सकाळच्या उन्हात कॉफी घेत घराच्या पायरीवर उभी होते. रविवारची आळसावलेली सकाळ. हे घर असं टेकाडावर. आजूबाजूला बैठी टुमदार म्हणावी अशी घरं. मागे वर थोडीशी चढत जाणारी टेकडी, आणि घनदाट होत जाणारी झाडी. समोर तीच उतरत जाणारी टेकडी, थोडी घरं आणि मग समोरच्या परिसराला कापत जाणारा रेल्वेमार्ग, पलिकडे आडवा पसरलेला महारस्ता. त्याही पलिकडे औद्योगिक इमारतींचा पट्टा. मधेच एक-दोन अलिशान हॉटेलं. या परिसरात कामाला येणार्यांची नेहेमीची विश्रांतीस्थानं. त्याहीपलिकडे खाडी. आणि खाडीच्या पलिकडे? आहेत की क्षितिजावर निळे डोंगर! छानपैकी अस्ताव्यस्त पसरलेले. बापरे घराच्या पायरीवरून इतकं सगळं दिसतं हे लक्षातच आलं नव्हतं कधी! इथे घटकाभर बसून हे सगळं साठवून ठेवायलाच पहिजे डोळ्यांत!
महारस्त्यावरून जाणार्या वाहनांचा आवाज एकदम जाणवला. म्हणजे इतका वेळ वर्दळ नव्हती असं नाही. पण अचानक कोणीतरी कळ फिरवावी तसा तो आवाज आपल्या अस्तित्त्वाची जाणीव करून द्यायला लागला. आणि मग अचानक सगळेच आत्तापर्यंत फक्त दिसणारे आवाज ऐकू सुद्धा यायला लागले. वार्यानी हलणारी पानं सळसळ आवाज करतायत होय. आणि पलिकडच्या मैदानावर खेळणारी चालत्या बोलत्या बाहुल्यांसारखी दिसणारी मुलं आरडाओरडा सुद्धा करतायत. गंमत म्हणजे आत्तापर्यंत फक्त ऐकू येणार्या गोष्टी दिसायलासुद्धा लागल्या. इतका वेळ नुसतीच चिवचिव करणारी पाखरं चक्क पानांआडून डोकवायला लागली. शेजार्यांच्या हिरवळीवर लावलाय पाण्याचा फवारा, तो एकदमच उन्हात चमकायला लागला.
मला गंमत कळेना. या अचानक माझ्या दुक-श्राव्य संवेदना अशा तीक्ष्ण कशा झाल्या? पलिकडच्या गल्लीत एक गाडी येऊन थांबली. गराजचे दार उघडून आत गेली. गराज बंद झालं. वार्याच्या झुळुकेनी रस्त्याच्या या कडेचा पाचोळा फरफटत त्या कडेला गेला. आणखी एक गाडी टेकडीवरून येतीये, मी बरोब्बर वळून बघितलं त्या क्षणी समोरून वळसा घेऊन खालच्या रस्त्याला लागली ती. मागच्या बाजूला रहाणारे आजोबा नेहेमीप्रमाणे अडगळीतच्या जुन्या पान्या वस्तू काढून काहीतरी खाटखुट करत बसलेत. आणि इतका वेळ नुसताच चिवचिवाट ऐकू येत होता, ते एकूण चार, नाही पाच असावेत बहुतेक, वेगवेगळे पक्षी आपापल्या ताला-सुरात गातायत हेही लक्षात आलं. समोरच्या निळ्या फुलांच्या वाफ्यात मधेच नाजूक गुलाबी फुलं पण आहेत. आणि पलिकडच्या अंगणात दगडगोट्यांनी सजवलेलं ते कारंजं म्हणजे दोन सुबक मासोळ्या आहेत.
हे सगळं आधीपासून होतं, चालूच होतं की. पण दिसलं नाही, आणि ऐकू सुद्धा आलं नाही. आपल्याला हव्या त्या गोष्टी ऐकायची आणि बघायची, नाही चुकलं.... आपल्याला नको त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायची भारी खोड आहे हे खाडकन जाणवलं. आणि ठरवलं रोज घरातून बाहेर पडताना पायरीवर दोन क्षण थांबायचं, डोळे मिटून ऐकायचं, कान बंद करून बघायचं. खूप काय काय दिसतं आणि ऐकू येतं, तेही रोज नवीन नवीन! करून बघा, मजा आहे!
Friday, August 24, 2007
Friday, August 17, 2007
वास नाही ज्या फुलांना
"ब्लॉगली नाहीस बर्याच दिवसात?", माझे ब्लॉग अत्यंत सहनशीलतेने झेलणार्या प्रिय मैत्रिणीकडून विचारणा झाली. ब्लॉगायला काही कारण लागत नाही, पण ब्लॉग न लिहायला बरीच आहेत की! "खूप दिवसात काही लिहीले नाही, लिहायला तर बसले आहे, पण काय लिहावे सुचत नाही" अशा अर्थाची एक नोंद टाकावी हा मोह आवरता घेते. "चांदणवेल" समोर पडलं आहे, त्यातलं कुठलंतरी पान उघडते..
वास नाही ज्या फुलांना फक्त ती पाहून घे,
धुंद आहे गंघ ज्यांना तो तिथे जाऊन घे.
चांदणे लाटात जेथे साजल्या वाळूमधे,
रात्र संपेतो इमाने गीत तू गाऊन घे.
प्रीत जेव्हा जागणारी सर्वभावे वाहते
बाहुंचा वेढा तिचा तू साहसे साहून घे.
वाढत्या ग्रीष्मात जेव्हा मेघ माथी कोसळे
सारुनी संकोच सारा त्यांत तू न्हाऊन घे
नेम ना लागेल केव्हा तुष्टतेची वाळवी :
वाळण्या ती या जगाचें दु:ख तू लावून घे.
वाटतां सारेंच खोटें, प्रेमनिष्ठा आटतां,
एकटा अंतर्गृहींच्या ज्योतिने दाहून घे.
-बा. भ. बोरकर
वास नाही ज्या फुलांना फक्त ती पाहून घे,
धुंद आहे गंघ ज्यांना तो तिथे जाऊन घे.
चांदणे लाटात जेथे साजल्या वाळूमधे,
रात्र संपेतो इमाने गीत तू गाऊन घे.
प्रीत जेव्हा जागणारी सर्वभावे वाहते
बाहुंचा वेढा तिचा तू साहसे साहून घे.
वाढत्या ग्रीष्मात जेव्हा मेघ माथी कोसळे
सारुनी संकोच सारा त्यांत तू न्हाऊन घे
नेम ना लागेल केव्हा तुष्टतेची वाळवी :
वाळण्या ती या जगाचें दु:ख तू लावून घे.
वाटतां सारेंच खोटें, प्रेमनिष्ठा आटतां,
एकटा अंतर्गृहींच्या ज्योतिने दाहून घे.
-बा. भ. बोरकर
Subscribe to:
Posts (Atom)