Wednesday, February 01, 2006

जीवन

"जीवन" हा शब्द कोणी नेहेमीच्या संभाषणात वापरला, की मला शाळेच्या दिवसांची आठवण येते. शाळेत असताना आमची एक मैत्रीण खूप जड जड भाषेत निबंध लिहायची. अर्थात, अतिशय हुशार आणि हळवी असलेली ही सखी आम्हा सर्वांचा अभिमानाचा विषय होती. तेव्हा हे लिहीण्या आधी तिची माफी मागते :-)
तर ही सखी निबंधातच जड जड शब्द वापरायची असं नाही, तर बोलताना सुद्धा बरेच वेळा "जीवन", "ध्येय", "अभिमान" असे शब्द अगदी सहजपणे वापरायची. आणि खरे सांगायचे तर तिच्या व्यक्‍तिमत्त्वाला ते शोभूनही दिसायचे. पण आम्ही बाकीच्या सामान्य मुली तिची चेष्टा करायची संधी कशाला सोडू? आम्ही भूमितीच्या तासाला मुद्दाम "g1", असे जोरात म्हणून मग "g2, g3, g4...." असं म्हणून खिदळायचो!!

तेव्हा आता मला "जीवन" या विषयावर काही लिहायचा फार अधिकार नाही!! पण कुसुमाग्रजांची ही कविता नक्की नोंदू शकते!

अनंततेचे गहन सरोवर
त्यात कडेला विश्वकमल हे
फुले सनातन
त्या कमळाच्या
एका दलावर
पडले आहे
थोडे दहिवर
थरथरणार्‍या त्या थेंबाला
पृथ्वीवरचे आम्ही मानव
म्हणतो जीवन

8 comments:

Nandan said...

surekh kavita. Marathi anudini-vishwat (blogspace) swaagat.

paamar said...

जीवन हा शब्द म्हणला की मराठी वाचकांच्या डोळ्यांसमोर प्रथम 'सखाराम गटणे' उभा राहत असणार :) लेख वाचून छान वाटले. विशेष करून इ. दहावीच्या दिवसांची आठवण झाली. तेव्हा ब-याच विद्यार्थ्यांना 'जड' लिहिण्याची हौस असे. (मला सुद्धा :). आणि थोरामोठ्यांनी उधळलेली शब्द-मौक्तिके गोळा करून निबंधांत अवतरणे म्हणून वापरायची पण आवड असे. लेखनासाठी शुभेच्छा !!

दिलीप कुलकर्णी said...

सुमेधा.
आपण नोंद केलेली कविता छान आहे.
ह्यातुन तुमची `जीवनाकडे' पहाण्याची ` सापेक्षता'
`प्रतिबिंबीत' होते. ह्या कवितेतून `जीवन' याची `परिभाषा'
आणी तिचे केलेले `रेखाटन' `अप्रतिम' आणी `यथार्थ' आहे.
( हुश्श: सुटलो बाबा एकदाचा ! )
सोप्या भाषेत सांगतो, छान आहे कविता.
- दिलीप कुलकर्णी दुबई.

shashank said...

जड भाषेवरील निरीक्षणाशी सहमत. कविताही आवडली.

ता. क. "जऽऽऽड" भाषेतील एक लेख लवकरच समग्र-मी वर येतोय :)

Sumedha said...

धन्यवाद.

मला अनुदिनी सुरु करताना आपल्या सर्वांकडून प्रेरणा मिळाली आहे, त्याबद्दल दुहेरी धन्यवाद!

Anonymous said...

Sumedha,
Blog aani kavitaa donhihee chhan aahet. :-)

Kusumagrajanchi kavitaa kuthalyaa kavyasangrahamadhali aahe te sangata yaeil ka?

Thanks.

Nilesh

Sumedha said...

नीलेश, धन्यवाद.

ही कविता कुठल्या संग्रहात प्रसिद्ध झाली आहे माहीत नाही. माझ्या आठवणी प्रमाणे काही वर्षांपूर्वी दैनिक सकाळच्या कुठल्यातरी पुरवणीत प्रसिद्ध झालेली मी लिहून घेतली होती!

Amey said...

सुरुवात वाचून मला "सखाराम गटणे"ची आठवण झाली. "जीवनध्येय" आणि "पर्व" :)