Friday, June 15, 2007

आतलं वर्तुळ

कॉलेजमधे असताना मैत्रिणींचे वाढदिवस जोरात साजरे व्हायचे. संध्याकाळी वाढदिवसाळू मैत्रिणीकडे धाड असायची. किलोनी पावभाजी (किंवा इडली-सांबार किंवा भेळ इ. इ.) आणि लिटरनी मिल्क-शेक (किंवा आइसक्रीम किंवा पियुश इ. इ.) तयार करणे हा आईचा न सांगता आखलेला आणि अर्थातच पार नेलेला पाककार्यक्रम असे! या धाडीमधे शाळेतल्या, कॉलेजमधल्या, गल्लीतल्या, क्लासमधल्या ज्या ज्या मैत्रिणींना वाढदिवस लक्षात असेल त्या सर्व सामील असायच्या. भेट म्हणून फक्‍त एक ग्रीटिंग कार्ड आणावे हा अलिखित नियम. एका वर्षी तर मला आठवतेय इतक्या मैत्रिणी एकदम आल्या की घरात जागाच नव्हती बसायला! हळूहळू सगळ्या पांगल्या, फक्‍त "घट्ट", सख्ख्या मैत्रिणी रेंगाळल्या. इतका वेळ आतल्या खोलीत तोच पेपर पुन्हा पुन्हा चाळत बसलेले पपा बाहेर डोकाऊन म्हणाले "अरे वा, आता फक्‍त 'inner circle' उरलंय वाटतं"...

तर मैत्रिची अशी वर्तुळं असतात खरी. म्हणजे आतलं वर्तुळ अधिक महत्त्वाचं किंवा बाहेरचं कमी दर्जाचं असं नाही. पण काही मैत्र्या अमुक एका त्रिज्येच्या आत जातच नाहीत हे मात्र खरं. अगदी कायमस्वरुपी मैत्री असेल तरीही. गंमत म्हणजे या वर्तुळांचा विस्तार कमी जास्त होतो, त्यात लोक प्रवेश करतात, क्वचित सोडूनही जातात; पण अगदी आतलं वर्तुळ तसंच राहतं. किंबहुना, या वर्तुळात फक्‍त प्रवेश करता येतो, बाहेर पडता येत नाही हेच त्याचं वैशिष्ट्य! आणि या वर्तुळात कोण असेल यालाही काही नियम नाहीत. म्हणजे फक्‍त अंतरानी जवळ असलं तरच या वर्तुळाची "membership" मिळते असं नाही. आणि तुम्ही पत्र-फोन-इमेल वर संपर्कात असाल तरच मिळते असंही नाही. इतकंच काय जितकी मैत्री जुनी तितके तुम्ही आतल्या वर्तुळात जाल याचाही नेम नसतो.

पण या आतल्या वर्तुळातले मित्र असतात तरी कोण? तुम्ही कधीही, कितीही काळानंतर, कुठूनही, कु्ठल्याही अवस्थेत या मित्राला संपर्क केलात तरी जन्मोजन्मीचं नातं असल्यासारखे एका क्षणात संवाद जोडू शकता. मधला काळ, अंतर नाहीसं होतं. फार काही शब्दांची देवाण-घेवाण करावी लागत नाही. "ए तुला आठवतं" किंवा "किती दिवसांनी बोलतोय आपण" असले संभाषण जोडणारे पूलही लागत नाहीत! आपण स्वत:शी संवाद करावा तसा मोकळा संवाद सहज होऊ शकतो.

अगदी लहानपणी विशाल असणारं हे वर्तुळ कळत नकळत संकुचित होत जातं खरं! पण न कळत्या वयातसुद्धा कुठेतरी पुसटसा परिघ आखलेला असावा बहुतेक. अशीही लहान मुलं दिसतातच की जी काही अनोळखी लोकांकडे सुद्धा सहज झेपावतात, पण अगदी जवळच्या नातेवाइकांकडेही रमत नाहीत! मोठेपणी तर, अगदी माणूस कितीही जगन्मित्र झाला, तरी प्रत्येकाचं आतलं वर्तुळ कधीतरी कुठेतरी आखलेलं असतं असा माझा दावा आहे. कोणाचं जरा अधिक गजबजलेलं असेल कदाचित इतकंच.

तेव्हा पपांना मी "छे! inner circle वगैरे काही नाही, सगळ्या सारख्याच मैत्रिणी आहेत" असं म्हणाल्याचं आठवतंय. त्यात कुठेतरी आपण जगन्मित्र (जगन्मैत्रीण म्हणा हवं तर) वगैरे असल्याची पोकळ पौढी किंवा सूप्त इच्छा असेल कदाचित. किंवा वर्तुळांची ही भूमिती तेव्हा उमजली नसावी. आता नकळत आपली आपल्यालाच ती वर्तुळं दिसायला लागली आहेत. यालाच वयानी, अनुभवानी येणारं शहाणपण म्हणायचं का?

Monday, June 11, 2007

वेडा कवी

तसे सगळेच कवी वेडे असतात. म्हणजे माझ्या सगळ्याच आवडत्या कवींना मे "वेडे" म्हणते. हे अगदी पहिल्यांदा माझ्या ताईकडून शिकले. बोलगाणी अगदी ताजं कोरं होतं तेव्हा त्यातल्या या ओळी ती अगदी भाराउन जाउन वाचत होती:

प्रेम कधी भांडतं सुद्धा
निळं चांदणं सांडतं सुद्धा!

आणि मधेच थांबून म्हणाली "काय वेडे आहेत न पाडगावकर!" तेव्हा मला हसू आलं होतं. पण नंतर लक्षात आलं की अशा थेट भिडणार्‍या कवीला "वेडा" हाच शब्द अगदी चपखल आहे! तेव्हापासून कुठल्या ओळी मनाला भिडून गेल्या, हसवून-रडवून गेल्या, वेड लावून गेल्या की तो कवी "वेडा आहे झालं" असा विचार मनात येउन जातो.

आज हे आठवायचं कारण, अर्थातच अजून एक महावेडा कवी! खूप दिवसांनी "मरासिम" ऐकली. गुलज़ार नावाच्या वेड्या कवीच्या या वेड्या ओळी बराच वेळ घुमत राहिल्या कानात! किती किती वेगळ्या नात्यांना, भावनांना, जाणीवांना, संवेदनांना वेड्या शब्दात सहज पकडणे एक फक्‍त गुलज़ारच जाणे!


मुझको भी तरकीब सिखा दो यार ज़ुलाहे!
अक्सर तुझको देखा है के ताना बुनते,
जब कोइ तागा टूट गया या ख़तम हुआ,
फिर से बांधके, और सिरा कोइ जोड के उसमे -
आगे बुनने लगते हो!
तेरे इस तानेमें लेकिन एक भी गांठ-गिरह बुंदरकी देख नहीं सकता कोई ...

मैंने तो एक बार बुना था एकही रिश्ता,
लेकिन उसकी सारी गिरहें साफ़ नज़र आती है मेरे यार जुलाहे!

मुझको भी तरकीब सिखा दो यार जुलाहे ...