Tuesday, February 14, 2006

गात रहा

खूप पूर्वी कवी अनिलांच्या काही कविता हाती लागल्या होत्या. वेगळी शैली आणि आशयघन कविता. त्यातली ही एक खूप लक्षात राहिली, मधून मधून गुणगुणावी अशी! कोणाकडे अजून अनिलांच्या कवितांचा संग्रह असेल तर जरूर नोंद करा!

गात रहा गात रहा आनंद देत जात रहा
उदासीचे काळे ढग आले तरी हसत रहा
जगाच्या रंगभूमीवर प्रत्येकाचेच दशावतार
त्यातला पहिला अर्भकाचा
तोच तुझा कायम तुझा
डोळ्यांमधे कौतुकाचं काजळ घालून जग पहा

झुकझुक गाडी खेळत खेळत रमत गमत फिरत रहा
जमलं तर रडणार्‍याचे डोळे पूस त्याचा देखील हव्यास नको
परवचा पाठ करु नको
कोणाचिही कविता म्हण
आली नाही तर नवीन कर

- अनिल.

1 comment:

Nandan said...

सुमेधा, काहीशी याच आशयाची अनिलांचीच एक प्रसिद्ध कविता म्हणजे 'अजून यौवनात मी'. ती मला आठवेल तशी येथे देत आहे (चू. भू. द्या. घ्या.)

अजून यौवनात मी, मुले फुले सभोवती
विकासती विलासती हसून हासवीत ती
प्रलोभनात प्रीतीच्या कुणी हसे झुरे जिथे
तिथे सखे नि सोबती कुणी इथे कुणी तिथे

प्रसन्न चित्त हासते बघुनिया मजेत त्यां
मुलांत मूल होत मी, फुलांत भृंग होत त्या
भरीत रंग बैठकीत, स्नेहसोबत्यांत मी
प्रियेस प्रेम होत मी, अजून यौवनात मी

त्यांची तळ्याकाठी ही कविताही मला आवडते. लवकरच माझ्या ब्लॉगवर ती नोंदवेन.