मराठी ब्लॉगविश्वात प्रवेश करताना सर्व प्रथम ही परंपरा सुरु करणार्या आणि पुढे नेणार्या कित्येक मित्र-मैत्रीणींना प्रणाम!
बाकीच्या अनेक ब्लॉग प्रमाणे मी सुद्धा "मी हे का लिहीतीये?" याचे उत्तर देऊन सुरुवात करते. आणि कोण्या एका ब्लॉग वर वाचलेल्या या चारोळीची नोंद करते (गोखले आणि मूळ ब्लॉगर दोघांची माफी मागून):
वाचणारं कोणी असेल तर ब्लॉग लिहीण्यात अर्थ आहे
लिहायला काही सुचणार नसेल तर ब्लॉगस्पेस सुद्धा व्यर्थ आहे!
माझ्या एका मित्राचे मत आहे की, पत्र हे एकाच वेळी स्वगत आणि संवाद दोन्ही असते. ब्लॉग बद्दलही असंच म्हणता येईल न? तर असं हे थोडंसं स्वगत, थोडासा संवाद, आपला आपल्याशी आणि तुम्हा सर्वांशी. कधी काही आवडलेल्या कविता, उतारे, कधी स्वैर विचार. आणि सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे, "का नाही लिहायचे"?
शाळेत असताना प्रत्येक नवीन वहीच्या पहिल्या पानावर आपण नाव, यत्ता, विषय वगैरे लिहायचो. त्याशिवाय कोणी "श्री गणेशाय नम:" लिहायचे, कोणी ॐ काढायचे. मला कधीतरी तुकोबांच्या ओळी भावून गेल्या, म्हणून लिहायला सुरुवात केली
हेचि दान देगा देवा
तुझा विसर न व्हावा
त्याच चालीवर आज पहिला वहिला ब्लॉग प्रसिद्ध करताना, पहिल्या पानावर लिहीते
हेचि दान देगा ब्लॉग देवा
दिसामाजी काही ब्लॉग सुचावा
Monday, January 30, 2006
Subscribe to:
Posts (Atom)