विंदा करंदीकरांचं "भारतीय स्त्रियांसाठी लिहीलेलं स्थानगीत" परवा ऐकलं (सौजन्य : नक्षत्रांचे देणे)
कर कर करा, मर मर मरा.
दळ दळ दळा, मळ मळ मळा, तळ तळ तळा
तळा आणि जळा.
बाज बाज बाजा, पाज पाज पाजा, पोस पोस पोसा
पोसा आणि सोसा.
धू धू धुवा, शिव शिव शिवा, चिर चिर चिरा
चिरा आणि झुरा.
कुढ कुढ कुढा, चिड चिड चिडा, झिज झिज झिजा
शिजवा आणि शिजा.
चटका बसला.
आमची पिढी भाग्यवान. आमच्यापैकी बहुतजणींना जळावं, सोसावं, झुरावं, शिजावं लागलं नाही. (आणि हे मी फक्त सुशिक्षित मध्यमवर्गींयांबद्दल बोलतीये). हा काळाचा महिमा आहे का? की मागच्या कित्येक पिढयांनी सोसून, वेळोवेळी त्याविरुद्ध झगडून आमच्यासाठी कमावून ठेवलेलं हे पुण्य आहे? असं असताना, विंदांनी जे शब्दात मांडलं ते प्रत्यक्ष न अनुभवता देखील आम्हाला कळतं का? डोळे मिटून क्षणभर मागच्या पिढीतल्या स्त्रियांचा विचार केला की अंगावर सर्रकन् काटा येतोच न? त्यांच्या परिस्थितीच्या नुसत्या कल्पनेनं हताश झालंसं वाटतंच न? वाडा चिरेबंदी मधली "सुख मिळेना तेव्हा मीच सुखास दूर लोटून दिलं" असं म्हणणारी आई आठवते. सुन्न व्हायला होतं, रागही येतो.
हे सगळं आम्ही कुठेतरी पाहिलंय्, आया-आज्यांकडून ऐकलंय्, स्वानुभवकथनातून वाचलंय्. मग मला प्रश्न पडला. मी जर हे असं काही सोसलं नाही, तर मला या "भारतीय स्त्रियांबद्दल" जे काही वाटतं ती सहानुभूती आहे की फक्त हळहळ? एक स्त्री म्हणून तो बसलेला चटका विंदांनी बघितलेल्या आणि म्हणून उत्कटपणे मांडलेल्या चटक्यापेक्षा वेगळा आहे का? मागच्या पिढयांमधून रक्तात वाहत आलेला वारसा आहे का? अजून काही पिढया भविष्यात डोकावून बघितलं, तर त्या भविष्यातल्या स्त्रीलाही असाच चटका बसेल? की काळाच्या ओघात ती जखम भरून निघाली असेल?
माहीत नाही.
Sunday, February 11, 2007
Subscribe to:
Posts (Atom)