Friday, June 13, 2008

पाणीच पाणी ...

पाणी, विपुल पाणी.

खळाळतं पाणी, स्तब्ध पाणी.

शांतपणे वाहणारं, गर्जना करणारं, नुसतंच धीरगंभीर.

काहीतरी नातं आहे जरूर. जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी पाण्याच्या जवळ गेलं की ते नातं उब देत राहतं. मग ती अगदी लहानपणी कोलाडच्या नदीत मारलेली डुबकी असेल. एका पावसाळ्यात पुण्याच्या बालगंधर्व पुलावरून पाहिलेली, कधी नव्हे ते भरभरून वाहणारी मुठा असेल. किंवा खळखळत खिदळत जाणारी स्फटिक शुभ्र हृषिकेशची गंगामाई असेल! आणि देशोदेशीच्या हौशी पर्यटकांबरोबर घेतलेल्या बोट राइड मधून अगदी ओझरतीच भेटलेली सेंन नदी, थेम्स् नदी, सिंगापूर नदी असेल.

भीमाशंकर असेल, होगानिकल असेल, किंवा जगप्रसिद्ध नायगरा! उंचीवरून कशाची पर्वा न करता कोसळणारं पाणी! मुबलक पाणी! आपलाच आवाज आपल्याला ऐकू न येईल इतकी गर्जना करणारं मोठं आणि केसांच्या बटांमधे अडकून चिमुकल्या मोत्यांचं रुप घेण्याइतकं छोटं!

आणि आपल्यात बाकी सार्‍यांना सामावून घेणार्‍या खुळ्या सागराबद्दल तर काय बोलावं. गणपतीपुळ्या पासून कन्याकुमारी पर्यंत आणि चौपटीपासून हाफमून बे पर्यंत. वेगवेगळी रूपं पण एकच गाज. वेगवेगळे रंग, कुठे उगवतीचे कुठे मावळतीचे, कधी चमचमणारे चंचल तर कधी शांत, गंभीर; पण एकच अस्तित्त्व.

सगळंच तर पाणी. आपल्या सहवासानी शांत करणारं. पाण्याशी नातं म्हणलं ना ते हे. एकांताचं. कुठेही कधीही पाण्याला भेटायला गेलं की भोवती किती का गर्दी असेना, "हा संवाद फक्‍त आपल्या दोघांचा हं" असं म्हणणारं. आपलं अस्तित्त्व विरघळून टाकणारं. खळखळाटातून संगीत, तरंगांतून रंग आणि लहरींतून आकाराची भाषा बोलणारं नातं.

याच नात्याच्या अनुभूतीतून अरती प्रभूंना सुचलं असेल का?


पाणी स्तब्ध आहे ...
त्याने आपल्या रंगाची चिरगुटें
सांजउन्हासारखी वाळत घातली आहेत
काठाकाठावरील बाळमुठींनी घडवलेल्या
वाळूच्या मनोर्‍यांवर .
पाण्याखालचा तळ तरंगापासून अंतरंगापर्यंत
त्याही पल्याड आरसा होऊ पहात आहे;
होडी सुद्धा पायांतळी
सांजउन्हाची साखळी सोडून उभी आहे
सनईच्या सादेसाठी.
स्तब्ध आहे ... पाणी स्तब्ध आहे ...