुमच्या शरीराचा प्रत्येक अवयव रणांगण सोडून पळायला तयार असतो. पण तुमचे डोळे मात्र शाबूत असतात, त्यांचं भय नावाच्या शत्रूकडे बारीक लक्ष असतं.

मग तुम्ही अविचारानी निर्णय घेता. आणि तुमच्या साथीदारांना तुम्ही निरोप देता : आशा आणि विश्वास. त्याच क्षणी तुमच्याच हाती तुमचाच पराभव झालेला असतो! भय, ज्याची सुरुवात एका हलक्या कुशंकेनी होते, तुमच्यावर मात करतं...

हे सगळं शब्दात सांगणं किती जड आहे! कारण... भय, निखळ भय, मृत्यूला सामोरं जाताना वाटेल असं काळोखी भय, तुमचा पायाच हादरवून टाकणारं क्रूर भय, तुमच्या स्मृती, संवेदना काळवंडून टाकणारं भय... भय सगळं चैतन्यच शोषून टाकतं, तिथे बापड्या शब्दांची काय कथा!

म्हणूनच, सगळी शक्ती पणाला लावून भयाला वाचा फोडा. भयाला शब्दांवाटे मूर्त रूप द्या. शब्दांच्या तेजानी भयाला दिपवून टाका. नाहीतर एक नि:शब्द अंधार होऊन भय रेंगाळत राहील. त्या अंधाराला तुम्ही चुकवाल कदाचित, दुर्लक्ष कराल, तात्पुरते विसरूनही जाल! पण स्वत:ला अधिक कमकुवत कराल. तुमचा पराभव केलेल्या त्या प्रबळ प्रतिस्पर्ध्यापुढे दुबळे होऊन जाल, त्याच्या हल्ल्यांना सामोरं जाण्यासाठी अगदीच नि:शस्त्र व्हाल!

कारण एकदा तुमच्यावर मात केलेल्या त्या शत्रूला तुम्ही खरी टक्कर कधी दिलेलीच नसेल ...

From Life of Pi by Yann Martel

2 comments:

प्रशांत said...

पटलं.

बाय द वे, संपूर्ण लेखाचा अनुवाद आहे की त्यातल्या परिच्छेदाचा? पूर्ण अनुवाद वाचायला आवडेल.

Amogh said...

one of the most awesomest blogs i've come across