Thursday, August 28, 2008

साखळी हायकू!

बर्‍याच वर्षांपूर्वी कोणीतरी हायकू या प्रकाराची ओळख करून देताना हे ऐकवलं होतं :

देवळातल्या घंटेचा
आवाज दूरवर लोपला
रस्ता तिथेच संपला!

काही दिवसांपूर्वी ते असंच आठवलं आणि काही केल्या डोक्यातून जाईना. मागच्या आठवड्यात संवेदनी काव्यमय खो खो सुरु केला. आज सागरनी माझ्या कवितेवर कवितारुपी प्रतिक्रिया धाडली आणि या सगळ्यातून साखळी हायकूची कल्पना सुचली.

तर नियम :

१) वर दिलेल्या हायकू प्रमाणे दोन किंवा तीनच ओळींचा (की ओळींची?) हायकू रचायचा.
२) त्यातील मात्रा, ताल, ध्वनीरुप तसंच्या तसं आलं तर उत्तम, शक्य तितकं साम्य राखायचा प्रयत्न करायचा.
३) सर्वात महत्त्वाचे, ही साखळी असल्यामुळे तुम्ही जी कडी गुंफणार आहात तिची आधीच्या कडीशी काहीतरी जोडणी असावी : त्यातील लपलेल्या किंवा स्पष्ट दिसणार्‍या अर्थानुसार, त्यातील वापरलेल्या प्रतिमेनुसार, सुचित केलेल्या कल्पनेनुसार किंवा व्यक्‍त होणार्‍या भावनेनुसार किंवा अजून काही असेल!
४) कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त ३ जणांना खो द्यायचा. त्यांच्या ब्लॉगवर त्यांना प्रतिक्रिया देऊन तसं कळवायचं आणि शक्य असल्यास माझ्या ब्लॉगवर मला कळवायचं. मला कळवायचा हेतू इतकाच की मी सगळ्या कड्या एकत्र करू शकीन.
५) तुमच्या नोंदीच्या सुरुवातीला हे नियम डकवा, तुम्ही ज्या कडीच्या पुढे लिहीताय ती कडी उतरवा, आणि शक्यतो तुम्ही ज्यांना खो देताय त्यांच्या ब्लॉगची link द्या.

आता माझी कडी:

रस्त्यातल्या फुलांचा
धुंद गंध दरवळला
मुक्काम तिथेच हरवला!

आणि माझा खो संवेद, सागर आणि चक्रपाणिला.

ता. क. : सईनी हायकूवर एक छान नोंद मांडली आहे!

Sunday, August 24, 2008

आवडलेले थोडे काही

संवेदनी सुरु केलेला खो-खो क्षिप्रा कडून माझ्यापर्यंत पोचला!

संवेदचे नियम इथे परत देते:

१. कविता आवडते पण पुर्ण आठवत नाही आणि हाताशी पुस्तकही नाही? हरकत नाही, आठवतं तेव्हढं लिहा. कवीचं नाव मात्र आवश्य लिहा
२. एक से मेरा क्या होगा सिन्ड्रोम? या वेळी तुम्ही तुमच्या सध्या आवडणारया टॉप २ कविता लिहु शकता आणि कवितांच्या प्रमाणात खो देखील देऊ शकता. जेव्हढ्या कविता तेव्हढे खो (जास्तीजास्त अर्थात २)
३. खो खो नीट चालवण्याची जबाबदारी अर्थात सारयांचीच. त्यामुळे तुमच्या पोस्ट मधे तुम्ही ज्या/जिला खो देताय, त्या/तीचं नाव तर लिहाच, शिवाय त्या/तिच्या ब्लॉगवर ही खो दिल्याची नोंद आवश्य करा
४. कविता का आवडली किंवा कवितेचा अर्थ किंवा काहीच स्पष्टीकरण आपेक्षित नाही
५. अजून नियम नाहीत :)


जोगीण

साद घालशील तेव्हाच येईन
जितकं मागशील तितकंच देईन
दिल्यानंतर देहावेगळ्या
सावलीसारखी निघून जाईन!

तुझा मुकुट मागणार नाही
सभेत नातं सांगणार नाही
माझ्यामधल्या तुझेपणात
जोगीण बनून जगत राहीन!

- कुसुमाग्रज



तुझ्या एका हाकेसाठी

तुझ्या एका हाकेसाठी,
किती बघावी रे वाट,
माझी अधिरता मोठी
तुझे मौन ही अफाट!

तुझ्या एका हाकेसाठी,
उभी कधीची दारात,
तुझी चाहूलही नाही
होते माझीच वरात!

आले दिशा ओलांडून,
दिली सोडून रहाटी
दंगा दारात हा माझा,
तुझ्या एका हाकेसाठी!

तुझ्या एका हाकेसाठी,
साद मीच का घालावी?
सात सुरांची आरास,
मीच मांडून मोडावी!

- यशवंत देव


माझा खो प्रिया आणि सारिकाला!

Tuesday, August 05, 2008

खेड्यामधले...

हे सगळं का आठवलं तेच आठवेना...

छोटासा गाभारा. मधोमध शंकराची पिंडी. दोन्ही बाजूच्या भिंतींवर चौकोनी खिडक्या, कधीच बंद न होणार्‍या. अंगाचं मुटकुळं करून बसता येईल (म्हणजे तेव्हा तरी यायचं, लहानपणी हो!) इतक्या रुंदीच्या. पण या सगळ्यापेक्षा ते देऊळ आठवलं की फक्‍त तो भरून राहिलेला वास आठवतो. तेलाच्या दिवाच्या विझत आलेल्या वातीचा वास. त्यात मिसळलेला धुपाचा वास. त्यात मिसळलेला फुलांचा सुकलेला वास. आणि थोडासा बेलपत्रांचा हिरवट वास. ह्यॅ! तसला वास फक्‍त स्मरणातच आहे आता.

सटाण्याचं जुनं घर. रस्त्यापासून चार पायर्‍या चढून वर उंचावर. घराला काटकोनात ते देऊळ. देवळासमोरचा नंदी अगदी अंगणातच. घराचा मोठा दरवाजा, मधली बैठी खिडकी, बैठक. बैठकीत कोपर्‍यात जुनं कपाट आणि जुनं डेस्क. वरचा उघडा माळा, म्हणजे तिथून थेट बैठकीत उडी मारता येईल असा.

मग बैठकीतून आत गेलं की वर जायला जिना आणि डावीकडे प्रचंड मोठं मधलं घर, कायमच अंधारलेलं. त्या जिन्यात एक छोटी गजांची खिडकी, त्यातून छान दिसणारा मधल्या घराचा मोठा भाग. कित्ती वेळा त्या खिडकीत गर्दी करून, या पायावरून त्यापायावर ताटकळत मोठ्या पुरुष लोकांची जेवणं व्हायची वाट बघत बसणारी आम्ही मुलं. मधल्या घरातून डावीकडे छोटी खोली, आजोबांची. आणि उजवीकडे स्वयपाक घर. स्वयपाक घरातून मागे गेलं की माजघर, मग मागचं अंगण. तिथेच कोपर्‍यात मोरी. एकीकडे बुजलेली विहीर, पण आईच्या आठवणीत असलेलं आणि तिथे उभे राहून नुसतंच कल्पना केलेलं ते विहीरीतून पाणी शेंदणं.

स्वयपाकघरातल्या चुलीचा धूर. शेणानी सारवलेली जमीन. हे थोरलं देवघर - अंधारं, खोल, पण आत डोकावताच शांत वाटणारं. जेवणाच्या पंक्‍तींच्या पत्रावळी आणि द्रोण. कुठेकुठे भिंतीत कोनाडे, त्यात कुठे घड्याळ, कुठे चंची, कुठे वाती होण्याची वाट बघत बसलेला कापूस, कुठे वाळून कोरड्या झालेल्या अमृतांजनची बाटली!

जिन्यावरून चढून गेलं की डावीकडे मोठी झोपायची खोली. खोलीच्या खिडकीतून दिसणारं मागचं अंगण. एका बाजूला तो उघडा माळा ज्यातून खालच्या बैठकीवर उडी मारता आली असती. या खोलीत अगदी हलक्या पावलानी चालायचं. उड्या मारणं नाचणं तर दूरची गोष्ट. कारण जरा जोरानं पावलं टाकली तर खाली मधल्या घरात माती पदते अशी वदंता! आजोबांच्या धाकानं ते खरं की खोटं हे पडताळुन बघायची कोणाची हिंमत असणार!

आणि जिन्यातून उजवीकडे उघडा मोठा ढाबा. त्यावर मोकाट उगवलेलं गवत. त्या ढाब्यावरून थेट पुढच्या अंगणात उडी मारता येईल, म्हणून आम्हा लहान पोरांना तिथे न जाण्याची ताकीद, आणि म्हणूनच आमची मोठ्यांची नजर चुकवून तिथे जाण्याची धडपड. दादा लोक तिथे आपण सर्रास जात असल्याची फुशारकी मिरवणारे!

संध्याकाळी देवळात जमणार्‍या पोरी बाळी. बरोबर आणलेले पितळीचे दिवे मातीनं घासून लख्ख करणार्‍या. देवळात दिवा लावून खिदळत शिवणापाणी खेळणार्‍या. परकराचे ओचे बांधून देवळासमोरच्या ओबडधोबड नंदीभवती लंगडी घालणार्‍या. अंधार पडून दिसेनासं होईपर्यंत पायानी धूळ उडवत गलका करत राहणार्‍या.

हे सगळं का आठवलं तेच आठवेना...

आठवणींना कुठे लागतात निमित्तांचे हिंदोळे?