Friday, February 10, 2006

उमराव जान

नाही, हे "उमराव जान" या जुन्या हिंदी सिनेमाचं परीक्षण नाही. किंवा नव्याने येऊ घातलेल्या सिनेमावरचं गॉसिप पण नाही!

मी शाळेत असताना दूरदर्शन वर "उमराव जान" रात्री जागून बघितलेला आठवतोय. तेव्हा त्यातलं काय कळलं, काय भावलं ते नाही नीट आठवत. खूप गाजलेला सिनेमा म्हणून बघितला. अर्थात आशाच्या आवाजातली भावपूर्ण गाणी आणि रेखाचा संयत अभिनय हा त्या चित्रपटाच्या यशातील मोठा वाटा होता, पण तो या ब्लॉगचा विषय नाही!

परवा परत एकदा "उमराव जान" बघितला. आणि खूप आवडून गेला. फक्‍त संगीत, अभिनय, ते वातावरण यासाठीच नाही, तर त्या कथेनी जी हु्रहूर लावली त्यासाठी. मी काही फार शोकांतिकांची चाहती नाही. पण ही कथा चटका लावून गेली.

आणि मग विचार करता लक्षात आलं की उमराव जानचा प्रवास इतका चटका लावून जातो त्याचं कारण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तिला लागलेल्या ठेचा. एका पाठोपाठ एक. तिच्या हातून हुकत जाणार्‍या गोष्टी उदास करून जातातच, पण त्याउपर त्या गोष्टी पुन्हा तिच्या रस्त्यात येऊन तिला वेडावत राहतात, त्यानी आपण गलबलून जातो! याला तिचं दुर्दैव म्हणावं की क्रूर योगायोग?

या प्रश्नापाशी मी थबकले! माझा "नशीब" या कल्पनेवर विश्वास आहे. पण सगळ्यांचा असतो असं नाही. माझ्या काही मित्र-मैत्रीणींचं असं मत आहे नशीब, प्राक्‍तन, दैव असं काही नसतंच, असतात फक्‍त योगायोग. आणि ते योगायोग सुद्धा कधी सुखावह ठरतात तर कधी दुखरे, हाही योगायोगच! तसं पाहीलं तर नशीब आणि योग यातील सीमारेषा पुसटच आहे. पण नशीब म्हणलं की ते कुणाच्या तरी माथी लिहीलेलं, प्रत्येकाचं वेगळं असं. आणि योग हा कोणाचाही असू शकतो, probability च्या व्याख्येप्रमाणे फक्‍त एक "शक्यता".

"नशीब" काय किंवा "योगायोग" काय, उत्तर न सापडणार्‍या प्रश्नांची ही आपण तयार केलेली उत्तरं आहेत, हे मात्र खरं. उमराव जाननी याची फक्‍त आठवण करून दिली! आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातले काही टोकाचे योगायोगच तर आपलं आयुष्य कधीतरी नाट्यमय करून टाकतात. कल्पनेतल्या उमरावच्या नशीबी असे दुखरे योगायोग आले (?), त्याला काय म्हणावं?

4 comments:

Kaustubh said...

"उमराव जान" च्या गाण्यांनी खूप आधीच वेड लावलं होतं,सिनेमाबद्दल ऐकलं होतं आणि रेखाच्या अभिनयाबद्दल वाचलं होतं.. पण उमराव जान पहायचा योग आला नव्हता.
तुझी ही पोस्ट वाचून मी सिनेमा पाहायचंच ठरवलं..आत्ताच पाहून झाला आणि लगेचच Comment टाकतोय. सिनेमा आवडला. अगदी फिदा वगैरे नाही झालो पण आवडला.
असो. तू म्हणतेस ते खरं आहे.
"नशीब काय किंवा योगायोग काय, उत्तर न सापडणार्‍या प्रश्नांची ही आपण तयार केलेली उत्तरं आहेत"
उत्तर एकच. या गोष्टींवर विचार न करणं. बरेचसे प्रश्न इथेच सुटतात माझ्या मते.

Sumedha said...

विचार न करणं इतकं सोपं असतं तर कशाला? नुसता विचारच करत नाही, तर आपण घडून गेलेल्या गोष्टींची कारणं पण लावत असतो. बर्‍याच वेळा, कुठल्याही data ला fit होणारं एक तरी model मिळतंच ना, तसं. आणि ही models अर्थातच, आपल्याला हवी तशी उत्तरं देतात! तोपर्यंत विचार चालूच राहतो!

Kaustubh said...

तसं म्हणायचं नव्हतं मला.
विचार मनात येतच असतात. कारणंही शोधावीत माणसानं. पण घडून गेलेल्या प्रत्येक गोष्टींचा नशिबाशी संबध जोडण्याला माझी हरकत आहे. नशीब वगैरे काहीतरी असेलही कदाचित. (तसं असण्याची शक्यताही आहे.)
पण म्हणून सगळ्या गोष्टीत नशिबाला दोष देणं पटत नाही मला.(असा विचार करणं चुकीचं आहे असं म्हणायचंय मला)असं झालं की जगायची उर्मीच संपून जाते.
वाईट घडलं की नशीब आणि चांगलं घडलं की ते कर्तृत्व हे मला पटत नाही.

SAKHI said...

hi sumedha,

mi pan umrao jaan tumchya sarkhach jagun pahila hota, khup aavdla hota to picture, tumchya bhashet sangayach tar " chadhala hota"
aasha bhosle chi gani... jabardstach... tyala tod nahi...

umrao jan chya nashibach khup vait vatat rahat puna picture bhar

chalo bye
neeta