Friday, April 21, 2006

बुचाची फुलं

काही दिवसांपूर्वी अपार्टमेंटच्या आवारात निलगिरीच्या टोप्यांचा सडा पडला होता. मंद वास पण येत होता. छाती भरून तो वास घेतला आणि शाळेची आठवण झाली. शाळेत अशीच झाडं होती निलगिरीची, आणि टोप्यांचा सडा पडायचा. बाकीचीही खूप झाडं होती. गुलमोहर, शिरीष, चिंच, विलायती चिंच, बदाम, चेंडूफळ (टण्णूचं झाड!), बूच, पिंपळ, अशोक.... ऋतूमानाप्रमाणे आम्ही कुठली कुठली फुलं गोळा करत असू. चिंचा, चिंचेची फुलं सुद्धा. गुलमोहराच्या पाकळ्यांच्या अंगठ्या करत असू. विलायती चिंचा तुरट लागल्या तरी गोळा करून चाखत असू. अशोकाच्या बिया गोळा करणे हा तर खूप जणींचा छंद होता.

पण सगळ्यात "लोकप्रिय" होती बुचाची फुलं. ती झाडं फुलली की आवारात शिरल्या शिरल्याच बुचाचा मस्त वास यायचा. आणि शाळा भरण्याआधी, छोट्या आणि मोठ्या सुट्टीत, शाळा सुटल्यावर बुचाची फुलं वेचायला काही "वेड्या" मुली नेहेमी झाडाखाली रेंगाळायच्या. नुसत्या रेंगाळायच्या नाहीत. ताजी फुलं झेलायला ताटकळत वर नजर लावून अक्षरश: "दबा" धरून असायच्या. एखादं फुल झाडावरून अलगद गिरक्या घेत खाली झेपावताना दिसलं की सगळ्या त्याकडे झेपावायच्या. अगदी स्पर्धाच असायची ते फुल झेलायला. जिला ते फुल मिळेल तिच्या चेहर्‍यावर विजयाचा आनंद अगदी ओसंडून वहायचा! आणि मग त्या वेचलेल्या फुलांच्या लांबच लांब वेण्या तयार करायची स्पर्धा. आवारातच नाही तर सगळ्या वर्गांमधूनही मग बुचाचा घमघमाट येत रहायचा. असे मोहक, गंधित, वेडे दिवस होते शाळेतले!

तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? शाळेच्या वेड्या दिवसांची आठवण व्हायला नुसता निलगिरीचा मंद वास पुरे होता. तसं पहायला गेलं तर शाळेच्या दिवसांची आठवण यायला फार काही लागत नाही. लहानपणाच्या आठवणी आपल्या सगळ्यांनाच व्याकुळ करतात. कधी कधी तर अगदी ध्यानी मनी नसताना समोर ठाकतात. त्यातून माझ्यासारख्या शाळेच्या प्रेमात असलेल्यांना तर अगदी "शाळाव्याकुळ" करून सोडतात. (हा ट्युलिपच्या "घरव्याकुळ" वरून बनवलेला शब्द, वाचतीयेस का ग ;-) )

Friday, April 14, 2006

स्वप्न

"ही शुभ्र फुलांची ज्वाला" या पद्मजा फेणाणी-जोगळेकरांच्या आवाजातील ध्वनीमुद्रिकेवर विंदा करंदीकरांची एक फार सुंदर कविता आहे,

मागू नको सख्या, जे माझे न राहीलेले
ते एक स्वप्न होते, स्वप्नात पाहीलेले...

त्यातल्या दोन ओळी मला फार मोहवतात :

स्वप्नात वाहीलेले म्हणुनी कसे असत्य
स्वप्नास सत्य असते सामील जाहलेले...

खरंच, स्वप्न आणि सत्य यांच्यातली सीमारेषा इतकी पुसट असते का? किमान ती तशी असावी असं वाटत राहतं हे नक्की. जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला सत्यात आणण्याची तीव्र इच्छा असते, पण ती सत्यात आणता येतेच असं नाही, तेव्हाच तर आपण त्याची स्वप्नं बघतो ना? पण म्हणून ती "असत्य" थोडीच असते? त्या गोष्टीची तीव्र इच्छा जणू काही त्याला सत्य बनवून टाकते. मग ते "स्वप्न" "असत्य" कसं होईल?

स्वप्नांना सत्यास सामील करणार्‍यासाठी आपण सगळेच झगडत असतो. स्वप्न सत्यात आणण्यासाठी आपण झगडत राहतो. जे जे जमेल ते ते करत राहतो, काही म्हणता काही सुद्धा सोडत नाहीत. आणि ती स्वप्नं आज न उद्या सत्यात उतरतातही. आपले प्रयत्नच आपलं स्वप्न सत्यास सामील करून टाकतात.

पण काही स्वप्नं मात्र फक्‍त रंगवण्यात रमून जायचं असतं, सत्यात आणण्यासाठी झगडायचं नसतं. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून काही क्षण स्वप्न बघण्यात घालवणं किती मनोरंजक असतं! अशी स्वप्नं सत्याला म्हणजेच आपल्या मनातल्या तीव्र, सूप्त इच्छेला आपल्यात सामील करून घेतात!

या Disney च्या गाण्याची आठवण झाली. स्वप्न आणि सत्याची किती छानशी सांगड घातली आहे:

A dream is a wish your heart makes,
When you're fast asleep
In dreams you lose your heartaches,
Whatever you wish for, you keep
Have faith in your dreams and someday,
Your rainbow will come smilling through
No matter how your heart is grieving,
If you keep on believing,
The dreams that you wish will come true.

Wednesday, April 12, 2006

समज

Tulip च्या ब्लॉगवर Emotional Dependence नोंद वाचली आणि ही कविता आठवली.

तुझ्याशी वाद करताना
आताशा माझा आवाज
तितकासा चढलेला नसतो
आणि तुझी प्रतिक्रियाही
झोंबण्याइतकी तिखट नसते

तुझ्या मागोमाग निमूटपणे येताना
मी फारशी खळखळ करत नाही
पण कधीतरी मी यायचं नाकारलंच
तर तूही हट्ट धरत नाहीस

तुझ्या निशिगंधाचं मला अप्रूप वाटावं
यामुळं तू भारावून जात नाहीस
नि मी लावलेल्या गुलाबाची
मला हवी तशी दखल
तू घेतली नाहीस तरी
मीही हळवी होत नाही

आपल्या हातून निसटून गेलेल्या
संवत्सरांनी जाता जाता
समंजसपणाची शाल
आपल्यावर पांघरली आहे?

की बरेच श्रावण बरसून गेल्यावर
आता सरावाने कोसळणार्‍या पावसात
तितकासा आवेग उरलेला नाही?

- आसावरी काकडे

Tuesday, April 04, 2006

मैफल

रविवारी मिलपिटास मधे एक अविस्मरणीय मैफल झाली. "शुभ्र फुलांच्या ज्वाला". पं. वसंतराव देशपांडेंचे नातू राहुल देशपांडे यांची. मी काही शास्त्रोक्‍त संगीताची जाणकार किंवा अभ्यासक नसल्याने, मैफिलीबद्दल काही विश्लेषणात्मक वगैरे लिहायचं धाडस नाही करत. स्वरांनी भारावलेले ते चार तास माझ्यातल्या सामान्य रसिकाला मंत्रमुग्ध करून गेले.

तेजोनिधी लोहगोल, वाटेवर काटे, घेइ छंद मकरंद, सुरत पिया, दाटून कंठ येतो, मृगनयना रसिकमोहिनी, दुनिया वेड्यांचा बाजार ... अशी सगळी नाट्य-चित्रपट गीतं आणि रागदारी. या बरोबरच वसंतरावांच्या काही आठवणी आणि काही किस्से सुद्धा.

एकदा वसंतरावांना एका खडूस श्रोत्यानं विचारले, "का हो, तुमचं कोणत्याही तबलजीशी जमतं का?" उत्तर तयार: "माझं गाणं कायम जमलेलंच असतं हो. पण तुमच्यासारख्याला ते कळावं म्हणून मी आपला साथीला तबला घेतो, झालं!"

अशा मैफिलींचा आनंद घेता येतो हेच मी माझं महाभाग्य समजते. आपण कुठे काही वाचलेलं छानसं असं दुसर्‍यांबरोबर वाटून घेऊन त्याचा आनंद द्विगुणित करता येणं तसं सोपं असतं. पण अशा सुरांच्या मैफिलीचा आनंद तुमच्यापर्यंत कसा पोचवू, कसा वाटून घेऊ, तिथे शब्द थिटे पडतात! त्या सुरांना त्या क्षणी डोळे मिटून मी माझ्यापुरते तरी बंदिस्त करून ठेवलेत. पण या निमित्तानं तुम्हीही कधी अशाच अनुभवलेल्या मैफिलीची आठवण डोळे मिटून दोन क्षण काढू शकलात, तरी माझा आनंद तुमच्या पर्यंत पोचला असं समजीन!