कुठल्या न कुठल्या निमित्तानी हा कितीही उहापोह केला तरी उत्तर न मिळणारा प्रश्न डोकं काढतोच. मुळात बियाणं चांगलं असेल, तर कुठलंही खत घातलं तरी काय फरक पडतो? मुळात मातीच चांगली असेल तर सामान्य कौशल्य असलेला कुंभार सुद्धा सुबक मडकं करू शकतो का? गळा चांगला असेल तर कुठल्या गुरुकडे गेलात याल कितपत महत्त्व आहे?
एक मात्र खरं; खत, कुंभार, गुरु यांची मुळात गरज असते हे मात्र कोणी नाकारू शकत नाही!
तर परवा चर्चेचा विषय होता की आपल्या जडणघडणीत आपल्या शाळेचं किती योगदान असतं? आपल्या मुलाला अमुक एका शाळेतच प्रवेश मिळावा असा हट्ट धरणं खरच कितपत योग्य आहे? "अति तिथे माती" या न्यायानुसार, कुठलाच अवाजवी हट्ट धरु नये हे जरी खरं असलं, तरी शालेय शिक्षण बर्याच बाबतीत महत्त्वाचं असल्यामुळे "शाळा चांगली हवी" यात तथ्य आहे न?
मला माझ्या शाळेचा खूप अभिमान आहे. माझ्या जडणघडणीत माझ्या शालेय शिक्षकांचा, मैत्रीणींचा आणि शाळेच्या वातावरणाचा फार मोठा वाटा आहे असं मी मानत आलेय. यात शाळेच्या दगडी जुन्या इमारती, लाकडी जिने, मोकळी मैदानं, बुचाची झाडं, भलं मोठं सभागृह, थोरलं ग्रंथालय आणि त्यातली नकाशांनी भरलेली खोली, पाण्याची टाकी सगळं आलं! दरवर्षीच्या स्पर्धा आल्या, हस्तलिखितं आली, निवडणुका आल्या, स्नेहसंमेलनं आली! "मुळात तुमच्यामधे जे काही गुणावगुण असतील त्यात शाळेच्या शिकवणुकीमुळे खरंच किती फरक पडतो?" या प्रश्नाला उत्तर देताना हे सगळं माझ्या डोळ्यापुढून भर्रकन् सरकून गेलं. या सगळ्या गोष्टींचा माझ्यावर खरंच किती ठसा उमटलाय हे व्यक्त करायला बहुतेक मी अपुरीच पडले.
पण "तू दुसर्या कुठल्या शाळेत गेली असतीस तर खरंच तू वेगळी व्यक्ती झाली असतीस?" किंवा "तुझ्या शाळेत जाणार्या सगळ्यांनाच असं वाटतं?" या प्रश्नांचं ठाम उत्तर तर मी किंवा कोणीही देउ शकणार नाही. काहीजण स्वयंपूर्ण असतात, तर काही गुरुस्पर्शानं धन्य होतात. कधी भेट न दिलेल्या शक्यतेच्या जगात कुठलं बियाणं कसं उगवलं असतं हे कसं सांगणार?
Tuesday, April 17, 2007
Subscribe to:
Posts (Atom)