कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीला प्रणाम. ही माझी खूप आवडती कविता!
नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परि स्मरते आणिक करते व्याकुळ केव्हा
त्या माजघरातिल मंद दिव्याची वात!
वार्यावर येथिल रातराणि ही धुंद
टाकता उसासे चरणचाल हो मंद
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
त्या परसामधला एकच तो निशिगंध
हेलावे भवती सागर येथ अफाट
तीरावर श्रीमान इमारतींचा थाट
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
तो नदीकिनारा आणि भंगला घाट
बेहोष चढे जलशांना येथिल रंग
रुणझुणता नूपुर जीव बने नि:संग
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
तू आर्त मला जो ऐकवलास अभंग
लावण्यवतींचा लालस येथ निवास
मदिरेत माणकापरी तरारे फेस
परि स्मरती आणिक करती व्याकुळ केव्हा
ते उदास डोळे, त्यातिल करूण-विलास
-कुसुमाग्रज
Monday, February 27, 2006
Friday, February 24, 2006
आहा!
अलीकडे दिसामाजी ब्लॉग "चाळायचा" छंदच जडला आहे. "marathiblogs.net" वर नवीन नोंदी तर लगेच बघायला मिळतात, पण कितीतरी वाचायच्या राहिलेल्या जुन्या नोंदी देखील खुणावत असतात. आणि एकदम असं काही गवसतं की वाटतं "आहा, मला सुद्धा अगदी हेच म्हणायचं होतं..." बहुतेक वेळा लेखकानी/लेखिकेनी ते इतक्या नेमक्या शब्दात मांडलेलं असतं, की आपला आणि त्या कधी न भेटलेल्या लेखकाचा/लेखिकेचा धागा असा जुळलेला जाणवून मन आनंदभरारी मारतं.
खूप वेळा असंही होतं की आपल्याला खूप छान काही कल्पना सुचते, आणि विश्वासच बसत नाही की हे आपल्याच डोक्यातून बाहेर आलंय्... असं वाटतं की हे नक्की आपण कुठेतरी वाचलं असणार पूर्वी! कुठल्यातरी पुस्तकात, कवितेत नाहीतर कोणाच्यातरी ब्लॉगवर. स्मरणशक्तीला ताण देऊन सुद्धा आठवत नाही, खूप अस्वस्थ वाटतं. आणि अचानक ध्यानी मनी नसताना ते कुठूनतरी समोर येतं आणि "आहा"!! आणि गंमत म्हणजे, तेव्हा सुद्धा आपण ते पहिल्यांदाच वाचत असतो! असं झालंय तुम्हाला कधी?
मागे नाटयप्रशिक्षण शिबीरात माधव वझेंनी सांगितलेलं काही आठवलं. आपल्या सगळ्यांनाच काहीतरी सांगायचं असतं. आपल्या सगळ्यांच्याच आत एक तोटी बंद करून ठेवलेली असते. उघडा ना ती तोटी, आणि वाहू देत ना ते विचार बाहेर. कशाला घाबरता? कशाला थोपवून ठेवता? कशाला लपवून ठेवता? फार फार तर काय होईल? लोक हसतील? हसू देत ना! आपण काही मोठे कलावंत तर होऊ बघत नाही ना, मग हसले लोक तर कुठे बिघडलं?
आणि मग हे लक्षात आलं की मला जे काही म्हणायचं आहे, ते मुक्तपणे प्रकट करायचा आनंद फार मोठा तर आहेच, पण कदाचित कुठेतरी कोणीतरी हे वाचून "आहा" चा आनंद घेईल, या जाणीवेतून द्विगुणित होणारा आनंद अमूल्य आहे! नाही का?

Monday, February 20, 2006
तू भ्रमत आहासी वाया
काही दिवसांपूर्वी वपुंचे "तू भ्रमत आहासी वाया" वाचले. प्रांजळपणे सांगते, पहिल्या वाचनात सगळे झेपले नाही. "कळले" नाही असे म्हणत नाही, पण खूप "जड" वाटले. मग थोडया दिवसांनी पुन्हा वाचले. खूप आवडून गेले. आपल्या सगळ्यांना रोजच्या आयुष्यात कधी ना कधी आव्हान देणारे, कधी ना कधी हुलकावणी देणारे, कधी ना कधी वेडावून जाणारे तत्त्वज्ञान एका छोटया कथाधाग्याच्या आधाराने अगदी सहज उलगडत नेले आहे. पाना-पानावरची ओळ न् ओळ आपल्याला विचार करायला भाग पाडते. सगळंच काही आपल्याला पटतं असंही नाही, पण थबकून विचार करायला लावतं. आपले अनुभव त्याच्याशी पडताळून पहायला लावतं. प्रश्न विचारायला भाग पाडतं.
"शरण आल्यानं फरक पडत नाही. रियलायझेशन केवळ पाय पकडून होत नाही. क्षमा मागणारा माणूस जास्त धोकादायक. क्षमा मागणं, चूक कबुल करणं हा बहाणा असतो. पुन: पहिल्याच मार्गावर जाण्याचा परवाना असतो, कारण वाकावं लागलं ह्याचा खोलवर राग असतो. कुणाचा तरी अपमान केला, असभ्य उद्गार काढले, आपल्या प्रतिमेला तडा गेला, तो सांधण्यासाठी माणूस क्षमा मागतो. आपण मूळचे तसे नाही आहोत, हे ठसवण्याचा तो दुबळा प्रयत्न असतो. क्षमा मागण्यानं पुन: पहिल्यासारखंच वागण्याची मोकळीक मिळते. त्याऐवजी विचार करावा."

Tuesday, February 14, 2006
गात रहा
खूप पूर्वी कवी अनिलांच्या काही कविता हाती लागल्या होत्या. वेगळी शैली आणि आशयघन कविता. त्यातली ही एक खूप लक्षात राहिली, मधून मधून गुणगुणावी अशी! कोणाकडे अजून अनिलांच्या कवितांचा संग्रह असेल तर जरूर नोंद करा!
गात रहा गात रहा आनंद देत जात रहा
उदासीचे काळे ढग आले तरी हसत रहा
जगाच्या रंगभूमीवर प्रत्येकाचेच दशावतार
त्यातला पहिला अर्भकाचा
तोच तुझा कायम तुझा
डोळ्यांमधे कौतुकाचं काजळ घालून जग पहा
झुकझुक गाडी खेळत खेळत रमत गमत फिरत रहा
जमलं तर रडणार्याचे डोळे पूस त्याचा देखील हव्यास नको
परवचा पाठ करु नको
कोणाचिही कविता म्हण
आली नाही तर नवीन कर
- अनिल.

Friday, February 10, 2006
उमराव जान
नाही, हे "उमराव जान" या जुन्या हिंदी सिनेमाचं परीक्षण नाही. किंवा नव्याने येऊ घातलेल्या सिनेमावरचं गॉसिप पण नाही!
मी शाळेत असताना दूरदर्शन वर "उमराव जान" रात्री जागून बघितलेला आठवतोय. तेव्हा त्यातलं काय कळलं, काय भावलं ते नाही नीट आठवत. खूप गाजलेला सिनेमा म्हणून बघितला. अर्थात आशाच्या आवाजातली भावपूर्ण गाणी आणि रेखाचा संयत अभिनय हा त्या चित्रपटाच्या यशातील मोठा वाटा होता, पण तो या ब्लॉगचा विषय नाही!
परवा परत एकदा "उमराव जान" बघितला. आणि खूप आवडून गेला. फक्त संगीत, अभिनय, ते वातावरण यासाठीच नाही, तर त्या कथेनी जी हु्रहूर लावली त्यासाठी. मी काही फार शोकांतिकांची चाहती नाही. पण ही कथा चटका लावून गेली.
आणि मग विचार करता लक्षात आलं की उमराव जानचा प्रवास इतका चटका लावून जातो त्याचं कारण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तिला लागलेल्या ठेचा. एका पाठोपाठ एक. तिच्या हातून हुकत जाणार्या गोष्टी उदास करून जातातच, पण त्याउपर त्या गोष्टी पुन्हा तिच्या रस्त्यात येऊन तिला वेडावत राहतात, त्यानी आपण गलबलून जातो! याला तिचं दुर्दैव म्हणावं की क्रूर योगायोग?
या प्रश्नापाशी मी थबकले! माझा "नशीब" या कल्पनेवर विश्वास आहे. पण सगळ्यांचा असतो असं नाही. माझ्या काही मित्र-मैत्रीणींचं असं मत आहे नशीब, प्राक्तन, दैव असं काही नसतंच, असतात फक्त योगायोग. आणि ते योगायोग सुद्धा कधी सुखावह ठरतात तर कधी दुखरे, हाही योगायोगच! तसं पाहीलं तर नशीब आणि योग यातील सीमारेषा पुसटच आहे. पण नशीब म्हणलं की ते कुणाच्या तरी माथी लिहीलेलं, प्रत्येकाचं वेगळं असं. आणि योग हा कोणाचाही असू शकतो, probability च्या व्याख्येप्रमाणे फक्त एक "शक्यता".
"नशीब" काय किंवा "योगायोग" काय, उत्तर न सापडणार्या प्रश्नांची ही आपण तयार केलेली उत्तरं आहेत, हे मात्र खरं. उमराव जाननी याची फक्त आठवण करून दिली! आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातले काही टोकाचे योगायोगच तर आपलं आयुष्य कधीतरी नाट्यमय करून टाकतात. कल्पनेतल्या उमरावच्या नशीबी असे दुखरे योगायोग आले (?), त्याला काय म्हणावं?

Wednesday, February 08, 2006
वरदान
नव्या वाटा ही नोंद वाचली, आणि वहीमधे लिहून ठेवलेली ही शांता शेळकेंची पूर्ण कविता इथे नोंदल्यावाचून राहावत नाही!!
किती सुंदर असते हे विस्मृतीचे वरदान
भूतकाळ चालला आहे अटळपणे विरघळत
आणि जिवापलीकडे जपून ठेवलेल्या
टवटवीत क्षणांच्याही पाकळ्या राहतात गळत!
पायाखालच्या जुन्या दिशा जरी हरवल्या
तरी नव्या वाटा घेतात त्यांची जागा
आणि प्रत्येक नव्या वळणावर पुन्हा
असतातच डवरलेल्या अनोख्या फुलबागा!
दिले होते मी आश्वासन प्रिय अनुभवांना
की ढळू देणार नाही हॄदयातले त्यांचे स्थान
पण तेव्हा कुठे ठाऊक होते मला
की अंतस्थ देखील बघता बघता होते बेइमान?
रात्र आसवांत भिजते, गदगदते हुंदक्यांनी
तरीही एकवटून अवघा आवेग, जोर
भविष्याची दुर्दम्य आश्वासने पदरात घेऊन
रसरसलेली हसरी पहाट ठाकतेच समोर!
नव्या वळणावरुन पुढे डोकाऊन बघायला धैर्य लागतं! तसंच जुन्या प्रिय-अप्रिय आठवणी आपण विसरुन चाललोय हे स्वीकारायला सुद्धा.
जुन्याला "अलविदा" करायचं आणि नव्याचं स्वागत करायचं धैर्य कायम माझ्या ठायी असू दे!

Sunday, February 05, 2006
बोलगाणी
पाडगावकरांची "बोलगाणी" आपल्या सगळ्यांचीच खूप लाडकी. या नावातच इतका निरागस आनंद भरून आहे, तो प्रत्येक गाण्यातून आपल्या बरोबर गुणगुणत राहतो!
"बोलगाणी" म्हणता क्षणी "प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे, प्रेम असतं", किंवा "शीळ घालत माणसं" किंवा "सांगा कसं जगायचं" ही गाणी आपल्या पटकन ओठावर येतात. आणि त्या गाण्यांचं अगदी रंगून जाऊन वाचन करणारी पाडगावकरांची प्रसन्न हसरी मूर्ती डोळ्यांसमोर येते!
त्यातलीच काही "वेडी" "चिमणी" बोलगाणी ...
भास
खिडकीतून चांदणं आत येत नाही,
तो नुसताच भास असतो!
खरं तर चांदण्यासारखा भासणारा
तो तुझा भारावलेला श्वास असतो!
खरं गाणं
पाखरांना ठाउक असतं,
बाजारात गळा विकून
आपलं खरं गाणं कधी गाता येत नाही!
सोन्याच्या पिंजर्याला पंख विकून
आभाळाच्या जवळ जाता येत नाही.
गूढ
मला सांग,
फुलपाखरु तुझ्याकडेच कसं वळलं?
फांदी सगळी रिकामी असूनही
फुलं येणार हे तुला कसं कळलं?
श्रेय
कधी कधी सगळंच कसं चुकत जातं!
नको ते हातात येतं, हवं ते हुकत जातं!
अशा वेळी काय करावं?
सुकलेल्या झाडाला न बोलता पाणी द्यावं!

Friday, February 03, 2006
कधी एकदा
आज विदुला च्या ब्लॉग वर समस्यापूर्तीचं आवाहन बघितलं आणि पुन्हा एकदा शाळेच्या दिवसांची आठवण झाली!
आमच्या शाळेच्या वार्षिकासाठी दर वर्षी एक समस्यापूर्तीची स्पर्धा असायची. आगटे बाई स्वत: कविता करायच्या, आणि त्याच्या पहिल्या एक किंवा दोन ओळी फक्त द्यायच्या. त्या स्पर्धेतली उत्तम कविता आणि बाईंची मूळ कविता दोन्ही मग वार्षिकात प्रसिद्ध होत.
तशी माझी स्मरणशक्ती काही फार भक्कम नाही. पण कशा कोणास ठाउक, एका वर्षीच्या समस्यापूर्तीच्या 2 ओळी माझ्या लक्षात राहिल्या. त्या बाईंच्या मूळ कवितेच्या होत्या की बक्षिस मिळालेल्या कवितेच्या हे सुद्धा आता आठवत नाही. आणि बर्याच वर्षांनंतर मला पुढच्या काही ओळी सुचल्या.
अशीच येते कधी एकदा उत्साहाला भरती ताजी
आणि मनाच्या आकाशातुन मनोरथांची आतषबाजी
असाच येतो कधी एकदा आठवणींना पूर केव्हढा
आणि मनाच्या कुपीत राही दरवळणारा गंध-केवडा
अशाच येती कधी एकदा सैरभैरही विचारधारा
आणि मनाच्या चित्री उमटे आकांक्षांचा मोरपिसारा
अशीच होते कधी एकदा श्रद्धासुमनांची उधळण
आणि मनाच्या गाभार्यातुन भावभक्तीची ओंजळ अर्पण
असेही येती कधी एकदा रिते हुंदके उदासवाणे
तरीहि मनाला हसवत खेळत गात रहावे जीवनगाणे

Wednesday, February 01, 2006
जीवन
"जीवन" हा शब्द कोणी नेहेमीच्या संभाषणात वापरला, की मला शाळेच्या दिवसांची आठवण येते. शाळेत असताना आमची एक मैत्रीण खूप जड जड भाषेत निबंध लिहायची. अर्थात, अतिशय हुशार आणि हळवी असलेली ही सखी आम्हा सर्वांचा अभिमानाचा विषय होती. तेव्हा हे लिहीण्या आधी तिची माफी मागते :-)
तर ही सखी निबंधातच जड जड शब्द वापरायची असं नाही, तर बोलताना सुद्धा बरेच वेळा "जीवन", "ध्येय", "अभिमान" असे शब्द अगदी सहजपणे वापरायची. आणि खरे सांगायचे तर तिच्या व्यक्तिमत्त्वाला ते शोभूनही दिसायचे. पण आम्ही बाकीच्या सामान्य मुली तिची चेष्टा करायची संधी कशाला सोडू? आम्ही भूमितीच्या तासाला मुद्दाम "g1", असे जोरात म्हणून मग "g2, g3, g4...." असं म्हणून खिदळायचो!!
तेव्हा आता मला "जीवन" या विषयावर काही लिहायचा फार अधिकार नाही!! पण कुसुमाग्रजांची ही कविता नक्की नोंदू शकते!
अनंततेचे गहन सरोवर
त्यात कडेला विश्वकमल हे
फुले सनातन
त्या कमळाच्या
एका दलावर
पडले आहे
थोडे दहिवर
थरथरणार्या त्या थेंबाला
पृथ्वीवरचे आम्ही मानव
म्हणतो जीवन

Subscribe to:
Posts (Atom)