Friday, June 15, 2007

आतलं वर्तुळ

कॉलेजमधे असताना मैत्रिणींचे वाढदिवस जोरात साजरे व्हायचे. संध्याकाळी वाढदिवसाळू मैत्रिणीकडे धाड असायची. किलोनी पावभाजी (किंवा इडली-सांबार किंवा भेळ इ. इ.) आणि लिटरनी मिल्क-शेक (किंवा आइसक्रीम किंवा पियुश इ. इ.) तयार करणे हा आईचा न सांगता आखलेला आणि अर्थातच पार नेलेला पाककार्यक्रम असे! या धाडीमधे शाळेतल्या, कॉलेजमधल्या, गल्लीतल्या, क्लासमधल्या ज्या ज्या मैत्रिणींना वाढदिवस लक्षात असेल त्या सर्व सामील असायच्या. भेट म्हणून फक्‍त एक ग्रीटिंग कार्ड आणावे हा अलिखित नियम. एका वर्षी तर मला आठवतेय इतक्या मैत्रिणी एकदम आल्या की घरात जागाच नव्हती बसायला! हळूहळू सगळ्या पांगल्या, फक्‍त "घट्ट", सख्ख्या मैत्रिणी रेंगाळल्या. इतका वेळ आतल्या खोलीत तोच पेपर पुन्हा पुन्हा चाळत बसलेले पपा बाहेर डोकाऊन म्हणाले "अरे वा, आता फक्‍त 'inner circle' उरलंय वाटतं"...

तर मैत्रिची अशी वर्तुळं असतात खरी. म्हणजे आतलं वर्तुळ अधिक महत्त्वाचं किंवा बाहेरचं कमी दर्जाचं असं नाही. पण काही मैत्र्या अमुक एका त्रिज्येच्या आत जातच नाहीत हे मात्र खरं. अगदी कायमस्वरुपी मैत्री असेल तरीही. गंमत म्हणजे या वर्तुळांचा विस्तार कमी जास्त होतो, त्यात लोक प्रवेश करतात, क्वचित सोडूनही जातात; पण अगदी आतलं वर्तुळ तसंच राहतं. किंबहुना, या वर्तुळात फक्‍त प्रवेश करता येतो, बाहेर पडता येत नाही हेच त्याचं वैशिष्ट्य! आणि या वर्तुळात कोण असेल यालाही काही नियम नाहीत. म्हणजे फक्‍त अंतरानी जवळ असलं तरच या वर्तुळाची "membership" मिळते असं नाही. आणि तुम्ही पत्र-फोन-इमेल वर संपर्कात असाल तरच मिळते असंही नाही. इतकंच काय जितकी मैत्री जुनी तितके तुम्ही आतल्या वर्तुळात जाल याचाही नेम नसतो.

पण या आतल्या वर्तुळातले मित्र असतात तरी कोण? तुम्ही कधीही, कितीही काळानंतर, कुठूनही, कु्ठल्याही अवस्थेत या मित्राला संपर्क केलात तरी जन्मोजन्मीचं नातं असल्यासारखे एका क्षणात संवाद जोडू शकता. मधला काळ, अंतर नाहीसं होतं. फार काही शब्दांची देवाण-घेवाण करावी लागत नाही. "ए तुला आठवतं" किंवा "किती दिवसांनी बोलतोय आपण" असले संभाषण जोडणारे पूलही लागत नाहीत! आपण स्वत:शी संवाद करावा तसा मोकळा संवाद सहज होऊ शकतो.

अगदी लहानपणी विशाल असणारं हे वर्तुळ कळत नकळत संकुचित होत जातं खरं! पण न कळत्या वयातसुद्धा कुठेतरी पुसटसा परिघ आखलेला असावा बहुतेक. अशीही लहान मुलं दिसतातच की जी काही अनोळखी लोकांकडे सुद्धा सहज झेपावतात, पण अगदी जवळच्या नातेवाइकांकडेही रमत नाहीत! मोठेपणी तर, अगदी माणूस कितीही जगन्मित्र झाला, तरी प्रत्येकाचं आतलं वर्तुळ कधीतरी कुठेतरी आखलेलं असतं असा माझा दावा आहे. कोणाचं जरा अधिक गजबजलेलं असेल कदाचित इतकंच.

तेव्हा पपांना मी "छे! inner circle वगैरे काही नाही, सगळ्या सारख्याच मैत्रिणी आहेत" असं म्हणाल्याचं आठवतंय. त्यात कुठेतरी आपण जगन्मित्र (जगन्मैत्रीण म्हणा हवं तर) वगैरे असल्याची पोकळ पौढी किंवा सूप्त इच्छा असेल कदाचित. किंवा वर्तुळांची ही भूमिती तेव्हा उमजली नसावी. आता नकळत आपली आपल्यालाच ती वर्तुळं दिसायला लागली आहेत. यालाच वयानी, अनुभवानी येणारं शहाणपण म्हणायचं का?

13 comments:

Meghana Bhuskute said...

मैत्री. आपण घासून घासून किती गुळगुळीत करून टाकलाय ना हा शब्द?
’कॉफी विथ करण जोहर’च्या एका एपिसोडमधे तब्बू(की तब्बो?)ला करणनं तिच्या नागार्जुनशी असलेल्या नात्याबद्दल विचारलं होतं. त्यावर शक्य तितका शांतपणे ती म्हणाली होती - मैत्री या शब्दाचा आता आपण इतकं काही वाटोळं केलंय की मला आमच्या नात्याला काहीच नाव देण्यात गम्य नाही...’
यावर खाली कुठेतरी पडलेला करणचा चेहरा त्यानंच नंतर एडिट केला असावा, कारण तो दाखवलाच नाही!
आयुष्यात मित्र असतात हे किती बरंय ना? आपल्या भाषेत मित्र या शब्दाच्या अर्थछटेत लिंग दर्शवण्याची सोय - आणि सक्ती - आहे याबद्दल खुश व्हावं की नाराज व्हावं हे मला अजूनही ठरवता आलेलं नाही...
वेल रिटन...

Nandan said...

लेख आवडला. विशेषकरून शेवटी सुप्त इच्छेची दिलेली प्रांजळ कबुली. त्या इच्छेशी, खरं तर तिच्या सुप्तपणाशी relate करू शकलो. वर्तुळांची भूमिती वाढत्या वयाबरोबरच उमजत असावी. पण मग याच्या पुढचं realization काय, असा कधीकधी प्रश्न पडतो. थोडं cynic वाटेल कदाचित, पण 'जो तो आपापला येथे कुणी ना आधार' हे असावं का?

असो, पण असं आतलं वर्तुळ असणं हा एक मोठ्या आनंदाचा भाग असतो, हे नक्की.

Sumedha said...

नंदन, cynic अजिबात नाही, खरंच असावं! मला Sex and the City मधली Carrie आठवली:

Later that day I got to thinking about relationships. There are those that open you up to something new and exotic, those that are old and familiar, those that bring up lots of questions, those that bring you somewhere unexpected, those that bring you far from where you started, and those that bring you back. But the most exciting, challenging and significant relationship of all is the one you have with yourself.

म्हणजे वर्तुळाचा केंद्र हाच शेवटी "आपापला"!

HAREKRISHNAJI said...

मस्त लेख

Yogesh said...

सुंदर लेख. अतिशय आवडला.

Mints! said...

This is so true ...
But I always feel that one should have his/her inner circle. That keeps you grounded most of the time, nothing can touch that friendship ..

good write as usual ...

Vidya Bhutkar said...

:-) सुमेधा, मी जस-जशी तुझी पोस्टस वाचते, मला असं वाटतंय की मीच लिहिते आहे. :-)) प्रत्येकाचं एक वर्तुळ असतं हे खरं आणि जसे मोठे होतो तसे त्यातले लोक अजूनच मर्यादीत होताहेत. मला शब्द न मिळाल्याने माझी एक अपूर्ण पोस्ट आहे, हे वाचताना असं वाटलं तूच पूर्ण केलीस ती. :-) छानच !
-विद्या.

Anand Sarolkar said...

This is so true... He vachun khup kahi aathvani tajya jhalya. Thanks:)

प्रिया said...

या वर्तुळात फक्‍त प्रवेश करता येतो, बाहेर पडता येत नाही हेच त्याचं वैशिष्ट्य! >>> पटलंच अगदी! :)

You spoke for many of us!

Monsieur K said...

reminded me of an interesting conversation i had with my bro last month. he told me,
"a, b, c, d are your best friends. u probably talk with them wot u may not talk with other friends."
to be honest, he was right.
the problem is that with the passage of time, i have different people entering that "inner circle". those a, b, c and d are not constants.

while i agree that your friends rarely move out of the inner circle, even if u dont remain in touch, and you can connect to each other even when you meet each other after a long time, i somehow feel that at times, things have changed so much that this may or may not be true always even with your friends who were part of that inner circle.
e.g. if u meet a friend who's got married and he has kids while u are still not even married. :D

nevertheless, this is an interesting take on "inner circle".

also liked nandan's statement. i would call it to be true than being cynical. the only constant friend one has in the inner circle is just myself, everyone else just has a fleeting presence. :)

good post!

~ketan

Anil Jangam said...

सुमेधा,

आवडला लेख मला. परंतु तू ज्या वर्तुळाची गोष्ट करते आहेस, त्याच्या केन्द्रस्थानी तरी आपण स्वत: असतो हे तरी सत्या आहे का? हा प्रश्न पडतो मला .

कधी कधी आपण आपल्याच वर्तुळात स्वत:ची ओळख विसरून स्वत:ला शोधत असतो, नाही? एखाद्या अणू-रेणू सारखे फिरत राहिल्या सारखे.

-- एक (अ)-स्थिर मनकवडा.

Sumedha said...

हं, मैत्रीच्या वर्तुळाचा केंद्रबिंदू नक्कीच कायम असतो असं मला वाटतं, एकदा का लहानपणी त्या "ego" ची जाणीव झाली की ती पिच्छा सोडत नाही.... तू जे वर्तुळ म्हणतोयस ते कदाचित वेगळं असेल, स्वत:च्या ओळखीचं वर्तुळ, वेगळ्या प्रतलावर... (हे फार geometric होतंय का?) आणि त्याचा केंद्रबिंदू तर, तो आपल्याला आणि दुसर्‍यांना वेगवेगळा नक्की दिसेल, आणि कालपरत्त्वे बदलेल सुद्धा.... I guess मी भरकटतीये, but you get an idea :)

Asha Joglekar said...

Chanach aahe lekh an comments pan. Asa inner circle asat khar. An tyachi paribhasha pan agadi barobar. sadhya tari hya inner ircle madhe mazi ekach maitreen aahe. tichya inner madhe khoop asalya tari.