परवा एका मित्राचं पत्र आलं होतं. साहेबांनी फारच मनावर घेउन, पेटून वगैरे लिहीलं होतं. बाकी तपशील जाउद्या, पण स्वत:च्या मनाविरुद्ध घरात काही धार्मिक कर्मकांड करावं लागल्यामुळे झालेली चिडचीड पत्रात अगदी पुरेपूर दिसत होती. आणि एक पराभव आणि अपमान झाल्याचा सूरही.
आपल्या मनाविरुद्ध कुठलीही गोष्ट करावी लागणं यातून होणारा त्रास कधी ना कधी सगळ्यांना अनुभवावा लागतो. त्यातून जर "प्रश्न तत्त्वाचा" असेल तर मग विचारायलाच नको! म्हणजे या मित्राच्या बाबतीत, कर्मकांडांना त्याचा तत्त्वत: विरोध असूनही केवळ घरच्या बाकीचांच्या आग्रहावरून त्याला माघार घ्यावी लागली हे तर स्पष्ट आहे. पण मग त्याची पराभूत मन:स्थिती, राग आणि अपमान कितपत समर्थनीय आहे हे मला कळेना. आपल्या जवळच्या, प्रिय व्यक्ती, कुटूंबीय यांच्या साठी आपल्या तत्त्वांना मुरड घालावी लागणे हा पराभव समजावा का?
आणि त्याहीपलिकडे हा पराभव आपला आहे की तत्त्वाचा? मुळात इतका अपमान होण्याइतके आपण मोठे आहोत का? असू, तर मग ज्यांकडून आपला पराभव झाला (असं आपल्याला वाटंतय्) ते आपल्याहीपेक्षा आणि आपल्या "तत्त्वा"पेक्षा मोठे असणार नं? आणि नसू, तर असं धुसफुसत रहाण्यापेक्षा, आपल्याला अजून बरंच मोठं व्हायचं आहे असं समजावं का?
केवळ तत्त्वासाठी मैत्र्या, नाती तुटलेली आपण बघतोच की. पण नात्यांसाठी तत्त्वांना मु्रड घातलेलीही बघतो. मग नात्यांमधला कडूपणा स्वीकारून "तत्त्वनिष्ठा" जपणारे आपण की नात्यांचं मोल तत्त्वांपेक्षा वरचढ ठरवणारे आपण? आणि बाकी वेळेला तत्त्वांचा उदो उदो करत फिरणारे जेव्हा नात्यांसाठी तडजोड करतो, तेव्हा दांभिक होतो का आपण? आणि काळाच्या ओघात नात्यांची उलथापालथ होऊ शकते, तशीच तत्त्वं सुद्धा बदलणार नाहीत याची काय हमी?
मित्राची मारे अशाच काही शब्दात समजूत घालून मी मोकळी झाले. पण माझ्यावर अशी वेळ आली की हे प्रश्न भेडसावत रहाणार ही जाणीवही झाली.
शेवटी प्रश्न तत्त्वाचा आहे...
नाही, ज्याच्यात्याच्या तत्त्वाचा आहे!!
Sunday, April 13, 2008
Subscribe to:
Posts (Atom)