Saturday, November 08, 2008

रचुया पुस्तक पंढरी...

असं कधी तुम्हाला झालंय का? एखाद्या कवितेची एखादी ओळ आठवतीये, खूप पूर्वी वाचलेल्या पुस्तकातला एखादा संवाद आठवतोय, शाळेच्या पुस्तकातला एखादा उतारा आठवतोय पण काही केल्या पुढचं काही आठवत नाही. भारतातल्या घरी पुस्तकांच्या कपाटात ते पुस्तक नेमकं कुठे आहे हेसुद्धा माहीत असतं. आणि आत्ता जाऊन ते उघडून बघावं या तीव्र इच्छेनी सगळा दिवस अस्वस्थतेत जातो. शेवटी एकदाची संध्याकाळ होते, तुम्ही फोन फिरवता आणि कोणीतरी "घरुन" पुढच्या ओळी वाचून दाखवतं! तेव्हा कुठे चैने पडतं!

किंवा तुम्ही भारतातही असलात तरी एखादं जुनं पुस्तक, नाटक,कवितासंग्रह शोधशोधून सुद्धा मिळत नाही. अप्पा बळवंत चौक पालथा घालून झालेला असतो, बुजूर्ग मित्र-नातेवाईकांच्या पायर्‍या चढून झालेल्या असतात. त्यांच्याकडून त्या पुस्तकाबद्दल ऐकायला मिळतं पण पुस्तक काही मिळत नाही. विद्यापीठाच्या ग्रंथालयातून नेमकी शेवटची प्रत गहाळ झालेली असते :(

"आत्ता ते पुस्तक online असतं तर..." विचार मनाला शिवून जातो. अगदी याच विचारानी सुरु झालेला प्रकल्प आहे marathipustake.org. तुम्ही भेट दिलीये? नसेल तर जरुर द्या!

मराठीतील जुनी दुर्मिळ पण मौल्यवान पुस्तके digitize करून internet वर मुक्‍तपणे सर्वांना उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. जी पुस्तकं आता दुकानातून नाहीशी झाली आहेत, ग्रंथालयातूनही कदाचितच उपलब्ध आहेत. ज्या पुस्तकांनी इतिहास घडवला आहे, पण तरी आज फक्‍त नावंच उरली आहेत. संत वाङमय, जुनी नाटकं, कविता, निबंध. हे सगळं जुनं सोनं पुनर्जीवित करून सर्वांना उपलब्ध करून देणे हा एकच उद्देश. यासाठी लेखाधिकाराच्या कक्षेबाहेरची पुस्तके मिळवून टंकलिखित करणे हे मुख्य काम स्वयंसेवकांच्या प्रयासानी सुरु आहे.

अर्थात हा महत्त्वाकांक्षी दूरदर्शी प्रकल्प दीर्घकाळ चालू ठेवायला आणि यशस्वी करायला गरज आहे मराठी साहित्यप्रेमी स्वयंसेवकांची! California च्या San Francisco Bay Area मधील CalAA (California Arts Association) या संस्थेतर्फे या प्रकल्पास हातभार लावण्यासाठी नुकतेच संघटित प्रयत्न सुरु झाले आहेत. तुम्हाला या प्रकल्पात सामील व्हायला आवडेल?

या प्रकल्पासाठी पुस्तके सुचविणे, शक्य असल्यास ती मिळविणे, मराठी टंकलेखनात भाग घेऊन ती पुस्तके digitize करणे, आणि टंकित झालेल्या पुस्तकांचे मुद्रितशोधन (proof-reading) करणे अशा विविध प्रकारे तुम्ही योगदान देऊ शकता. उदा. सध्या आम्ही "समग्र बालकवी" चे टंकलेखन सुरु केले आहे.

तुम्हाला या प्रकल्पा बद्दल काही प्रश्न असतील, तर मला या ब्लॉगवर प्रतिक्रियेद्वारे संपर्क करा. या प्रकल्पात सामील होण्यासाठी PustaCalAA या google - इ-पत्र गटात सामील व्हा, बाकीच्या सभासदांशी संवाद साधा, आत्तापर्यंत सुचवलेली पुस्तके बघा, अजून पुस्तके सुचवा, ती मिळवून सर्वांपर्यंत पोचवा आणि टंकलेखनाच्या कामात सहभागी व्हा! त्यासाठी तुमच्या प्रतिक्रियेत तुमचा email पत्ता कळवा (मी तो प्रसिद्ध करणार नाही!). किंवा तुमचा google ID वापरून या गटाच्या सभासदत्त्वाचा अर्ज करा!

तुमच्या उत्साही प्रतिसादाची वाट बघते :)

Monday, November 03, 2008

मंगल तोरण

आज किती दिवसांनी इंद्र धनुष्य भेटलं! तेसुद्धा कसं? एखादा रोमांचक नाट्यसोहळा व्हावा तसं!

आणि रंगमंच तरी काय सजला होता! आकाशात वर बघावं तर अगदी गर्द निळे ढग. धीरगंभीर, अविचल उत्सुकतेनं सोहळ्यासाठी तयार झालेले! आणि कुठून तरी चुकार सूर्यकिरण डोकावत होतेच! असा जादूई सोनेरी प्रकाश अक्षरश: सांडला होता न सगळीकडे, की प्राजक्‍ताची फुलं नाजूक हातानं वेचावी तसा तो जाऊन वेचता आला तर आयुष्यभर जपून ठेवता येईल असं वाटलं! सगळं खरंच शांत झालं की माझ्या संवेदना बाकी काही टिपेना झाल्या कोणास ठाऊक! आणि मग अचानक "lights, camera rolling, ACTION" असं कोणी म्हणावं आणि नटून थटून सज्ज झालेल्या कलाकारानी प्रवेश करावा, तसे ते सातही रंग प्रकट झाले, बघता बघता गडद होत गेले! काय झोकदार प्रवेश! सातही रंग पारखून घ्यावे, चित्रही तेच, नाट्यही तेच, नृत्यही तेच आणि संगीतही तेच! साथ होती नं, उत्स्फूर्तपणे वाजणार्‍या वार्‍याच्या शीळेतून आणि उत्साहानी पिटणार्‍या पानांच्या टाळ्यांतून खुलत जाणारी! बाकी आकाशात काहीच हालचाल नाही! सहकलाकारही दिपून, दबून गेले असावेत, तो रंगसोहळा बघून आपला पदन्यास विसरून गेले असावेत? की त्या सप्तरंगांच्या जादूवर खिळून राहिलेल्या माझ्या नजरेनी त्यांची नृत्यसाथ टिपली नसावी?

किती वेळ झाला असेल माहीत नाही! मग त्या आकाशातल्या नायकाचं दिलखुलास मिरवून झालं म्हणून, की ढळणार्‍या सूर्याची साथ करत जाणं भाग पडलं म्हणून की डोंगरांपलिकडे दुसरा रंगमंच सजताना दिसतोय म्हणून; त्यानी आपलं प्रदर्शन आवरतं घेतलं खरं! आणि तेही कसं डौलानं. एका क्षितिजावर घट्ट पाय रोवून दुसर्‍या टोकाकडून हळूच अंग चोरून घेत. त्याच्यावर खिळलेली माझी नजर सुद्धा आकाशात एक गोफ विणत गेली, गोलाकार, झोकदार!

पण छे! नाट्य संपलं नव्हतं अजून! आता तर सहकलाकारांना उत्साह आला. भानावर येऊन, अंग घुसळून आसमंत त्यांनी दणाणून सोडला आणि क्षणार्धात चारी दिशा चिंब भिजवून टाकल्या! त्या नव्यानी सुरु झालेल्या नाट्यातून त्यांचा निरोप खचित माझ्यापर्यंत पोचला,

"असतील त्याच्याकडे रंग तेजस्वी, आमचेही नृत्य कौशल्य काही कमी नाही!"

"हो रे बाबांनो!"

मी हसत माझ्या कामाला लागले. खिडकी सोडताना आता कुठे लक्ष गेलं रस्त्यावर शिस्तीत धावणार्‍या गाड्यांकडे! नुसतंच हसून त्यांना म्हणाले, "रंगमंदिरात हजर असूनसुद्धा हा अप्रतिम सोहळा सोडून नीरस रस्त्याकडे बघावं लागणं हे काय अहोदुर्भाग्य! तुम्हालाही कधीतरी तो कलाकार उराउरी भेटू दे!"

कोणे एके काळी अशाच कुठल्याशा अनुभूतीला बालकवींनी शब्दबद्ध केले असेल न? आज तो सोहळा त्या सदाबहार शब्दांची अनुभूति देत भिजवून गेला! आणि तो डोळ्यांसमोर तरळत असतानाच मी त्या रंगांच्या जादूगाराला प्रश्न केला, पुढची भेट कधी? अशीच अवचित?