Tulip च्या ब्लॉगवर Emotional Dependence नोंद वाचली आणि ही कविता आठवली.
तुझ्याशी वाद करताना
आताशा माझा आवाज
तितकासा चढलेला नसतो
आणि तुझी प्रतिक्रियाही
झोंबण्याइतकी तिखट नसते
तुझ्या मागोमाग निमूटपणे येताना
मी फारशी खळखळ करत नाही
पण कधीतरी मी यायचं नाकारलंच
तर तूही हट्ट धरत नाहीस
तुझ्या निशिगंधाचं मला अप्रूप वाटावं
यामुळं तू भारावून जात नाहीस
नि मी लावलेल्या गुलाबाची
मला हवी तशी दखल
तू घेतली नाहीस तरी
मीही हळवी होत नाही
आपल्या हातून निसटून गेलेल्या
संवत्सरांनी जाता जाता
समंजसपणाची शाल
आपल्यावर पांघरली आहे?
की बरेच श्रावण बरसून गेल्यावर
आता सरावाने कोसळणार्या पावसात
तितकासा आवेग उरलेला नाही?
- आसावरी काकडे
Wednesday, April 12, 2006
Subscribe to:
Post Comments (Atom)
4 comments:
सुंदर! आसावरी काकडेंच्या अजून कविता पोस्ट कर ना प्लीज!
नमस्कार सुमेधा,
आयला, जबरीच कविता आहे, आवडली!
पण म्हणायचंय तरी काय कवयित्रीला? (Is it a contradicting pair of statements :))
I mean, if we don't get used to things that we spend our lives with, when will there be a time to learn about the new life around?
त्यामुळे, एखाद्या (काही) गोष्टीची सवय होणं ही एक चांगली गोष्ट आहे :), नाही का?
असो,
केदार
गायत्री, माझ्याकडे इतकी एकच कविता आहे त्यांची, कुठूनतरी वेचलेली! पण शोधात आहे मी सुद्धा. मिळाले काही तर नक्की करीन नोंद.
केदार, वर वर पाहता विरोधाभास आहे खरा. पण काही गोष्टी आवडण्यासाठी कळाव्या लागतातच असं नाही! उलट काही गोष्टी कळल्या कीच आवडेनाशा होतात, काय? मला वाटतं की कवयित्रीला चांगल्या गोष्टीची "सवय"च फक्त अभिप्रेत नाही इथे. पहिल्या पावसाने झालेल्या ओल्या मातीच्या वासाची सवय होते का कधी? प्रत्येक वेळी तो गंध धुंद करून टाकतोच न? त्याची सवय झाली, ती संवेदना बोथट झाली तर? शिवाय कवयित्रीला जे नातं अपेक्षित आहे, त्यातल्या काही गोष्टींची सवय होणं (त्याहीपेक्षा संवेदना बोथट होणं) तिला उदास करून जातं, "आहे मनोहर तरी..." जाणीव देतं...
"समज" आणि बोरकरांची "कळत जाते तसे ..." मला वाटते खूप जवळ आहेत.
सन्जीवनी बोकीलान्ची एक कविता आठवली:
जे मिळविण्याचा एवढा अट्टहास केला
ते आता नको-से का वाटू लागले?
मह्त्वाकान्क्षे ला शाप असतो विटण्याचा
की नजरच बनते बैरागी?
(I'm sure I've thoroughly mangled the first two lines, but you get the idea...)
Post a Comment