आज विदुला च्या ब्लॉग वर समस्यापूर्तीचं आवाहन बघितलं आणि पुन्हा एकदा शाळेच्या दिवसांची आठवण झाली!
आमच्या शाळेच्या वार्षिकासाठी दर वर्षी एक समस्यापूर्तीची स्पर्धा असायची. आगटे बाई स्वत: कविता करायच्या, आणि त्याच्या पहिल्या एक किंवा दोन ओळी फक्त द्यायच्या. त्या स्पर्धेतली उत्तम कविता आणि बाईंची मूळ कविता दोन्ही मग वार्षिकात प्रसिद्ध होत.
तशी माझी स्मरणशक्ती काही फार भक्कम नाही. पण कशा कोणास ठाउक, एका वर्षीच्या समस्यापूर्तीच्या 2 ओळी माझ्या लक्षात राहिल्या. त्या बाईंच्या मूळ कवितेच्या होत्या की बक्षिस मिळालेल्या कवितेच्या हे सुद्धा आता आठवत नाही. आणि बर्याच वर्षांनंतर मला पुढच्या काही ओळी सुचल्या.
अशीच येते कधी एकदा उत्साहाला भरती ताजी
आणि मनाच्या आकाशातुन मनोरथांची आतषबाजी
असाच येतो कधी एकदा आठवणींना पूर केव्हढा
आणि मनाच्या कुपीत राही दरवळणारा गंध-केवडा
अशाच येती कधी एकदा सैरभैरही विचारधारा
आणि मनाच्या चित्री उमटे आकांक्षांचा मोरपिसारा
अशीच होते कधी एकदा श्रद्धासुमनांची उधळण
आणि मनाच्या गाभार्यातुन भावभक्तीची ओंजळ अर्पण
असेही येती कधी एकदा रिते हुंदके उदासवाणे
तरीहि मनाला हसवत खेळत गात रहावे जीवनगाणे
Friday, February 03, 2006
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
सुमेधा,
कविता खूप आवडली.
"आता एकदा" माझ्या चारोळ्यांचा हा खटारा :-
अशीच वाटे कधी एकदा गतकाळाची भिती भयंकर
कसे वाचलो कसे निसटलो आठवुन कापे त्वचा थरथर
अशीच कधितरी चढते माथी स्तुती-यशाची धुंदी नकळत
अपयश निंदा पदरी येता मग सरून जाते पायी ताकद
असीच दाटे मनी कधीतरी दु:स्वासाचे काळे सावट
उपर सुखाच्या द्वेषाने मग चित्तावरती विक्रुत जळमट
असाच उसळे सळसळून कधी क्रूर कालीया संतापाचा
अन्यायाचे पर्वत दिसता फुत्कारही पण असहायतेचा !
असेच वाटे कधी एकदा जलद ढगापरि गडगंज हसावे
दु:ख यातना भय चिंतेने ऐकताच झट दूर पळावे
अशीच कधितरि ओढ लागते परमेशाच्या जवळिकतेची
पण जाणिव होते कष्टप्रद ती मजला माझ्या खुजेपणाची...
Samasyapurti ha vyakaran prakar mala naveenach ahes...pan tu julawalelya oli kewal aprateem! :)
Post a Comment