Friday, March 10, 2006

कळत जाते तसे...

कधी कधी कारण नसताना उदास, रिकामं वाटतं ना? बाहेर ढगाळ हवा असली, किंवा संध्याकाळी कातरवेळेला उगीचच घराची आठवण आली, किंवा दिवसभराच्या कामाचा शीण विसरायला म्हणून दोन क्षण डोळे मिटून बसलं आणि डोळे उघडल्यावर सुचत नाही काही ...

अशा वेळी मला हटकून बोरकरांची ही कविता आठवते! आपले अनुभव, त्यातून येणारं (कमीत कमी येणं अपेक्षित असलेलं) शहाणपण आणि ही उदास, रिकामी जाणीव याचा खरंच काही संबंध असतो का?

कळत जाते तसे कशी जवळचीही होतात दूर?
जुने शब्द सुने होउन वाजतात कसे बद्द निसूर?

कळत जाते तसे कसे ऊन पाण्यात खिरुन जाते
वाकुड सावल्यात वाट चुकून चांदणे कसे झुरून जाते?

कळत जाते तसे कशा मूर्ती सार्‍या झिजून जातात
पापण्यांमधले स्नेह थिजून ज्योती कशा विझून जातात?

कळत जाते तसे कशी झाडे पाखरे जीव लावतात
शब्द सारे मिटून कसे तळ्यामधेच पेंगू लागतात?

कळत जाते तसे कशा दूरच्या घंटा ऐकू येतात
दूरचे रंग दूरचे गंध प्राण कसा वेधून घेतात?

कळत जाते तसे का रे एकटा एकटा होतो जीव
राग रोष सरून कशी आपलीच आपणा येते कीव?

बा. भ. बोरकर

6 comments:

Y3 said...

वा: सुमेधा,
खरोखर आटवणी जाग्या होतात.. आणि जीव एकटा होतो...
खूपच छान कविताय..

यतीन

Gayatri said...

सुमेधा! तू पण बोरकर-भक्त आहेस का? इतकं छान वाटलं ही नोंद वाचल्यावर. तू ही कविता सुनीताबाईंच्या आवाजात ऐकली असणार आहेस नक्की, "एक आनंदयात्रा कवितेची" मध्ये, हो ना? किती जिवंत होते ती त्यांच्या आवाजात! विशेषत: 'एकटा एकटा होतो जीव..' वरचा त्यांचा तो हुंदका! कधीही ऐकली तरी मन कातर करायला लावणारी कविता आहे ही.

Shantanu said...

अप्रतिम!

बोरकरांच्या कविता internet वर कुठे मिळू शकतिल का?

Sumedha said...

यतीन, धन्यवाद.

गायत्री, तुझ्या प्रतिक्रियेला प्रतिसाद तुझ्याच ब्लॉगवर दिला आहे (फारच लांब व्हायला लागला)...

शंतनु, मला सुद्धा शोध घ्यायला पाहिजे, जर कुठे मिळाल्या तर तुम्हाला जरूर कळवीन. पण मराठी ब्लॉग वर कुठे कुठे असेच बोरकर भक्‍त नोंदत राहतील, तेव्हा बघत रहा :-)

Gayatri said...

सुमेधा, प्रतिक्रिया मनापासून पटली. 'भक्त' पेक्षा 'पंखा' म्हणवणं अधिक यथार्थ वाटतं. शुभेच्छांबद्दल खूप खूप आभार! मस्त झाल्या परीक्षा.

आणि बोरकरांच्या कविता "मायबोली" वरच्या या दुव्यावर मिळतील:

http://www.maayboli.com/hitguj/messages/103385/50191.html?1051015144

या 'hitaguj' वर अजून थोडी मुशाफिरी केली तर असंख्य नवलाईच्या गोष्टींचा खजिना सापडेल! :)

Rachana said...

Surekh kavita. far purvi vachali hoti hi kavita. thanks :)