Monday, September 25, 2006

सहानुभूती

जुनी गोष्ट. कत्रिना चक्रीवादळाच्या वेळी आम्ही काही सहयोगी चर्चा करत होतो, पीडितांच्या दुर्दशेबद्दल सहानुभूती व्यक्‍त करत होतो. आमच्यातील एक, फ्लोरिडा चा रहिवासी, बराच वेळ आमची चर्चा ऐकून घेत होता. आणि मग थोड्या वेळाने कत्रिना मुळे ताज्या झालेल्या त्याच्या लहानपणीच्या चक्रीवादळ एंड्र्यूच्या आठवणींबद्दल सांगायला लागला. त्या वेळी झालेले त्याचे हाल त्याला आठवले. सगळं घर उद्ध्वस्त झालेलं जणू काही त्याच्या डोळ्यांसमोर त्याला दिसत होतं. कत्रिना मधे वाताहत झालेल्या शेकडो कुटुंबांचं दु:ख त्याच्या आठवणीत उमटलेलं दिसत होतं. तेव्हा मला जाणवलं की कत्रिना पीडितांबद्दल खरी सहानुभूती फक्‍त बहुतेक त्यालाच वाटत होती, बाकीचे आम्ही व्यक्‍त करत होतो निव्वळ हळहळ.

सहनुभूती म्हणजे सह-अनुभूती. एकत्र घेतलेला अनुभव, किंवा एकसमान अनुभवातून निर्माण झालेली जवळीकीची भावना. दुसर्‍याचे दु:ख (बहुधा दु:खच, कारण सहानुभूती या शब्दात दु:ख अध्याहृत नसलं, तरी त्याच्या वापरात असतं) बघून आपल्याला आलेल्या तशाच अनुभवाची आठवण होऊन जागी झालेली वेदना. पण पुष्कळ वेळेला दुसर्‍याच्या दु:खाबद्दल व्यक्‍त केलेली हळहळ सहानुभूती म्हणुन गैरसमजली जाते. अर्थात याचा अर्थ असा नाही की मनापासून हळहळ व्यक्‍त करणार्‍याच्या भावना कमी महत्त्वाच्या असतात. पण जेव्हा आपण त्या वेदना जगलेल्या असतो, तेव्हाच त्याच्याशी खरी सहानुभूती दाखवू शकतो ना? कितीही मनापासून व्यक्‍त केली गेली तरी हळहळ खूपच परकी वाटायला लागते मग.

मन इतकं तरल होऊ शकतं का की स्वानुभवाशिवाय सहानुभूती जाणवावी? हळहळ आणि सहनुभूती यातील सीमारेषा नाहीशी व्हावी? फक्‍त दु:ख, वेदना यातून गेल्यावरच आपल्याकडे दुसर्‍याचं दु:ख समजण्याइतकी क्षमता येते? इंग्रजी मधे "relate" हा अगदी चपखल शब्द आहे या भावनेसाठी. त्याला मराठीत "सहकंप" म्हणता येईल का? असा सहकंप फक्‍त कटु अनुभवातूनच जन्म घेतो का? आनंद चार चौघांबरोबर वाटून घेतला की दुणावतो हे जरी खरं असलं, तरी एकत्र अनुभवलेली दु:खं आपल्याला एकमेकांच्या अधिक जवळ आणतात, घट्ट बंध निर्माण करतात. म्हणूनच "सहानुभूती" यात शब्दश: अध्याहृत नसलेलं दु:ख त्या भावनेत मात्र अंगभूत होऊन जात असेल का?

8 comments:

Anonymous said...

सुमेधा,

लेख सुंदरच आहे. हळहळ आणि सहानुभूति या शब्दांच्या छटांमधील फरक छान वर्णन केला आहे.

Kaustubh said...

आज बऱ्याच दिवसांनी तुझ्या ब्लॉगवर Comment टाकतोय.
तुझ्या या लेखाने थोडसं विचारात टाकलं मला. माझ्या अनुभवांशी relate केलं थोडसं आणि मग समजलं की तू म्हणतेस ते खरं आहे. छान लेख.

Nandan said...

Empathy aaNi sympathy madhala farak chhan mandala aahe. Jave tyachya vansha tevha kale, hech khare shevati.

Sumedha said...

धन्यवाद शैलेश, कौस्तुभ, नंदन. empathy आणि sympathy या शब्दांना अगदी चपखल अशी मराठी शब्दजोडी आहे का? मला तरी सुचत नाही...

charuta said...

यावरुन आठवले: अनुभवि होन्यसाठि अनुभव घ्यावाच लागतो असे नाहि! we can certainly relate better if we have been through something similar but otherwise also, we can certainly empathize with the other person's pain.

Akira said...

Sahanubhuti Vs Halhal..chaan mandle ahes!

nivant said...

anukampa navacha shabda eikala ahes ka? To jaasta samarpak vaTato mala. (Chukicha asel tar kshamaswa)

Sumedha said...

तुझी सूचना बरोबर असावी. अनुकंप याचा नेमका अर्थ मलाही माहीत नाही. पण तो sumpathy पेक्षा empathy ला जास्त जवळचा आहे असे मला वाटायचे. पण "नच सुंदरी करू कोपा, मजवरी धरी अनुकंपा" यात तो "कणव" या अर्थाने (have pity on me) वापरला आहे...

म्हणजे अनुकंप आणि सहकंप हे शब्दद्वय sympathy आणि empathy ला चपखल बसतात असे म्हणूया का? कोण्या शब्द गुरुला विचारले पाहिजे!