Friday, February 24, 2006

आहा!

अलीकडे दिसामाजी ब्लॉग "चाळायचा" छंदच जडला आहे. "marathiblogs.net" वर नवीन नोंदी तर लगेच बघायला मिळतात, पण कितीतरी वाचायच्या राहिलेल्या जुन्या नोंदी देखील खुणावत असतात. आणि एकदम असं काही गवसतं की वाटतं "आहा, मला सुद्धा अगदी हेच म्हणायचं होतं..." बहुतेक वेळा लेखकानी/लेखिकेनी ते इतक्या नेमक्या शब्दात मांडलेलं असतं, की आपला आणि त्या कधी न भेटलेल्या लेखकाचा/लेखिकेचा धागा असा जुळलेला जाणवून मन आनंदभरारी मारतं.

खूप वेळा असंही होतं की आपल्याला खूप छान काही कल्पना सुचते, आणि विश्वासच बसत नाही की हे आपल्याच डोक्यातून बाहेर आलंय्... असं वाटतं की हे नक्की आपण कुठेतरी वाचलं असणार पूर्वी! कुठल्यातरी पुस्तकात, कवितेत नाहीतर कोणाच्यातरी ब्लॉगवर. स्मरणशक्‍तीला ताण देऊन सुद्धा आठवत नाही, खूप अस्वस्थ वाटतं. आणि अचानक ध्यानी मनी नसताना ते कुठूनतरी समोर येतं आणि "आहा"!! आणि गंमत म्हणजे, तेव्हा सुद्धा आपण ते पहिल्यांदाच वाचत असतो! असं झालंय तुम्हाला कधी?

मागे नाटयप्रशिक्षण शिबीरात माधव वझेंनी सांगितलेलं काही आठवलं. आपल्या सगळ्यांनाच काहीतरी सांगायचं असतं. आपल्या सगळ्यांच्याच आत एक तोटी बंद करून ठेवलेली असते. उघडा ना ती तोटी, आणि वाहू देत ना ते विचार बाहेर. कशाला घाबरता? कशाला थोपवून ठेवता? कशाला लपवून ठेवता? फार फार तर काय होईल? लोक हसतील? हसू देत ना! आपण काही मोठे कलावंत तर होऊ बघत नाही ना, मग हसले लोक तर कुठे बिघडलं?

आणि मग हे लक्षात आलं की मला जे काही म्हणायचं आहे, ते मुक्‍तपणे प्रकट करायचा आनंद फार मोठा तर आहेच, पण कदाचित कुठेतरी कोणीतरी हे वाचून "आहा" चा आनंद घेईल, या जाणीवेतून द्विगुणित होणारा आनंद अमूल्य आहे! नाही का?

5 comments:

Tulip said...

खर आहे सुमेधा. खुप छान मराठी लिहिलय सगळ्यांनी वेगवेगळ्या ब्लॉग्ज वर. आज मी पण वेळ काढून खुप नोंदी वाचल्या. तु पण खुप छान कविता नोंदल्या आहेस. उमराव जान ची पोस्ट पण आवडली

P said...

खरं आहे अगदी.:)

Gayatri said...

अगदी माझ्या मनातलं बोललीस सुमेधा. The 'deja vu' feeling, and the sudden joy of finding someone else's wording out of our own emotions is certainly an 'aha!' moment, and letting other people have it would indeed double the joys of writing on an open platform like a weblog.

'आपुला संवाद आपणासी..' झकास आहे. तुझ्या जालनिशीला link केलं तर चालेल?

आणि हो, तुझ्या अभिप्रायाबद्दल मनापासून आभार.

Sumedha said...

टयुलिप, रजनीगंधा, गायत्री, अभिप्रायाबद्दल धन्यवाद!

Kaustubh said...

आपण दोघांनी नुकताच मोठ्ठा "आहा" अनुभवलाय !!
:)