Monday, December 17, 2007

नाताळ आणि दिवाळी

दुकाना दुकानातून भरगच्च सजावटी आणि ताजा माल. सगळीकडे "साले का मेला" लागलेला. सणासाठी खरेदीची गडबड, गर्दी आणि उत्साह. आपापल्या पर्सा, पिशव्या आणि पोरं सांभाळत "हे घेऊ की ते" या विवंचनेत हिंडणार्‍या ताया, मावश्या, आज्या ... :) पुण्याचा लक्ष्मी रस्ता असूदे, लंडन मधला ऑक्सफर्ड स्ट्रीट नाहीतर सान फ़्रान्सिस्को मधला युनियन स्क्वेअर! सणासुदीला जवळपास असंच चित्र दिसतं! सण कुठला का असेना जगभरात सगळीकडे तोच उत्साह आणतो. घरोघरी तयार होणारे (किंवा तयार आणले जाणारे) खमंग गोड पदार्थ तोच मूड सेट करतात.

भारतात दसरा दिवाळीचा उत्साह ओसरला की इथे नाताळची हवा सुरु झाली. या दिवसात कधीही रस्त्यावर बघितलं तर दर पाच दहा मिनीटाला एखादी तरी गाडी टपावर ख्रिसमसचं झाड आणि पोटात उत्साही पोरं घेऊन जाताना दिसतीये. आपल्या घरातल्या साजर्‍या होणार्‍या सणात निसर्गाला सामावून घ्यायची काय ही हौस! ते बघताना मला थेट दसर्‍याची झेंडूची फुलं, पाडव्याच्या आंब्याच्या डहाळ्या आणि कडूलिंबाचा कोवळा पाला आठवला... म्हणजे आपल्या आणि पाश्चात्य जगात सणोत्सवांमधे खरेदी, गोडधोड पदार्थ आणि सुट्टी यापलिकडे असलेलं हे साम्य आत्तापर्यंत माझ्या तरी लक्षात आलं नव्हतं.

की घराच्या, "आपल्या" संस्कृतीच्या आठवणीनी जीव व्याकुळ होत असताना आपल्याच मनानी हे साम्य शोधून नकळत घातलेली ही समजूत होती कळेना. हे म्हणजे शेजारच्या गोड म्हातारीला "एलायझा आजी" (ट्युलिप, वाचतीये बरं तुझ्या नवीन नोंदी), सहकर्‍याला "जानराव" आणि Fair Oaks Apartment ला "ओकवाडी" म्हणण्यासारखं! आपल्या भोवतालच्या परकेपणात आपलेपण शोधणं काही फार अवघड नाही!

या वर्षी एक miniature का होईना, Christmas Tree आणावं म्हणते!

Sunday, December 02, 2007

बालपणीचा ...

लहानपणीच्या आठवणींचा खजिना आपल्या सगळ्यांकडेच असतो. तो उघडून उधळायला कुठलेही निमित्त चालते, किंवा कधी कधी निमित्तही नाही लागत..

माझ्या बालपणीच्या खजिन्यातली ही चीज परवा बाहेर यायला निमित्त होता माझा गोड भाचा!

कोणाला या कवितेचे कवी माहीत आहेत का?


"शाळेत नाही जायचं येतं मला रडू
आई मला शाळेत नको न धाडू"
कोण बरं बोललं रडत हळू हळू?
दुसरं कोण असणार हा आमचा बाळू!

आई मग म्हणाली "शहाणा माझा राजा,
शाळेत गेलास तर देईन तुला मजा!
शाळेत नाही गेलास तर हुषार कसा होशील?
बाबांच्यासारखा कसा इंग्लडला जाशील?

आपला रामा गडी शाळेत नाही गेला,
म्हणूनच भांडी घासावी लागतात न त्याला?
तू कोण होणार डॉक्टर की गडी?
बाबांच्या सारखी ऐटबाज नको का तुला गाडी?"

रडत रडत म्हणाला बाळू आमचा खुळा
"होईन मी गडी, नको मला शाळा!"

Tuesday, November 20, 2007

जे जे उत्तम ...

नंदननी सुरु केलेला हा "खो-खो" माझ्या पर्यंत पोचून बरेच दिवस झाले (धन्यवाद मिनोती!). दरम्यान काही मित्र-मैत्रिणींनी बरेच काही उत्तमोत्तम प्रसिद्ध सुद्धा केलंय. जरा उशीरच झाला, पण "better late than never" या उक्‍तीप्रमाणे माझा आवडता उतारा.


खोलीत येऊन ज्योडीनं दार लावून घेतलं. फाटका शर्ट आणि पाटलोण काढून टाकून तो उबदार पांघरुणात शिरला. अंथरुण मऊ गुबगुबीत होतं. त्यानं आरामात पाय लांब केले. सकाळी लवकर उठलं पाहिजे. दूध काढायचं आहे, लाकडं आणायची आहेत, शेतात काम करायचं आहे. शेतातली कामं उरकताना आजूबाजूला खेळायला-बागडायला आता फ्लॅग नाही. कामातला कठीण वाटा शिरावर घ्यायला आता बाप नाही. पण त्याची काय पर्वा? आपण एकट्यानं सांभाळू सारं.

ज्योडी कसली तरी चाहूल घेत होता. त्याला फ्लॅगची चाहूल हवी होती. घराभोवती धावताना... खोलीच्या कोपर्‍यातल्या शेवाळाच्या अंथरुणावर चाळवताना... पण आता ती कधीच ऐकू येणार नव्हती. फ्लॅगच्या देहावर आईनं माती लोटली असेल का? की गिधाडांनी त्याचा चट्टा मट्टा केला असेल? फ्लॅगवर आपण जेव्हढं प्रेम केलं तेवढं जगातल्या कुठल्याच पुरुषावर, बाईवर - इतकंच काय पोटच्या पोरावर सुद्धा आपण करू शकणार नाही. आयुष्यभर आपण आता एकटे. पण नशिबी असेल ते भोगावं आणि पुढची वाट धरावी.

झोपता झोपता तो ओरडला, "फ्लॅग!"

पण हा आवाज त्याचा नव्हता. तो एका कोवळ्या पोराचा आवाज होता. बावखोलापलिकडे, मॅग्नोलियाच्या झाडाच्या पुढं, ओकच्या झाडांखालून एक पोरगा आणि एक हरणाचा पाडा जोडीनं धावत गेले आणि कायमचे अंतर्धान पावले.


- पाडस - राम पटवर्धन

Friday, August 24, 2007

खोड

सकाळच्या उन्हात कॉफी घेत घराच्या पायरीवर उभी होते. रविवारची आळसावलेली सकाळ. हे घर असं टेकाडावर. आजूबाजूला बैठी टुमदार म्हणावी अशी घरं. मागे वर थोडीशी चढत जाणारी टेकडी, आणि घनदाट होत जाणारी झाडी. समोर तीच उतरत जाणारी टेकडी, थोडी घरं आणि मग समोरच्या परिसराला कापत जाणारा रेल्वेमार्ग, पलिकडे आडवा पसरलेला महारस्ता. त्याही पलिकडे औद्योगिक इमारतींचा पट्टा. मधेच एक-दोन अलिशान हॉटेलं. या परिसरात कामाला येणार्‍यांची नेहेमीची विश्रांतीस्थानं. त्याहीपलिकडे खाडी. आणि खाडीच्या पलिकडे? आहेत की क्षितिजावर निळे डोंगर! छानपैकी अस्ताव्यस्त पसरलेले. बापरे घराच्या पायरीवरून इतकं सगळं दिसतं हे लक्षातच आलं नव्हतं कधी! इथे घटकाभर बसून हे सगळं साठवून ठेवायलाच पहिजे डोळ्यांत!

महारस्त्यावरून जाणार्‍या वाहनांचा आवाज एकदम जाणवला. म्हणजे इतका वेळ वर्दळ नव्हती असं नाही. पण अचानक कोणीतरी कळ फिरवावी तसा तो आवाज आपल्या अस्तित्त्वाची जाणीव करून द्यायला लागला. आणि मग अचानक सगळेच आत्तापर्यंत फक्‍त दिसणारे आवाज ऐकू सुद्धा यायला लागले. वार्‍यानी हलणारी पानं सळसळ आवाज करतायत होय. आणि पलिकडच्या मैदानावर खेळणारी चालत्या बोलत्या बाहुल्यांसारखी दिसणारी मुलं आरडाओरडा सुद्धा करतायत. गंमत म्हणजे आत्तापर्यंत फक्‍त ऐकू येणार्‍या गोष्टी दिसायलासुद्धा लागल्या. इतका वेळ नुसतीच चिवचिव करणारी पाखरं चक्क पानांआडून डोकवायला लागली. शेजार्‍यांच्या हिरवळीवर लावलाय पाण्याचा फवारा, तो एकदमच उन्हात चमकायला लागला.

मला गंमत कळेना. या अचानक माझ्या दुक-श्राव्य संवेदना अशा तीक्ष्ण कशा झाल्या? पलिकडच्या गल्लीत एक गाडी येऊन थांबली. गराजचे दार उघडून आत गेली. गराज बंद झालं. वार्‍याच्या झुळुकेनी रस्त्याच्या या कडेचा पाचोळा फरफटत त्या कडेला गेला. आणखी एक गाडी टेकडीवरून येतीये, मी बरोब्बर वळून बघितलं त्या क्षणी समोरून वळसा घेऊन खालच्या रस्त्याला लागली ती. मागच्या बाजूला रहाणारे आजोबा नेहेमीप्रमाणे अडगळीतच्या जुन्या पान्या वस्तू काढून काहीतरी खाटखुट करत बसलेत. आणि इतका वेळ नुसताच चिवचिवाट ऐकू येत होता, ते एकूण चार, नाही पाच असावेत बहुतेक, वेगवेगळे पक्षी आपापल्या ताला-सुरात गातायत हेही लक्षात आलं. समोरच्या निळ्या फुलांच्या वाफ्यात मधेच नाजूक गुलाबी फुलं पण आहेत. आणि पलिकडच्या अंगणात दगडगोट्यांनी सजवलेलं ते कारंजं म्हणजे दोन सुबक मासोळ्या आहेत.

हे सगळं आधीपासून होतं, चालूच होतं की. पण दिसलं नाही, आणि ऐकू सुद्धा आलं नाही. आपल्याला हव्या त्या गोष्टी ऐकायची आणि बघायची, नाही चुकलं.... आपल्याला नको त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायची भारी खोड आहे हे खाडकन जाणवलं. आणि ठरवलं रोज घरातून बाहेर पडताना पायरीवर दोन क्षण थांबायचं, डोळे मिटून ऐकायचं, कान बंद करून बघायचं. खूप काय काय दिसतं आणि ऐकू येतं, तेही रोज नवीन नवीन! करून बघा, मजा आहे!

Friday, August 17, 2007

वास नाही ज्या फुलांना

"ब्लॉगली नाहीस बर्‍याच दिवसात?", माझे ब्लॉग अत्यंत सहनशीलतेने झेलणार्‍या प्रिय मैत्रिणीकडून विचारणा झाली. ब्लॉगायला काही कारण लागत नाही, पण ब्लॉग न लिहायला बरीच आहेत की! "खूप दिवसात काही लिहीले नाही, लिहायला तर बसले आहे, पण काय लिहावे सुचत नाही" अशा अर्थाची एक नोंद टाकावी हा मोह आवरता घेते. "चांदणवेल" समोर पडलं आहे, त्यातलं कुठलंतरी पान उघडते..

वास नाही ज्या फुलांना फक्‍त ती पाहून घे,
धुंद आहे गंघ ज्यांना तो तिथे जाऊन घे.

चांदणे लाटात जेथे साजल्या वाळूमधे,
रात्र संपेतो इमाने गीत तू गाऊन घे.

प्रीत जेव्हा जागणारी सर्वभावे वाहते
बाहुंचा वेढा तिचा तू साहसे साहून घे.

वाढत्या ग्रीष्मात जेव्हा मेघ माथी कोसळे
सारुनी संकोच सारा त्यांत तू न्हाऊन घे

नेम ना लागेल केव्हा तुष्टतेची वाळवी :
वाळण्या ती या जगाचें दु:ख तू लावून घे.

वाटतां सारेंच खोटें, प्रेमनिष्ठा आटतां,
एकटा अंतर्गृहींच्या ज्योतिने दाहून घे.

-बा. भ. बोरकर

Wednesday, July 25, 2007

Dementor and Patronus

आभाळ गच्च भरून आलेलं असतं. अगदी उदास वाटतं. मग वाफाळलेला कॉफीचा कप घ्यावा आणि लताचं "ओ सजना" लावावं. बस! उदास वातावरण एकदम जादुइ होऊन जातं! धो धो पाउस येऊन कधी आकाश मोकळं करून जातो समजतही नाही!

कामाला काही म्हणता सुर सापडत नसतो. नको असलेल्या गोष्टी पुढयात येत असतात आणि सोप्या सोप्या ठिकाणी पण घोडं अडतं. मग याहू वर "काय म्हणताय, काय चाललंय्?" असा संदेश पाठवावा! फुटकळ चकाट्या पिटायला वेळ नाही हे विसरून मस्त गप्पा टप्पा व्हाव्यात. पुढचा दिवस कसा सुरळीत जातो.

आपल्या मागे लागलेल्या लहान-मोठ्या demontors ना पळवून लावायला आपल्याच पोतडीत असतात की लहान मोठे patronus. एक इशारा पुरे असतो, जादूची कांडी सुद्धा नाही लागत.

एक मिनिट, हॅरी पॉटर न वाचणार्‍या पामरांनो (sigh, you don't know what you are missing!), तुम्हाला काय सांगणार कप्पाळ की dementor म्हणजे काय आणि patronus कोण! पण तुम्ही हे गाणं तर नक्कीच ऐकलं असेल न?

When the dog bites, when the bee stings, when I am feeling sad!
I simply remember my favourite things,
And then I don't feel so bad!

हे सुद्धा गाणं माहीत नाही तुम्हाला? आता मात्र हद्द झाली! मग पाडगावकर काय म्हणतात बघा

कधी कधी सगळंच कसं चुकत जातं!
नको ते हातात येतं, हवं ते हुकत जातं!
अशा वेळी काय करावं?
सुकलेल्या झाडाला न बोलता पाणी द्यावं!

यालाच आपली J. K. म्हणते dementor ला पळवून लावायला patronus बोलवायचा! पुढच्या वेळी तुमच्या मागे लागलाच कोणी dementor, तर सहजी बोलवून आणा तुमच्या patronus ला! आता कळलं?

Friday, June 15, 2007

आतलं वर्तुळ

कॉलेजमधे असताना मैत्रिणींचे वाढदिवस जोरात साजरे व्हायचे. संध्याकाळी वाढदिवसाळू मैत्रिणीकडे धाड असायची. किलोनी पावभाजी (किंवा इडली-सांबार किंवा भेळ इ. इ.) आणि लिटरनी मिल्क-शेक (किंवा आइसक्रीम किंवा पियुश इ. इ.) तयार करणे हा आईचा न सांगता आखलेला आणि अर्थातच पार नेलेला पाककार्यक्रम असे! या धाडीमधे शाळेतल्या, कॉलेजमधल्या, गल्लीतल्या, क्लासमधल्या ज्या ज्या मैत्रिणींना वाढदिवस लक्षात असेल त्या सर्व सामील असायच्या. भेट म्हणून फक्‍त एक ग्रीटिंग कार्ड आणावे हा अलिखित नियम. एका वर्षी तर मला आठवतेय इतक्या मैत्रिणी एकदम आल्या की घरात जागाच नव्हती बसायला! हळूहळू सगळ्या पांगल्या, फक्‍त "घट्ट", सख्ख्या मैत्रिणी रेंगाळल्या. इतका वेळ आतल्या खोलीत तोच पेपर पुन्हा पुन्हा चाळत बसलेले पपा बाहेर डोकाऊन म्हणाले "अरे वा, आता फक्‍त 'inner circle' उरलंय वाटतं"...

तर मैत्रिची अशी वर्तुळं असतात खरी. म्हणजे आतलं वर्तुळ अधिक महत्त्वाचं किंवा बाहेरचं कमी दर्जाचं असं नाही. पण काही मैत्र्या अमुक एका त्रिज्येच्या आत जातच नाहीत हे मात्र खरं. अगदी कायमस्वरुपी मैत्री असेल तरीही. गंमत म्हणजे या वर्तुळांचा विस्तार कमी जास्त होतो, त्यात लोक प्रवेश करतात, क्वचित सोडूनही जातात; पण अगदी आतलं वर्तुळ तसंच राहतं. किंबहुना, या वर्तुळात फक्‍त प्रवेश करता येतो, बाहेर पडता येत नाही हेच त्याचं वैशिष्ट्य! आणि या वर्तुळात कोण असेल यालाही काही नियम नाहीत. म्हणजे फक्‍त अंतरानी जवळ असलं तरच या वर्तुळाची "membership" मिळते असं नाही. आणि तुम्ही पत्र-फोन-इमेल वर संपर्कात असाल तरच मिळते असंही नाही. इतकंच काय जितकी मैत्री जुनी तितके तुम्ही आतल्या वर्तुळात जाल याचाही नेम नसतो.

पण या आतल्या वर्तुळातले मित्र असतात तरी कोण? तुम्ही कधीही, कितीही काळानंतर, कुठूनही, कु्ठल्याही अवस्थेत या मित्राला संपर्क केलात तरी जन्मोजन्मीचं नातं असल्यासारखे एका क्षणात संवाद जोडू शकता. मधला काळ, अंतर नाहीसं होतं. फार काही शब्दांची देवाण-घेवाण करावी लागत नाही. "ए तुला आठवतं" किंवा "किती दिवसांनी बोलतोय आपण" असले संभाषण जोडणारे पूलही लागत नाहीत! आपण स्वत:शी संवाद करावा तसा मोकळा संवाद सहज होऊ शकतो.

अगदी लहानपणी विशाल असणारं हे वर्तुळ कळत नकळत संकुचित होत जातं खरं! पण न कळत्या वयातसुद्धा कुठेतरी पुसटसा परिघ आखलेला असावा बहुतेक. अशीही लहान मुलं दिसतातच की जी काही अनोळखी लोकांकडे सुद्धा सहज झेपावतात, पण अगदी जवळच्या नातेवाइकांकडेही रमत नाहीत! मोठेपणी तर, अगदी माणूस कितीही जगन्मित्र झाला, तरी प्रत्येकाचं आतलं वर्तुळ कधीतरी कुठेतरी आखलेलं असतं असा माझा दावा आहे. कोणाचं जरा अधिक गजबजलेलं असेल कदाचित इतकंच.

तेव्हा पपांना मी "छे! inner circle वगैरे काही नाही, सगळ्या सारख्याच मैत्रिणी आहेत" असं म्हणाल्याचं आठवतंय. त्यात कुठेतरी आपण जगन्मित्र (जगन्मैत्रीण म्हणा हवं तर) वगैरे असल्याची पोकळ पौढी किंवा सूप्त इच्छा असेल कदाचित. किंवा वर्तुळांची ही भूमिती तेव्हा उमजली नसावी. आता नकळत आपली आपल्यालाच ती वर्तुळं दिसायला लागली आहेत. यालाच वयानी, अनुभवानी येणारं शहाणपण म्हणायचं का?

Monday, June 11, 2007

वेडा कवी

तसे सगळेच कवी वेडे असतात. म्हणजे माझ्या सगळ्याच आवडत्या कवींना मे "वेडे" म्हणते. हे अगदी पहिल्यांदा माझ्या ताईकडून शिकले. बोलगाणी अगदी ताजं कोरं होतं तेव्हा त्यातल्या या ओळी ती अगदी भाराउन जाउन वाचत होती:

प्रेम कधी भांडतं सुद्धा
निळं चांदणं सांडतं सुद्धा!

आणि मधेच थांबून म्हणाली "काय वेडे आहेत न पाडगावकर!" तेव्हा मला हसू आलं होतं. पण नंतर लक्षात आलं की अशा थेट भिडणार्‍या कवीला "वेडा" हाच शब्द अगदी चपखल आहे! तेव्हापासून कुठल्या ओळी मनाला भिडून गेल्या, हसवून-रडवून गेल्या, वेड लावून गेल्या की तो कवी "वेडा आहे झालं" असा विचार मनात येउन जातो.

आज हे आठवायचं कारण, अर्थातच अजून एक महावेडा कवी! खूप दिवसांनी "मरासिम" ऐकली. गुलज़ार नावाच्या वेड्या कवीच्या या वेड्या ओळी बराच वेळ घुमत राहिल्या कानात! किती किती वेगळ्या नात्यांना, भावनांना, जाणीवांना, संवेदनांना वेड्या शब्दात सहज पकडणे एक फक्‍त गुलज़ारच जाणे!


मुझको भी तरकीब सिखा दो यार ज़ुलाहे!
अक्सर तुझको देखा है के ताना बुनते,
जब कोइ तागा टूट गया या ख़तम हुआ,
फिर से बांधके, और सिरा कोइ जोड के उसमे -
आगे बुनने लगते हो!
तेरे इस तानेमें लेकिन एक भी गांठ-गिरह बुंदरकी देख नहीं सकता कोई ...

मैंने तो एक बार बुना था एकही रिश्ता,
लेकिन उसकी सारी गिरहें साफ़ नज़र आती है मेरे यार जुलाहे!

मुझको भी तरकीब सिखा दो यार जुलाहे ...

Tuesday, April 17, 2007

बी आणि खत

कुठल्या न कुठल्या निमित्तानी हा कितीही उहापोह केला तरी उत्तर न मिळणारा प्रश्न डोकं काढतोच. मुळात बियाणं चांगलं असेल, तर कुठलंही खत घातलं तरी काय फरक पडतो? मुळात मातीच चांगली असेल तर सामान्य कौशल्य असलेला कुंभार सुद्धा सुबक मडकं करू शकतो का? गळा चांगला असेल तर कुठल्या गुरुकडे गेलात याल कितपत महत्त्व आहे?

एक मात्र खरं; खत, कुंभार, गुरु यांची मुळात गरज असते हे मात्र कोणी नाकारू शकत नाही!

तर परवा चर्चेचा विषय होता की आपल्या जडणघडणीत आपल्या शाळेचं किती योगदान असतं? आपल्या मुलाला अमुक एका शाळेतच प्रवेश मिळावा असा हट्ट धरणं खरच कितपत योग्य आहे? "अति तिथे माती" या न्यायानुसार, कुठलाच अवाजवी हट्ट धरु नये हे जरी खरं असलं, तरी शालेय शिक्षण बर्‍याच बाबतीत महत्त्वाचं असल्यामुळे "शाळा चांगली हवी" यात तथ्य आहे न?

मला माझ्या शाळेचा खूप अभिमान आहे. माझ्या जडणघडणीत माझ्या शालेय शिक्षकांचा, मैत्रीणींचा आणि शाळेच्या वातावरणाचा फार मोठा वाटा आहे असं मी मानत आलेय. यात शाळेच्या दगडी जुन्या इमारती, लाकडी जिने, मोकळी मैदानं, बुचाची झाडं, भलं मोठं सभागृह, थोरलं ग्रंथालय आणि त्यातली नकाशांनी भरलेली खोली, पाण्याची टाकी सगळं आलं! दरवर्षीच्या स्पर्धा आल्या, हस्तलिखितं आली, निवडणुका आल्या, स्नेहसंमेलनं आली! "मुळात तुमच्यामधे जे काही गुणावगुण असतील त्यात शाळेच्या शिकवणुकीमुळे खरंच किती फरक पडतो?" या प्रश्नाला उत्तर देताना हे सगळं माझ्या डोळ्यापुढून भर्रकन् सरकून गेलं. या सगळ्या गोष्टींचा माझ्यावर खरंच किती ठसा उमटलाय हे व्यक्‍त करायला बहुतेक मी अपुरीच पडले.

पण "तू दुसर्‍या कुठल्या शाळेत गेली असतीस तर खरंच तू वेगळी व्यक्‍ती झाली असतीस?" किंवा "तुझ्या शाळेत जाणार्‍या सगळ्यांनाच असं वाटतं?" या प्रश्नांचं ठाम उत्तर तर मी किंवा कोणीही देउ शकणार नाही. काहीजण स्वयंपूर्ण असतात, तर काही गुरुस्पर्शानं धन्य होतात. कधी भेट न दिलेल्या शक्यतेच्या जगात कुठलं बियाणं कसं उगवलं असतं हे कसं सांगणार?

Thursday, March 15, 2007

क्रिकेट क्रिकेट

आत्तापर्यंत माझ्या इ-मेल मध्ये पाच वेळा आलेली ही ad तुम्ही नक्कीच बघितली असेल :

http://youtube.com/watch?v=kf9tKOexxkw

क्रिकेट विश्वचषकामुळे तमाम भारतीय (तमाम 'भारतीय क्रिकेटप्रेमी' म्हणणार होते, पण ती द्विरुक्‍तीच होईल ना!) चांगलेच "पेटलेले" आहेत. Nike वाल्यांनी अगदी बरोबर नस पकडून तयार केलीये ही ad!भारतात क्रिकेट इतका लोकप्रिय का असावा याची कारणमीमांसा काही मी नको द्यायला. लहानपणी गल्लीत क्रिकेट न खेळलेला मुलगा (क्वचित मुलगी सुद्धा) भेटणं अवघड. टी.व्ही. वर दिवस न् दिवस सामने बघणारे वीर (अर्थात वीरांगना सुद्धा) घरोघरी. दुसर्‍या दिवशी वार्षिक परीक्षा सुरु होत असून सुद्धा दिवसभर बोलणी खात बघितलेली मॅच मलासुद्धा अजून आठवतीये तर कट्टर क्रिकेट भक्‍तांची बातच नको! सुट्टीमधे सगळी भावंडं जमल्यावर क्रिकेटचे सामने हमखास रंगणारच. त्यात मुलगी असल्याने (मग ती आठ-दहा भावांमधली एकुलती लाडकी बहीण असली म्हणून काय झालं), क्रिकेट मधे कायम लिंबूटिंबू. आणि काय खेळ तरी मांडलेला असायचा, दोन बाजूची जांभळाची झाडं म्हणजे boundary, बाजूच्या आंब्याच्या झाडावर बसणार अंपायर आणि घराच्या दगडी भिंतीवर खडुने रंगवलेल्या यष्ट्या. म्हणजे बॉलवर त्या खडुच्या उठणार्‍या छप्प्यानी ठरवायचे आउट आहे की नाही! असा सगळाच आनंद!

पुढे शिक्षणासाठी देश सोडल्यावर हे वेड थोडं कमी झालं. नाही म्हणायला cricketinfo.com नवीन नवीन सुरु झाली होती तेव्हा अगदी ball-by-ball सामने "बघितल्याचे" आठवतायत. पण मग हळू हळू ते पण कमी झालं. या Nike च्या जाहिरातीनं सगळं पुन्हा उजळून निघालं, "Eat cricket, sleep cricket, drink only Coca Cola" आठवलं. त्यातून विश्वचषकाचा माहोल. म्हणजे "rekindling old flame" का काय म्हणतात न, तसं झालं. आज बराच वेळ क्रिकेटच्या websites पालथ्या घालण्यात गेला, "Receive alerts on your desktop" ला sign-up केलं आणि Nike ची ad तमाम दोस्त वर्गाला पाठवली, तेव्हा कुठे जरा मोकळं वाटलं!

आता इतकं करून भारतीय संघाला काही स्फुरण येवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना :)

Saturday, March 10, 2007

काळ काम वेग

परवा सकाळी कामाला जाताना ट्रॅफिक सिग्नल पाशी थांबले होते. शेजारच्या गाडीकडे लक्ष गेले. शेजारच्या गाडीतले काका (खरं म्हणजे चांगला तरुण माणूस होता, पण सगळे अनोळखी लोक काका किंवा काकू असतात) "बिनपाण्याने" हजामत करत होते, स्वत:चीच हो! मला हसू आवरेना. नेमकं तेव्हाच त्यांचं पण लक्ष माझ्याकडे वळलं. मला जरा ओशाळल्यासारखं झालं, पण त्यांनी खांदे उडवत मोकळेपणानं हसत माझं लक्ष समोरच्या हिरव्या झालेल्या दिव्याकडे वेधलं! वेळेशी रोजच सकाळी उठून लढाई करणार्‍यांना हे काही नवीन नाही, काय? कामाच्या वाटेवर गाडीत बसून ब्रेकफास्ट करणारे, टाय बांधणारे, केस नीटनेटके करणारे काका आणि मेकप करणार्‍या काक्वा सर्रास दिसतात की!

ते काका घरी वेळ झाला नाही म्हणून गाडीत दाढी करत असावेत का? की त्यांनी तशी सवयच लावून घेतली असेल, वेळ वाचवण्यासाठी? मला "चीपर बाय द डझन" ची आठवण झाली. त्यातील डॅड मुलांना आंघोळीच्या वेळी कॅसेटस् ऐकायला लावून कमीत कमी वेळात नवीन भाषा शिकवत असत. इतकेच नाही रोज करायच्या प्रत्येक कामात कसा वेळ वाचवता येईल, एकाच वेळी दोन किंवा तीन कामे कशी करता येतील, त्यातून नवीन काही कसे शिकता येईल याचा रात्रंदिवस विचार ते करत आणि अमलात पण आणत.

माझ्या एका मित्राची यावरची प्रतिक्रिया म्हणजे "ह्यॅ, यात काय अर्थय? सारखा आपला डोक्याला भुंगा! आपल्याला नाही बुवा जमणार, आपण कसं एकदम मजेत आरामात करतो सगळं, no tension!" त्याला म्हणलं, "dude, you missed the point!" म्हणजे वेळेची गरज म्हणून अशी कसरत करणं वेगळं. पण असं एका वेळी 2-2, 3-3, किंवा 4-4 गोष्टी करून जो वेळ वाचवल्याचा, आपली कार्यक्षमता वाढवल्याचा आनंद असतो तो तुला नाही कळायचा!

एक मात्र खरं, ही गोष्टच अशी आहे की ती रक्‍तात असावी लागते, शिकणं फार अवघड. ती एक कला आहे. आणि हे नुसतं वेळ वाचवण्याबाबत नाही बरंका, सगळ्याच गोष्टींच्या नियोजनाबद्दल. सकाळी उठल्यापासून माझ्या डोक्यात हा "भुंगा" चालू असतो म्हणा न. अमुक एक गोष्ट केली की तमुक गोष्ट करायची, हे झाल्याशिवाय ते होउ शकणार नाही, हे करत असतानाच ते पण उरकून घेता येईल, समजा हे जमलं नाही तर निदान ते तरी होईल, एक ना दोन!

हे लिहीता लिहीता एक मात्र लक्षात आलं, मी मेकप करत नाही आणि दाढी पण ;) म्हणजे आता गाडी चालवताना करायला काहीतरी शोधून काढलं पाहिजे!

Sunday, February 11, 2007

कर कर करा

विंदा करंदीकरांचं "भारतीय स्त्रियांसाठी लिहीलेलं स्थानगीत" परवा ऐकलं (सौजन्य : नक्षत्रांचे देणे)

कर कर करा, मर मर मरा.

दळ दळ दळा, मळ मळ मळा, तळ तळ तळा
तळा आणि जळा.

बाज बाज बाजा, पाज पाज पाजा, पोस पोस पोसा
पोसा आणि सोसा.

धू धू धुवा, शिव शिव शिवा, चिर चिर चिरा
चिरा आणि झुरा.

कुढ कुढ कुढा, चिड चिड चिडा, झिज झिज झिजा
शिजवा आणि शिजा.


चटका बसला.

आमची पिढी भाग्यवान. आमच्यापैकी बहुतजणींना जळावं, सोसावं, झुरावं, शिजावं लागलं नाही. (आणि हे मी फक्‍त सुशिक्षित मध्यमवर्गींयांबद्दल बोलतीये). हा काळाचा महिमा आहे का? की मागच्या कित्येक पिढयांनी सोसून, वेळोवेळी त्याविरुद्ध झगडून आमच्यासाठी कमावून ठेवलेलं हे पुण्य आहे? असं असताना, विंदांनी जे शब्दात मांडलं ते प्रत्यक्ष न अनुभवता देखील आम्हाला कळतं का? डोळे मिटून क्षणभर मागच्या पिढीतल्या स्त्रियांचा विचार केला की अंगावर सर्रकन् काटा येतोच न? त्यांच्या परिस्थितीच्या नुसत्या कल्पनेनं हताश झालंसं वाटतंच न? वाडा चिरेबंदी मधली "सुख मिळेना तेव्हा मीच सुखास दूर लोटून दिलं" असं म्हणणारी आई आठवते. सुन्न व्हायला होतं, रागही येतो.

हे सगळं आम्ही कुठेतरी पाहिलंय्, आया-आज्यांकडून ऐकलंय्, स्वानुभवकथनातून वाचलंय्. मग मला प्रश्न पडला. मी जर हे असं काही सोसलं नाही, तर मला या "भारतीय स्त्रियांबद्दल" जे काही वाटतं ती सहानुभूती आहे की फक्‍त हळहळ? एक स्त्री म्हणून तो बसलेला चटका विंदांनी बघितलेल्या आणि म्हणून उत्कटपणे मांडलेल्या चटक्यापेक्षा वेगळा आहे का? मागच्या पिढयांमधून रक्‍तात वाहत आलेला वारसा आहे का? अजून काही पिढया भविष्यात डोकावून बघितलं, तर त्या भविष्यातल्या स्त्रीलाही असाच चटका बसेल? की काळाच्या ओघात ती जखम भरून निघाली असेल?

माहीत नाही.

Tuesday, January 30, 2007

कोई बात चले

सध्या गाडीत वाजतीये गुलज़ार-जगजित ची "कोई बात चले". "बात" कुछ तो ज़रूर है! पण "मरासिम" नंतर या अल्बमने अपेक्षाभंग केला असं नाही म्हणलं, तरी अपेक्षापूर्ती नक्कीच केली नाही. गुलज़ारच्या शब्दांपेक्षा जगजितच्या सुरांबाबत जास्त!

बाकी तर ऐकून ऐकून चढतीलच काही त्रिवेणी, पण पहिल्यांदाच ऐकून ही रुतून बसलीये, अगदी typical गुलज़ार!

उड के जाते हुए पंछी ने बस इतनाही देखा
देर तक हाथ हिलाती रही वोह शाख फिज़ा में
अलविदा कहती थी या पास बुलाती थी उसे?

अजून एक नोंदल्याशिवाय राहवत नाही:

उम्र के खेल में एकतर्फा है ये रस्साकशी
एक सिरा मुझको दिया होता तो कुछ बात भी थी
मुझसे तगडा भी है और सामने आता भी नहीं