Tuesday, August 22, 2006

दाटून आलेल्या संध्याकाळी

अश्विनीच्या नोंदीने सुधीर मोघेंच्या या कवितेची आठवण करून दिली. माझ्या हॉस्टेल वरच्या एका मैत्रिणीने फार कौतुकानी ही कविता माझ्या लाडक्या कवितांच्या वहीत लिहून दिली होती. ती माझ्या छोट्या का होईना, पण गुंतवून ठेवणार्‍या त्या ठेव्यावर फारच खूष झाली होती. आणि मीही मिळतील ते थेंब गोळा करणारी, मग तिचाही ठेवा पालथा घातला! हॉस्टेल सोडल्यापासून दुर्दैवानं तिच्याशी संपर्क तुटला ("यथा काष्ठं च काष्ठं च" अन् दुसरं काय?), पण आज या कवितेच्या निमित्ताने तिची आठवण ताजी झाली. त्याबद्दल अश्विनीला धन्यवाद!

दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित सोनेरी उन पडतं
तसंच काहीसं पाउल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येतं!

शोधून कधी सापडत नाही
मागून कधी मिळत नाही
वादळ वेडं घुसतं तेव्हा
टाळू म्हणुन टळत नाही!

आकाश, पाणी, तारे, वारे
सारे सारे ताजे होतात
वर्षांच्या विटलेल्या बधिर मनाला
आवेशांचे तुरे फुटतात!

संभ्रम, स्वप्न, तळमळ, सांत्वन
किती किती तर्‍हा असतात
सार्‍या सार्‍या सारख्याच जीवघेण्या
आणि खोल जिव्हारी ठसतात!

प्रेमाच्या सफल विफलतेला
खरं तर काहीच महत्त्व नसतं
इथल्या जय पराजयात
एकच गहिरं सार्थक असतं!

मात्र ते भोगण्यासाठी
एक उसळणारं मन लागतं
खुळ्या सोनेरी उन्हासारखं
आपल्या आयुष्यात प्रेम यावं लागतं!

-सुधीर मोघे

4 comments:

Abhijeet Kulkarni said...

sundar kavita ahe. thanx for sharing it with us!

Gayatri said...

अप्रतिम!

Ashwinis-creations said...

सुमेधा

मला हीच कविता हवी होती...आणि आम्हीही ती हॉस्टेल च्या दिवसांतच अशी वाचली होती....
तुला (ब्लॉग वर) भेटून फ़ार छान वाटलं!
कवितांच्या या धाग्याने आपण असेच भेटत राहूया!
सुधीर मोघेंच्या अजूनही काही अतिशय सुरेख कविता आहेत माझ्याकडे! रागांवर आधारित...तू त्या वाचल्या आहेत का?

बाय
अश्विनी, पुणे

Saurabh Shetye said...

ही कविता सुधीर मोघे यांची आहे, श्रीकांत मोघे यांची नव्हे